प्राचीन इराणी भाषा : अवेस्ता व पेहेलवी यांच्या दरम्यानच्या इराणी भाषिक अवस्थेला ‘प्राचीन इराणी’ हे नाव दिले आहे. ही अवस्था अंदाजे ख्रि. पू. सातवे शतक ते तिसरे शतक ह्या कालखंडातील आहे. तुरळक अपवाद सोडले, तर या अवस्थेचा जवळजवळ सर्व पुरावा डरायस (कार. ख्रि. पू. ५२२-४८६) आणि पहिला झर्कसीझ (ख्रि. पू. ४८६-४६५) यांच्या बाणाग्रलिपीत लिहिलेल्या शिलालेखांत सापडतो. हे शिलालेख प्राचीन इराणी, एलामाइट व अकेडियन या भाषांत आहेत. यांपैकी प्राचीन इराणी ही ॲकिमेनिडी साम्राज्याच्या विजेत्यांची भाषा आहे.
वरवर पाहिले तरी या भाषेचे अवेस्ताची भाषा आणि वैदिक संस्कृत यांच्याशी असलेले साम्य स्पष्ट होते. त्यामुळे तुलनात्मक व्याकरणाची मदत घेऊन तिचे स्वरूप स्पष्ट करता येते आणि अर्थनिश्चितीलाही त्याचा उपयोग होतो.
ध्वनिविचार : प्राचीन इराणीतील वर्ण पुढीलप्रमाणे आहेत :
स्वर : अ, आ, इ, उ, ऋ.
संयुक्त्त स्वर : अइ, आइ, अउ, आउ.
व्यंजने : क, ग, त, द, प, ब (स्फोटक).
च, ज (अर्धस्फोटक).
ख, थ, फ, स, झ, श, झ (घर्षक).
म, न (अनुनासिक).
य, र, व (अर्धस्वर).
शिलालेखांच्या उपलब्ध सामग्रीचे पृथक्करण करून हे वर्ण मिळतात. यांशिवाय संस्कृत त्र आणि अवेस्ता थ्र यांच्याशी मिळता एक घर्षक स आहे. तो संयुक्त वर्ण नाही आणि स पेक्षा वेगळे चिन्ह त्याच्यासाठी वापरण्यात आलेले आहे. ऋ साठी वापरण्यात आलेले चिन्ह संदर्भानुसार ऋ, अर् किंवा र असे वाचले जाते. एकंदर सामग्रीत एखाददुसरा वर्ण मुळीच न आला असल्याची शक्यता आहे. उदा., ख, थ, फ या घर्षकांचे सघोष प्रतिवर्ण.
व्याकरण : अवेस्ताकडून तुलनात्मक मार्गाने गेल्यास प्राचीन इराणीचे वैदिक संस्कृतशी असलेले साम्य नजरेत भरण्यासारखे आहे. ही भाषिक जवळीक क्रियापद, नाम, विशेषण, अव्यय, सर्वनाम इ. सर्व शब्दप्रकारांत तसेच समासांतही दिसून येते.
नामसिद्धी जवळजवळ पूर्णपणे इंडो-इराणीला धरून आहे मात्र पुरेशा सामग्रीअभावी तिच्यात काही उणीवा आढळतात. नामात तीन लिंगे आणि तीन वचने अजूनही टिकून आहेत. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी व संबोधन या सर्व विभक्त्या दिसून येतात पण चतुर्थीच्या जागी आढळणारी रूपे षष्ठीसारखी आहेत.
क्रियापदात इंडो-इराणी व्यवस्था बऱ्याच प्रमाणात टिकलेली दिसली, तरी वर्तमानकाळाशिवायची इतर रूपे मुमूर्षू अवस्थेत दिसतात.
विशेषणे विकारक्षम असून गुणदर्शक विशेषणे सामान्यतः नामानंतर येतात.
सर्वनामे इंडो-इराणीला धरून आहेत. मात्र नामांप्रमाणे इथेही चतुर्थी व षष्ठी एकरूपच आहेत.
क्रियाविशेषणात अगदी नवीन असे काही नाही. अव्ययात संबंधित शब्दांशी युक्त किंवा त्यांपासून वियुक्त असे दोन प्रकार आहेत.
व्याकरणविषयक विधाने अंशतः स्पष्ट व्हावीत म्हणून काही वाक्ये पुढे नमुन्यादाखल दिली आहेत :
जदिय् ‘मार’ जता ‘मारा’ अजनम् ‘मी मारले’ पातुव् ‘तो रक्षण करो’ ददातुव् ‘तो देवो’ फ्रायनम् ‘मी आणले’ अबरन्ता ‘त्यांनी वाहून नेले’ अहुर मझ्दाह इम ख्शसम् दारयामिय् ‘अहुरमझ्दाच्या कृपेने हे राज्य मी धारण केले आहे’ इमा दह्याव त्या अदम् अद्रशिय् ‘हे प्रांत जे मी घेतले’.
अरियारम्न (ख्रि. पू. ६१०-५८०) राजाचा एक शिलालेख : अरियारम्न, ख्शायथिय वझ्रक, ख्शायथिय ख्शायथियानाम्, ख्शायथिय पार्स, चहिश्पाइश् ख्शायथियह्या पुस्स, हखामनिशह्या नपा. थातिय् अरियारम्न ख्शायथिय ‘इयम् दह्याउश् पार्सा, त्यम् दारयामिय् ह्य हुवस्पा, हुमर्तिया, मना बग वझ्रक अहुर मझ्दा फ्राबर. वश्ना अहुर मझ्दाह अदम् ख्शायथिय इयम् दह्याउश्.’ अह्मिय् थातिय् अरियारम्न ख्शायथिय ‘अहुर मझ्दा मना उपस्ता’ : “अरियारम्न, महान राजा, राजांचा राजा, पार्स राजा, राजा चहिश्पिश्चा पुत्र, हखामनिश्चा नातू. राजा अरियारम्न (असे) जाहीर करतो :’हा पार्स प्रांत, जो मी धारण करतो, हा चांगले घोडे असणारा, चांगले वीर असणारा, हा मला श्रेष्ठ देव अहुर मझ्दा (याने) दिला. अहुर मझ्दाच्या कृपेने मी या प्रांताचा राजा आहे’. राजा अरियारम्न असे जाहीर करतो. ‘अहुरमझ्दाने मला साह्य (केले)….’
संदर्भ : Meillet, Antoine, Grammaire du vieux perse, Paris, 1931.
कालेलकर, ना. गो.
“