बंगालचा उपसागर : भारत व श्रीलंका यांच्या पूर्वेस, बांगला देशाच्या दक्षिणेस आणि ब्रह्मदेश व थायलंड यांच्या पश्चिमेस पसरलेला हिंदी महासागराचा ईशान्येकडील उथळ भाग. विस्तार ५° उ. व ते २२° उ. अक्षांश आणि ८०° पू. ते ९५° पू. रेखांश यांदरम्यान. क्षेत्रफळ २१,७२,००० चौ. किमी. सरासरी रुंदी १,६०० किमी. सरासरी खोली सु. ८०० मी. जास्तीतजास्त खोली ४,५०० मी. असून ती इंडोनेशियन खंदकामध्ये आढळते. आंतरराष्ट्रीय जलालेखन विभागानुसार या उपसागराचा दक्षिणेकडील विस्तार श्रीलंकेच्या डोंड्रा या दक्षिण टोकापासून सुमात्राच्या उत्तर टोकापर्यंत आहे. ब्रह्मदेशाचा दक्षिणेकडील चिंचोळा भाग व अंदमान, निकोबार बेटे यांदरम्यानचा अंदमान समुद्र हा या उपसागराचाच एक भाग आहे.

बंगालचा

या उपसागराच्या तळावर प्रामुख्याने दोन वैशिष्ट्ये आढळतात. उत्तरेकडील गंगा आणि ब्रह्मपुत्रा यांच्या मुखासमोरील भागात सागरमग्न खंडभूमीची रुंदी सु. १६० किमी. असून दक्षिणेकडील भागात ती फारच कमी आहे. अर्थात गंगा आणि ब्रह्मपुत्रा यांनी केलेल्या गाळ संचयनाशी याचा फार महत्त्वाचा संबंध आहे. याच भागात सागराच्या शिरोभागापासून निघणारी सु.१५० किमी. लांबीची जलमग्न दरी आहे. अशाच प्रकारच्या दऱ्या इतर नद्यांच्या मुखांसमोरही आढळतात. भारतीय किनारपट्टीलगत अनेक निदऱ्या आढळतात. आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यावरील आंध्र, महादेवन व कृष्णा या निदऱ्यांचा १९६३ मध्ये शोध लागला. यांशिवाय सुवर्णमुखी, पेन्नार, मद्रास, नागार्जुन, गोदावरी, गौतमी ह्या निदऱ्या भारतीय किनाऱ्यावर असून बहुतेकांची नावे तेथील नद्यांच्या नावांवरून पडली आहेत. यांपैकी काही निदऱ्यांची निर्मिती प्लाइस्टोसीन हिमयुगाच्या काळात झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जातो. कारण त्या काळी जलपातळी बरीच खाली असल्यामुळे नद्यांच्या खननकार्यास हा भाग अनुकूल होता.

या उपसागराच्या तळावरील दुसरे वैशिष्ट्य म्हणजे पूर्वभागात आढळणारे समुद्र कटक होय. याच कटकांचे पाण्याच्या पृष्ठभागावर आलेले भाग म्हणजेच अंदमान व निकोबार बेटे होत. हा आराकान पर्वताचाच बुडालेला भाग असल्याचे भूगर्भशास्त्रज्ञ मानतात.

भारतातील गंगा, ब्रह्मपुत्रा, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी, व ब्रह्मदेशातील इरावती इ. मोठमोठ्या नद्या या उपसागराला येऊन मिळतात. त्यामुळे माशांच्या वाढीस लागणारे प्लँक्टन खाद्य मुबलक प्रमाणात तयार होते. म्हणूनच मासेमारीच्या दृष्टीने हा उपसागर बराच उपयुक्त ठरतो. समुद्रामधील गाळात मँगॅनीजसारखी उपयुक्त खनिजेदेखील आहेत. आधुनिक तंत्राच्या साहाय्याने ही खनिजे बाहेर काढणे शक्य आहे. त्या दृष्टीने भारताने आपल्या पूर्वेकडील शेजारी राष्ट्ंराशी केलेली सागरी सीमानिश्चिती हे निश्चितच योग्य पाऊल ठरते.

