फिर्दौसी : (सु. ९४० -सु १०२०). थोर फार्सी कवी. शाहनामा ह्या इराणच्या राष्ट्रीय महाकाव्याचा कर्ता. त्याचे खरे नाव अबुल कासीम मन्सूर बिन हसन असे असले, तरी ‘फिर्दौसी’ ह्या नावानेच तो ओळखला जातो. फिर्दौसीच्या जीवनाबद्द्ल फारशी माहिती मिळत नाही. तूस शहरी, एका संपन्न उमराव कुटुंबात त्याचा जन्म झाला त्याचे पूर्वायुष्य सुखात गेले परंतु उत्तरायुष्यात मात्र आर्थिक चणचणीला त्याला तोंड द्यावे लागले आणि तूस येथेच तो मरण पावला, असे त्याच्या चरित्रासंबंधीचे काही थोडे तपशील मिळतात.
फिर्दौसीची कीर्ती ज्यावर अधिष्ठित आहे, ते शाहनामा हे महाकाव्य सु. ६०,००० ओळींचे असून ‘मुतकारिब’ नामक वृत्तात रचिलेले आहे. इराणच्या राष्ट्रीय परंपरांचे ह्या महाकाव्यात त्याने दर्शन घडविले असून अनेक इराणी आख्यायिकाही त्यात आढळून येतात. आपल्या मातृभूमीच्या प्राचीन परंपरांचा फिर्दौसीला फार मोठा अभिमान होता आणि ह्या परंपरांचे पुनरुज्जीवन आपण ह्या महाकाव्याद्वारे करीत आहोत, असे फिर्दौसीने कृतार्थपणे म्हणून ठेवले आहे. सु. ९८० ते सु. १०१० पर्यंत, म्हणजे सु. ३० वर्षे, फिर्दौसी ह्या महाकाव्याच्या रचनेत गुंतला होता.
लहानमोठ्या पन्नास भागांत शाहनाम्याची विभागणी झालेली आहे. इराणी पुराणकथांतून वर्णिलेल्या राजांपासून सॅसॅनिडांच्या किंवा सासानींच्या पराजयापर्यंतचा वृत्तांत फिर्दौसीने ह्या महाकाव्यात दिलेला आहे. इराणच्या भूतकाळावर प्रकाश टाकणारा शाहनामा हा एक विश्वकोशच मानला जातो. वीरगाथेच्या स्वरूपाचे हे महाकाव्य असल्यामुळे त्याचा बराचसा भाग युद्धवर्णनांना वाहिलेला आहे. त्या मानाने प्रेम आणि प्रणय ह्यांना मिळालेला वाव फार कमी आहे. सोहराव आणि रूस्तूम ह्यांच्या कथेसारख्या अनेक वेधक आणि विश्वविख्यात कथा शाहनाम्यात आढळतात. मानवी भावनांच्या विविध रंगच्छटा हळुवारपणे टिपण्याचे फिर्दौसीचे कौशल्य अशा कथांतून प्रकर्षाने प्रत्ययास येते. इराणमधील लष्करी जीवन तेथील सामाजिक रीतिरिवाज करवसुलीची पद्धती शिक्षण स्त्रियांचे सामाजिक स्थान इत्यादींसंबंधीची माहितीही शाहनाम्यात मिळते. या महाकवीने स्त्रीचे कर्तृत्व पुरूषापेक्षा कमी मानले नाही. फार्सी साहित्यावर आरंभापासूनच अरबी भाषेचा प्रभाव दिसून येतो परंतु शाहनामा मात्र त्यापासून मुक्त आहे. आपल्या ह्या महाकाव्यात फार्सी शब्दांचा वापर फिर्दौसीने आग्रहपूर्वक केल्याचे दिसते. फार्सीत आलेले अरबी शब्द त्याने जाणीवपूर्वक टाळले आहेत. शाहनाम्याचे हे लक्षणीय वैशिष्ट्य होय. महाभारत, इलिअड, ओडिसी ह्यांसारख्या महाकाव्यांच्या तोडीचे हे महाकाव्य मानले जाते. उर्दू आणि तुर्की साहित्यिकांनीही ह्या महाकाव्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला होता.
गझनीच्या महंमूदाला फिर्दौसीने हे काव्य अर्पण केले परंतु त्याने फिर्दौसीला अत्यल्प मानधन देऊन त्याचा अपमान केल्यामुळे फिर्दौसीने ह्या कटू आश्रयदात्यावर एक उपरोधप्रचुर काव्य लिहिले, अशी आख्यायिका आहे.
फिर्दौसीच्या शाहनाम्याचे विविध भाषांत अनुवाद झालेले आहेत. ए. जी. वॉर्नर ह्याने इंग्रजीत केलेला अनुवाद ( ९ खंड, १९०५-२९ ) प्रसिद्ध आहे. जे. जे. मोदी ह्यांनी शाहनामा गुजरातीत आणला (१८९७-१९०४), तर सेतुमाधवराव पगडी ह्यांनी फिर्दौसीच्या कथा ह्या नावाने शाहनाम्याचा परिचय मराठी वाचकांना करून दिला ( २ भाग, १९६४ ).
नईमुद्दीन, सैय्यद
“