बंड : (रिबेलियन). एक प्रस्थापित सत्ता किंवा सामाजिक व आर्थिक व्यवस्था उलथून पाडण्यासाठी केलेला सामुदायिक उठाव, म्हणजे बंड होय. हा उठाव यशस्वी झाला म्हणजे क्रांती होते, तो दडपला गेला, तर त्यास बंड म्हणतात.
बंड या कल्पनेपेक्षा उठाव (रिव्होल्ट), शिपायांचे बंड (म्युटिनी), ⇨ अवचित सत्तांतरण (कू देता) आणि क्रांती (रिव्होल्यूशन) या संकल्पनांचे स्वरूप थोडेसे वेगळे आहे. उठाव हा वैषम्यातून निर्माण होतो आणि त्याचे स्वरूप तात्कालिक असते. त्यामागे निश्चित असे तत्त्वज्ञान नसते. सैन्यातील एका गटाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरूद्ध उठाव केला, तर त्यास शिपायांचे बंड म्हणतात. शिपायांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध हा उठाव झालेला असतो पण सैन्यातील एका गटाने क्षणार्धात प्रस्थापित राजकीय सत्ता उलथून सत्ता बळकावली, तर त्यास अवचित सत्तांतरण असे म्हणतात. अवचित सत्तांतरणामागे एक निश्चित राजकीय उद्देश असतो आणि तो साध्य करण्यासाठी द्रुतगतीने हालचाली करून सत्ता ताब्यात घेतली जाते. राज्यक्रांतीमध्ये सरकारमधील केवळ बदलच गृहीत धरलेला नसून तिचे मूळ उद्दिष्ट प्रस्थापित सामाजिक व राजकीय व्यवस्था नष्ट करून त्या जागी नवी व्यवस्था स्थापन करणे, हे असते. बंडाच्या संकल्पनेशी वरील तिन्ही संकल्पनांचे थोडे साम्य आहे कारण प्रस्थापित व्यवस्थेविरूद्ध बंड पुकारल्याशिवाय उठाव, अवचित सत्तांतरण किंवा राज्यक्रांती होऊ शकत नाही. [⟶ क्रांति-२].
राजकीय बंडामध्ये शस्त्रप्रयोग व हिंसा अपरिहार्य असते कारण बंड शस्त्रबलाने दडपण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. या बंडाच्या मागे एखादे क्रांतिकारक तत्त्वज्ञान असेल तर ते प्रस्थापित व्यवस्था पूर्ण खिळखिळी करून राज्यास क्रांतीकडे घेऊन जाते. प्रस्थापित व्यवस्थेत जर समाजात निर्माण होणारे असंतोष व तणाव दूर करण्याची सोय नसेल, तर अशा परिस्थितीत बंड होण्याची जास्त शक्यता असते.
इतिहासाच्या सुरुवातीपासून शोषितांची शोषकांविरुद्ध बंडे झालेली दिसतात. उदा., इ.स. पू. पहिल्या शतकात प्राचीन रोममध्ये गुलामांनी स्पार्टाकसच्या नेतृत्वाखाली रोमन नागरिकांविरूद्ध बंड उभारले होते. मध्ययुगात शेतकऱ्यांची जमीनदारांविरूद्ध अनेक बंडे झाली त्यांचे पर्यवसान शेवटी जर्मनीतील शेतकऱ्यांच्या युद्धात झाले. मध्ये युगातील बंडांच्या मागे राजसत्ता व धर्मसत्ता यांच्यामधील संघर्ष हा कारणीभूत होता. राजसत्ता धर्मसत्तेच्या व पोपच्या जोखडातून मुक्त होऊ पाहत होती. मध्यकाळात निरनिराळ्या बंडखोर विचारवंतांनी स्वल्पतंत्री हुकूमशाहीपासून मुक्त अशा व्यक्तिस्वातंत्र्याची मागणी केली.
आधुनिक युगामध्ये राष्ट्रवाद आणि लोकशाही या दोन संकल्पानांमुळे फार मोठ्या प्रमाणात राजकीय बंडांचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. राष्ट्रवादाच्या संकल्पनेमध्ये राष्ट्रीय स्वयंनिर्णयाची कल्पना अंतर्भूत आहे. एका विशिष्ट भूप्रदेशातील लोकांना समान भाषा किंवा वंश असल्यामुळे एक राष्ट्र होण्याची इच्छा झाल्यानंतर त्या भूप्रदेशातील जनतेने बंड केलेले आपाणास दिसते. एकोणिसाव्या शतकात जर्मनी व इटलीमध्ये एकीकरणासाठी अशीच बंडे झाली होती. आफ्रिका आणि आशिया या खंडांतील निरनिराळ्या देशांत बंड होण्याचे हेच कारण होते. भारताच्या नागालँड, मिझोराम, मेघालय या राज्यांत बंड होण्याचे कारण राष्ट्रीय स्वयंनिर्णयाची कल्पना हीच आहे.
