फ्लोरी, सर हॉवर्ड वॉल्टर : (२४ सप्टेंबर १८८८-२१ फेब्रूवारी १९६८). ऑस्ट्रेलियन-ब्रिटिश विकृतिवैज्ञानिक. ⇨ पेनिसिलीन या प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधाच्या गुणधर्मांसंबंधीच्या संशोधनाबद्दल फ्लोरी यांना ⇨ सर एर्न्स्ट बोरिस चेन आणि ⇨ सर ॲलेक्झांडर प्लेमिंग या शास्त्रज्ञांसमवेत १९४५ चे शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यक या विषयाचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले.
फ्लोरी यांचा जन्म ॲडिलेड, ऑस्ट्रेलिया येथे झाला. प्रारंभिग शिक्षण ॲडिलेड येथे झाल्यानंतर त्यांनी तेथील विद्यापीठाची एम्.बी.बी.एस. पदवी १९२१ मध्ये मिळविली. रोड्स शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी ऑक्सफर्डमधील मॅग्डालीन महाविद्यालयातून बी.एससी. आणि एम.ए. या पदव्या १९२४ मध्ये मिळविल्या. त्यानंतर ते केंब्रिज येथे ‘जॉन लुकास वॉकर’ विद्यार्थी म्हणून शिकावयास गेले. १९२५ मध्ये रॉकफेलर प्रवासी शिष्यवृत्ती मिळून ते एक वर्षाकरिता अमेरिकेस गेले. तेथून १९२६ मध्ये परतल्यानंतर त्यांनी केंब्रिजमधील गॉनव्हिले आणि कायस महाविद्यालयात शिक्षण घेतले व १९२७ मध्ये पीएच्.डी. पदवी मिळविली. त्याच सुमारास त्यांना लंडन हॉस्पिटलमध्ये फ्रीडम रिसर्च शिष्यवृत्ती मिळाली. १९३१ मध्ये शेफील्ड विद्यापीठात त्यांची विकृतिविज्ञान विषयाच्या जोसेफ हंटर अध्यासनावर नेमणूक झाली. १९३५ मध्ये शेफील्ड सोडल्यानंतर त्यांची ऑक्सफर्ड येथील लिंकन महाविद्यालयात विकृतिविज्ञानाचे प्राध्यापक व फेलो म्हणून नेमणूक झाली. तेथून सेवानिवृत्त झाल्यावर ते १९६२ मध्ये ऑक्सफर्ड येथील क्वीन्स महाविद्यालयाचे मुख्याधिकारी झाले.
इ. स. १९३८ च्या सुमारास त्यांच्या व एर्न्स्ट चेन यांच्या प्रयोगशालीय सहकार्यास सुरुवात झाली. त्या दोघांनी नैसर्गिक सूक्ष्मजंतूरोधी पदार्थाचा पद्धतशीर अभ्यास सुरू केला. सुरुवातीस लाळ व अश्रू यांमध्ये असणाऱ्या नैसर्गिक सूक्ष्मजंतुविलयक (सूक्ष्मजंतूंच्या पेशी विरघळवून टाकणाऱ्या) पदार्थाचा (ज्याला फ्लेमिंग यांनी ‘लायसोझाइम’ हे नाव दिले होते त्याचा) अभ्यास केला. नंतर ते इतर प्रतिजैव पदार्थांकडे वळले. पेनिसिलीन या प्रतिजैव पदार्थाचा शोध फ्लेमिंग यांना १९२८ मध्येच लागला होता. १९३९ मध्ये रॉकफेलर फौंडेशनने दिलेल्या आर्थिक मदतीने या पदार्थावर अधिक संशोधन करून तो औषधी उपयोगासाठी योग्य अवस्थेत मिळविण्याचे काम काही ब्रिटिश शास्त्रज्ञांकडे सोपविण्यात आले. त्यांमध्ये फ्लोरी व चेन हे प्रमुख होते. लवकरच त्यांनी मांसरसात वाढलेल्या बुरशीपासून (हरीतद्रव्यरहित वनस्पतीपासून) थोड्या प्रमाणात पेनिसिलीन अलग मिळविले व ते मानवी रोगास कारणीभूत असणाऱ्या सूक्ष्मजंतूंवर वापरून पाहिले. १९४० मध्ये पेनिसिलीन जिंवत प्राणिशरीरातील काही संवेदनशील सूक्ष्मजंतूंचा नाश करू शकते असा वृत्तांत प्रसिद्ध झाला. मानवी शरीरावरील यशस्वी प्रयोग १९४१ मध्ये करण्यात आला. त्यांनतर सरकारी मदतीने त्याचे पुरेशा मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यात येऊन त्या वेळी चालू असलेल्या दुसऱ्या जागतिक महायुद्धातील जखमींवर ते वापरण्यात येऊ लागले. १९४३ मध्ये फ्लोरी हे काही संशोधकांसमवेत त्या वेळी उपलब्ध असलेल्या पेनिसिलिनाचा युद्धातील जखमींवर उपचार करण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी उत्तर आफ्रिकेत गेले. १९४३-४४ मध्ये एका अँग्लो -अमेरिकन वैज्ञानिक मंडळाबरोबर ते मॉस्कोलाही गेले.
फ्लोरी यांना अनेक मानसन्मान मिळाले होते. १९४४ मध्ये त्यांना सर हा किताब आणि १९६५ मध्ये कायम उमरावपद व ऑर्डर आफॅ मेरिट हा किताब देण्यात आला. सतरा विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय पदव्या दिल्या होत्या. वैद्यक आणि जीवविज्ञान या विषयांच्या अनेक संस्थांचे ते सन्माननीय सभासद होते. नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना मिळालेले विशेष उल्लेखनीय मानसन्मान पुढीलप्रमाणे : लिस्टर पदक, रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स बर्झीलियस पदक, स्वीडिश मेडिकल सोसायटी रॉयल व कॉप्ली पदक, रॉयल सोसायटी. १९४१ मध्ये ते रॉयल सोसायटीचे सदस्य व १९६० मध्ये सोसायटीचे अध्यक्ष झाले. १९६३ मध्ये अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे परदेशी सहकारी म्हणून त्यांची निवड झाली.
अँटिबायॉटिक्स या नियतकालिकात ते शास्त्रीय लेखन करीत व ते १९४९ मध्ये त्यांचे संपादकही होते. सामान्य विकृतिविज्ञानावरील एका ग्रंथाचे ते सहलेखक होते आणि शरीरक्रियाविज्ञान व विकृतिविज्ञान या विषयांवर त्यांचे अनेक निंबध प्रसिद्ध झाले होते. ते ऑक्सफर्ड येथे मरण पावले.
भालेराव, य. त्र्यं.