फ्रीमन, एडवर्ड ऑगस्टस : (२ ऑगस्ट १८२३-१६ मार्च १८९२). प्रसिद्ध इंग्रज इतिहासकार. इंग्लंडमधील हारबोर्न (स्टॅफर्डशर) येथे जन्म. खाजगी रीतीने त्याने प्राथमिक आणि दुय्यम शिक्षण पार पाडले. ऑक्सफर्ड विद्यापीठातील ट्रिनिटी महाविद्यालयातून तो बी. ए. झाला आणि तिथेच अधिछात्र म्हणून रूजू झाला (१८४५). आपल्या ऐतिहासिक संशोधनाच्या आधारे वृत्तपत्रांतून त्याने शेकडो स्फुट लेख प्रसिद्ध केले. पुढे त्यास ऑक्सफर्ड विद्यापीठाने सन्माननीय अधिछात्रवृत्ती दिली (१८८०). लिबरल पक्षाचा विल्यम यूअर्ट ग्लॅडस्टन (१८०९-१८९८) या ब्रिटिश मुत्सद्याचा त्याने प्रचार केला. तो अनेक वेळा ब्रिटिश संसदेच्या निवडणुकीत अयशस्वी झाला. त्याने १८८१-८२ मध्ये अमेरिकेत अभ्यागत प्राध्यापक म्हणून इतिहासावर व्याख्याने दिली. ग्लॅडस्टनने त्याची बिशप विल्यम स्टब्झनंतर आधुनिक इतिहासाचा रीजीअस (राजाने नेमलेला) प्राध्यापक म्हणून ऑक्सफर्ड विद्यापीठात नियुक्ती केली (१८८४). मेथड्स ऑफ हिस्टॉरिकल स्टडी ह्या विषयावर १८८६ मध्ये त्याने दिलेली व्याख्याने प्रसिद्ध आहेत. ह्या सुमारासच त्याची प्रकृती बिघडली म्हणून तो हवापालट करण्यासाठी यूरोपीय देशांच्या दौऱ्यावर गेला. स्पेनमध्ये प्रवास करीत असताना आलीकांते येथे तो देवीच्या रोगाने मरण पावला. त्याने स्फुट लेखनाव्यतिरिक्त अनेक पुस्तकेही लिहिली. त्यांपैकी हिस्टरी ऑफ आर्किटेक्चर (१८४९), हिस्टरी ऑफ फेडरल गव्हर्न्मेंट(पहिला खंड – १८६३), द ग्रोथ ऑफ द इंग्लिश कॉन्स्टिट्यूशन (१८७२), द ऑटोमन पॉवर इन यूरोप (१८७७), द रेन ऑफ विल्यम रूफस (दोन खंड, १८८२), हिस्टरी ऑफ सिसिली (चार खंड १८९१-९२ अपूर्ण), हिस्टरी ऑफ द नॉर्मन काँक्वेस्ट ऑफ इंग्लंड (६ खंड -१८६७– ७९) इ. महत्त्वाची होत. यांतील शेवटचा ग्रंथ खूपच लोकप्रिय झाला.
मूळ इतिहाससाधनांना निर्दोष उपयोग करून इतिहासलेखन व्हावे, अशी त्याची धारणा होती पण तो स्वतःच हस्तलिखितांकडे व पुराभिलेखांकडे दुर्लक्ष करी. त्यामुळे त्याच्याच इतिहासलेखनात ‘आधुनिक ब्रिटिश संस्थांचे बीज ट्यूटॉनिक ऑर्डरमध्ये आहे’, यावर अवास्तव भर दिलेला आढळतो. हा संकुचित दृष्टिकोण व राजकीय परिस्थितीचे अवास्तव मूल्यमापन, त्याच्या लेखनात आढळते. त्याच्या ह्या लेखनाचा ब्रिटिश इतिहासलेखनावर काहीसा विपरित परिणाम झाला. तरीसुद्धा त्याच्या हिस्टरी ऑफ द नॉर्मन काँक्वेस्ट ऑफ इंग्लंड ह्या ग्रंथाच्या गुणवत्तेबद्दल तज्ञांत फारसे मतभेद आढळत नाहीत. ‘इतिहास म्हणजे भूतकाळातील राजकारण व राजकारण म्हणजे वर्तमानकाळातील इतिहास’, असे त्याचे मत होते. त्याची शैली अघळपघळ असली, तरी प्रभावी मांडणी, लॅटिन शब्दांचा माफक वापर आणि प्रामाणिक व सडेतोड विचार यांमुळे तत्कालीन इतिहासकारांत विल्यम स्टब्झखालोखाल त्याला मान्यता लाभली होती.
संदर्भ : Stephens, W. R. W. Ed. Life and Letters of Edward A Freeman, 2 Vols., New York, 1895.
देशपांडे, सु. र.
“