राष्ट्रवादाप्रमाणेच लोकशाहीच्या कल्पनेमुळे राजकीय बंड झालेली आपणास आढळतात. सोळाव्या व सतराव्या शतकांत यूरोपात सामाजिक कराराचा सिद्धांत मांडण्यात आला. त्याच्या मागे राज्य हे लोकांच्या संमतीवर आधारलेले आहे. ही कल्पना अध्याहृत होती. जर राज्य लोकांच्या संमतीवर आधारलेले नसेल, तर तशा राज्यांविरुद्ध बंड पुकारावे, असे या तत्त्वज्ञांचे मत होते. यातून लोकांनी राजकीय हक्कांसाठी चळवळी करावयास सुरूवात केली. इंग्लंडमध्ये १६८८-१६८९ साली झालेली वैभवशाली रक्तहीन किंवा रक्तशून्य राज्यक्रांती राजकीय बंडाचाच एक आविष्कार होती. १७७६ साली पुकारलेले अमेरिकेतील वसाहतवाद्यांचे बंडदेखील राष्ट्रावादावर व लोशाहीवर आधारलेले असल्यामुळे राज्यक्रांतीत परिवर्तित झाले. १७८९ ची ⇨ फ्रेंच राज्यक्रांती हे याचे आणखी एक उदाहरण.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात समाजवाद या कल्पनेचा उगम झाला. ज्यावेळी समाजातील सामाजिक व आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी बंड करणे आवश्यक आहे, असे सांगण्यात आले, त्या वेळी या समाजवादी विचारांमुळे अनेक बंड झालेली आपणास दिसतात. १८४८ साली झालेले पॅरिसमधील समाजवाद्यांचे बंड हा त्याचा पहिला आविष्कार. १९१७ ची ⇨ रशियन राज्यक्रांती किंवा १९४९ ची चिनी राज्यक्रांती यांचा उगमसुद्धा अशा प्रकारच्या समाजवादी बंडांतून झाला. ही परंपरा चालू असून अर्नेस्ट चे गेव्हारा याने केलेले बोलिव्हियातील बंड याचे ताजे उदाहरण आहे.
बंड का होते, याची कारणीमीमांसा प्लेटो, ॲरिस्टॉटल, कौटिल्य व इतर अनेक विचारवंतांनी केलेली आपणांस आढळते. प्राचीन विचारवंतांचे असे मत आहे, की बंड होण्याचे महत्त्वाचे कारण राज्यातील विविध अंगांमध्ये निर्माण होणारे असमतोल हे आहे. राष्ट्रवादी विचारवंतांच्या मते वेगवेगळ्या राष्ट्रांना स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळत नाही. त्यांचे लोकशाही अधिकार चिरडले जातात, म्हणून बंड होते तर मार्क्सच्या मते भांडवलशाही समाजामध्ये भांडवलदारवर्ग कामगारांचे शोषण करून आपले वर्चस्व प्रस्थापित करतो, म्हणून बंड होते. बंडांचे मूळ वर्गकलहात आहे. थोडक्यात बंड निर्माण होण्याचे महत्त्वाचे कारण व्यक्ती, समाज व राज्य या तीन घटकांतील सौहार्द नष्ट होणे, हे आहे.
सत्तासंपादनाच्या क्षेत्रात बंडाची गरज निर्माण होते कारण विविध समाज गटांना आपापल्या समस्या वैधानिक मार्गांनी सोडविता येत नाहीत. लोकशाही व्यवस्थेत सर्व समाज गटांना स्वातंत्र्य दिलेले असल्यामुळे बंडाची आता गरज उरलेली नाही, असे काही विचारवंतांचे मत आहे. लोकशाहीत निवडणुकीच्या मार्गाने राज्यकर्ते बदलता येतात पण संपूर्ण व्यवस्था बदलता येते की नाही, हे अजून सिद्ध झालेले नाही. लोकशाही राज्यव्यवस्था जर लोकांच्या समस्या सोडवू शकली तर बंडाची शक्यता कमी असते पण हुकूमशाहीत, राजेशाहीत व लष्करशाहीत बंडाची शक्यता जास्त असते.
बंड यशस्वी होण्यामागील महत्त्वाचा अडथळा राजसत्तेच्या जवळ असलेले शस्त्रसामर्थ्य हा आहे कारण पूर्वीच्या तिच्या व्यापापेक्षा आता ती खूपच शक्तिशाली झालेली आहे. अशावेळी बंडखोरांच्या बाजूने काही देश उतरतात व बंडखोरांना मदत करतात. यातूनच व्हिएटनाम, कोरिया, सायप्रस या देशांतील संघर्ष निर्माण झाले. कधी कधी सैन्यामध्ये फूट पडते, सैन्यच बंड करते. उदा., १९७९ साली इराणमध्ये सैन्याने बंड करून अयातुल्ला खोमेनी यांना पाठिंबा दिला.
थोडक्यात सांगायचे झाले, तर बंड म्हणजे प्रस्थापित कायद्याच्या चौकटीस झुगारून देऊन नवी राजकीय व्यवस्था स्थापन करण्याचा प्रयत्न करणे होय. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत आपणांस बंडखोर दिसून येतात कारण ते समाजातील असंतोषाला अभिव्यक्त करीत असतात. प्रस्थापित व्यवस्थेतील अन्यायामुळे बंडाची ऊर्मी ऊसळते, तो अन्याय नष्ट होत नाही, तोवर बंडाची शक्यता टळणार नाही.
चौसाळकर, अशोक