फ्लेक्सनर, सायमन : (२५ मार्च १८६३ – २ मे १९४६). अमेरिकन विकृतीवैज्ञानिक व सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ. संक्रामणजन्य विकृतींच्या ज्ञानात त्यांनी मोलाची भर घातली आहे.

त्यांचा जन्म लूइसव्हिल येथे झाला. तेथील विद्यापीठाची वैद्यकाची पदवी त्यांनी १८८९ मध्ये मिळविली व नंतर बॉल्टिमोर येथील जॉन हॉप्‌किन्स विद्यापीठात आणि स्ट्रॅस्‌बर्ग, बर्लिन व प्राग येथील विद्यापीठांत, तसेच काही काळ पॅरिसमधील पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी अभ्यास केला. जॉन हॉप्‌किन्स विद्यापीठात विकृतीविज्ञानाचे प्राध्यापक (१८९५ – ९८) व विकृतीविज्ञानासंबंधीच्या शरीररचनाशास्त्राचे प्राध्यापक (१८९८ – ९९) आणि पेन्‌सिल्व्हेनिया विद्यापीठात विकृतीविज्ञानाचे प्राध्यापक (१८९९ – १९०३) म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर न्यूयॉर्क येथील रॉकफेलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च (आजचे रॉकफेलर विद्यापीठ) या संस्थेतील प्रयोगशाळेचे संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली (१९०३ – ३५). १९२० मध्ये त्यांची याच संस्थेचे पहिले संचालक म्हणून नेमणूक झाली. पहिल्या जागतिक महायुद्धात त्यांनी काही काळ लष्करी नोकरी केला होती व कर्नलचा हुद्दा मिळविला होता.

सूक्ष्मजंतूशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी केलेले महत्त्वाचे आणि मूलभूत कार्य म्हणजे फिलीपीन्स मध्ये असताना तेथील आमांश आणि अर्भकातील अतिसार या विकृतींना कारणीभूत असणाऱ्या सूक्ष्मजंतूंचा त्यांनी लावलेला शोध, हे होय. शिगेला पॅराडिसेंटेरी ह्या सूक्ष्मजंतूंना त्यामुळे त्यांची नाव देण्यात आले असून ‘फ्लेक्सनर सूक्ष्मजंतू’ म्हणून ओळखले जातात. ⇨ बालपक्षाघातास (पोलिओस) कारणीभूत असणारा व्हायरस ते आणि पॉल ए. ल्यूइस या दोघांनी १९०९ मध्ये माकडावर प्रयोग करून अलग केला. ते व त्यांच्या सहकाऱ्यांनी १९०९ – ३८ या काळात मानव व माकडातील या रोगासंबंधीची संक्रामणशीलता, शरीरातील विकृतीवैज्ञानिक बदल व प्रतिरक्षा (रोगप्रतिकारक्षमता) यांबद्दल बहुमोल व उपयुक्त माहिती मिळविली. मेरू-मस्तिष्कावरणशोथाकरिता [⟶ मस्तिष्कावरणशोथ] त्यांनी शोधलेल्या रक्तद्रवाला ‘फ्लेक्सनर सीरम’ म्हणतात. प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांच्या शोधापूर्वी या रोगावरील इलाजाकरिता ते एक महत्त्वाचे औषध गणले जात होते.

फ्लेक्सनर हे एक उत्तम शिक्षक होते. वैद्यकशास्त्र आणि सार्वजनिक आरोग्य या विषयांचे तज्ञ सल्लागार म्हणून ते प्रसिद्ध होते. विकृतीविज्ञान आणि सूक्ष्मजंतुशास्त्र या विषयांवर त्यांनी ४०० हून अधिक अहवाल, निबंध व पुस्तके असे विपुल लेखन केले. जर्नल ऑफ एक्सपेरिमेंटल मेडिसि या अमेरिकेतील पहिल्या वैद्यकीय नियतकालिकाचे ते १९०४ – ४६ या काळात संपादक होते.

फ्लेक्सनर हे न्यूयॉर्क स्टेट पब्लिक हेल्थ कौन्सिलचे अध्यक्ष, एअर क्लिनीकल लॅबोरेटरीचे संचालक आणि मेडिकल रिसर्च कौन्सिल ऑफ इंग्लंडचे सल्लागार होते. हिल्या महायुद्धात अमेरिकेच्या लष्कराच्या वैद्यकीय विभागाचे ते सल्लागार होते. नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्‌स अँड सायन्सेस आणि इतर अनेक अमेरिकन व परदेशी वैज्ञानिक संस्थांचे ते सदस्य होते. फ्रेंच लिजन ऑफ ऑनरमध्ये ते कमांडरही होते. ते न्यूयॉर्क येथे मृत्यू पावले.

भालेराव, य. त्र्यं.