फ्लोगोपाइट : (अंबर वा ब्राँझ अभ्रक). अभ्रक गटातील एक खनिज. स्फटिक एकनताक्ष, प्रचिनाकार [⟶ स्फटिकविज्ञान] . बहुधा षट्कोणी चकत्या, मोठे स्फटिक, विखुरलेले तुकडे व पत्रित गठ्ठे या रूपांत हे आढळते. ⇨ पाटन : (००1) चांगले. पत्रे नम्य व स्थितीस्थापक. कठिनता २·५-३. वि. गु. २·८-२·९. चमक काचेसारखी ते रेशमासारखी वा मोत्यासारखी. रंग पिवळसर ते गडद तपकिरी, हिरवा, पांढरा, तांबूस उदी. दुधी काचेप्रमाणे पारभासी परंतु पातळ पत्रे पारदर्शक त्यातून येणारा प्रकाश सोनेरी अथवा पिवळसर तपकिरी असतो. काही नमुन्यांमध्ये रूटाइलाच्या सुईसारख्या सूक्ष्म स्फटिकांची विशिष्ट प्रकारे मांडणी होऊन तारकाकृती दिसते. हे विद्युत् व उष्णता यांचे निरोधक आहे. हे उच्च तापमानाला स्थिर असून ९५०० से. पेक्षा जास्त तापमानाला यातील जलांश निघून जातो. रा. सं. KMg3 (AISi3O10) (OH)2. यामध्ये थोड्या प्रमाणात सोडियमच्या जागी पोटॅशियम आलेले असून थोडे लोह आणि कधीकधी फ्ल्युओरीनही यात असते. रूपांतरीत मॅग्नेशियमयुक्त चुनखडक (डोलोमाइटी संगमरवर), सर्पेंटाइनयुक्त खडक तसेच पेरिडोटाइट (किंबर्लाइट), पेग्मटाइट, कार्बोनेटाइट इ. खडकांत हे आढळते. मॅलॅगॅसी, कॅनडा इ. देशांत सापडते. केरळमध्ये क्किलॉन जिल्ह्यातील पुनुलूर व नेयूर येथे याचे गठ्ठे आढळतात आणि अधूनमधून ते काढतात. हे ⇨ शुभ्रअभ्रकापेक्षा अधिक तापसह आहे व शुभ्र अभ्रकाप्रमाणेच याचे उपयोग होतात. फ्लोगोपाइटाचा मुख्यत्वे विद्युत उपकरणांमध्ये निरोधक म्हणून उपयोग होतो तसेच उष्णता निरोधनासाठीही हे वापरतात. यांच्या पाटनपृष्ठांवरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशांच्या तांब्यासारख्या रंगावरून अग्नीसारखा किंवा ज्योतीसारखा दिसणारा या अर्थाच्या ग्रीक शब्दांवरून याला फ्लोगोपाइट हे नाव देण्यात आले आहे (१८४१).
पहा : अभ्रक-गट.
ठाकूर, अ. ना.
“