या उपसागराच्या पश्चिम भागात भारतीय नद्यांनी निर्माण केलेल्या त्रिभुज प्रदेशांमुळे बंदरास योग्य अशा जागा अभावानेच सापडतात. पूर्वेकडील किनाऱ्यावर त्यामानाने नैसर्गिकदृष्ट्या अनुकूल अशी अनेक ठिकाणे आहेत. भारतातील कलकत्ता, पारादीप, विशाखापटनम्, काकिनाडा, मच्छलीपटनम्, मद्रास, पाँडिचेरी, कडलोर ब्रह्मदेशातील अक्याब, रंगून, मोलमाइन व बांगला देशातील चित्तगाँग ही प्रमुख बंदरे या उपसागर किनाऱ्यावर आहेत.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून या उपसागराचे अनेक वेळा समन्वेषण करण्यात आले. आंतरराष्ट्रीय हिंदी महासागर संशोधन मोहिमेच्या विद्यमाने सोव्हिएट युनियनचे ‘व्हित्याज’ आणि अमेरिकेची ‘पायोनिअर’ व ‘अँटोन ब्रुन’ या जहाजांनी अगदी अलीकडे या उपसागराचे सविस्तर संशोधन करून, या उपसागरातील पर्वतरांगा, सागरी निदऱ्या व खोल खंदक इ. प्राकृतिक घटकांवर चांगलाच प्रकाश टाकला आहे. आंध्र विद्यापीठातील संशोधकांनी या उपसागराच्या पश्चिम किनाऱ्याचा सखोल अभ्यास केला आहे. कृष्णा-गोदावरी नद्यांच्या मुखांसमोरील भागांत व अंदमानच्या किनाऱ्यावर तेल व नैसर्गिक वायूचे साठे असल्याचे भारतीय तेल व नैसर्गिक वायू आयोगाला नुकतेच आढळून आले आहे (जून १९८०). गोदावरी नदीच्या मुखाजवळील पाहिल्याच विहिरीतून रोजी ६०० पिंपे तेल लाभण्याची शक्यता आहे. अंदमान व निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर या शहराच्या ईशान्येस १९ किमी.वर एक विहीर खोदण्यात आली असून तेथेही नैसर्गिक वायू सापडला आहे. बंगालच्या उपसागरात तेलाचे किती साठे आहेत, याचा अंदाज घेण्यासाठी आणखी तेल विहिरी खोदण्याचा भारत सरकारचा विचार आहे. अशा प्रकारे या उपसागरात तेल व नैसर्गिक वायू सापडल्यामुळे हायड्रोकार्बनही सापडण्याची शक्यता आहे.

या उपसागराच्या पृष्ठभागावरील पाण्याच्या हालचालींची दिशा ॠतूनुसार बदलते. ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे येथील प्रवाहांना सव्य, तर आग्नेय मोसमी वाऱ्यांमुळे अपसव्य दिशा प्राप्त होते. ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या काळात बंगालच्या उपसागरावर निर्माण होणाऱ्या चक्री वादळांमुळे याच्या किनारपट्टीच्या प्रदेशात वित्त व प्राणहानी फार मोठ्या प्रमाणात होते. या उपसागरातून वाहतूक करणाऱ्या बोटींवरही मोठे संकट येते. १८७६ च्या चक्री वादळाने मोठ्या लाटा निर्माण होऊन त्यांमुळे सु. एक लाख लोक मरण पावले तर १९१९ मधील वादळाने तीन हजार माणसे व चाळीस हजार जनावरे मृत्युमुखी पडली. १९७७ साली भारताच्या पूर्व किनारपट्टीवर चक्री वादळामुळे अपरिमित हानी होऊन तीत अवध्या ऐंशी मिनिटांत दहा हजार लोक व एक लाखाहून अधिक जनावरे प्राणास मुकली, तसेच १५० खेडी जमीनदोस्त झाली. भारताच्या या भागातील कोरोमांडल किनारपट्टीलाही अशाच प्रकारच्या चक्री वादळांना दर वर्षी तोंड द्यावे लागते.

ओक, शा. नि. फडके, वि. शं.