फिलाइट : सूक्ष्मकणी रूपांतरित खडक. हा मऊ असल्याने टिकाऊ नसतो. त्यामुळे हा बांधकामासाठी उपयुक्त नाही. क्वॉर्ट्झ व शुभ्र अभ्रक ही यातील आवश्यक खनिजे असून क्लोराइट, सेरिसाइट, अल्बाइट, गार्नेट इ. खनिजे व जैव पदार्थही यात असतात. यातील खनिजानुसार याला रंग आलेला असतो. उदा., क्लोराइटामुळे हिरवा, सेरिसाइटाने करडा, जैव पदार्थामुळे तांबडा वा काळा. यातील कणांचे आकारमान ⇨ पाटीच्या दगडातील कणांपेक्षा मोठे आणि ⇨ सुभाजातील (सहज फुटणाऱ्या रूपांतरित खडकातील ) कणांपेक्षा लहान असते. यातील चापट खनिजे (उदा., अभ्रक, क्लोराइट) एकमेकांना समांतर मांडली जाऊन खडक स्तरभिदुर (फरश्या वा पापुद्रे सुटण्याचा गुणधर्म असलेला) झालेला असतो. अशा फरश्यांच्या पृष्ठांवर अभ्रकाच्या सूक्ष्म तुकड्यांमुळे रेशमाप्रमाणे चकाकी येऊ शकते मात्र हे तुकडे नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत. ही स्तरभिदुरता अथवा पर्णन (पानांसारख्या थरांच्या रूपात झालेली मांडणी) सरळ वा वेडेवाकडे असते. पर्णन मूळच्या स्तरणाला (थरयुक्त रचनेला) समांतर वा कोन करून असते.
पंकाश्म, शेल यांसारख्या मूळच्या मृण्मय खडकांचे वा गाळाचे गतिक रूपांतरण (विशिष्ट दिशेने दाब पडल्याने झालेले बदल) होऊन प्रथम पाटीचा दगड बनतो. याबाबतीत रूपांतरणाची तीव्रता कमी असते. मात्र थोडेसे पुनर्स्फटिकीभवन होऊ शकते. जेव्हा दाब व उष्णता यांचा एकत्रित परिणाम होतो तेव्हा पुनर्स्फटिकीभवन जलदपणे होते व फिलाइट तयार होतो. रूपांतरणाची तीव्रता जास्त असल्यास सुभाजा खडक बनतो. दाबामुळे चापट खनिजे समांतर मांडली जाऊन खडकाला स्तरभिदुरता येते व दाबाच्या दिशेनुसार पर्णनाची दिशा ठरते. पाटीच्या दगडापेक्षा फिलाइटात आणि फिलाइटापेक्षा सुभाजात अधिक चांगली स्तरभिदुरता असते. [→ रूपांतरित खडक ].
फिलाइट अतिशय जुन्या विशेषतः कँब्रियन-पूर्व (सु. ६० कोटी वर्षांहून जुन्या) काळातील खडकांत जगात बऱ्याच ठिकाणी विपुल प्रमाणात आढळतो. घड्या पडलेल्या पर्वतांच्या भागांतही तो सापडतो. स्कॉटलंड, नॉर्वे, आल्प्स, ॲपालॅचिअन, ग्रेट लेक्स डिस्ट्रिक्ट (अमेरिका) इ. ठिकाणी फिलाइटाचे निक्षेप (राशी) आढळले आहेत. हिमालयाचा भाग व द. भारतात फिलाइट कोठे कोठे आढळतो. महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात थोड्या प्रमाणात फिलाइट आढळतो. याच्या पापुद्रे सुटण्याच्या गुणधर्मावरून व पान अर्थाच्या ग्रीक शब्दावरून याचे फिलाइट हे नाव पडले आहे.
पहा : रूपांतरित खडक.
ठाकूर, अ. ना.