फ्रबेल, फ्रीड्रिख : (२१एप्रिल १७८२–२१जून १८५२). जर्मन शिक्षणतज्ञ व बालोद्यान शिक्षणपद्धतीचा प्रवर्तक. जन्म ओबरव्हाइसबाख (थुरिंजिया) येथे. पूर्ण नाव फ्रीड्रिख विल्हेल्म ऑगस्ट फ्रबेल. प्रतिकूल परिस्थितीमुळे त्याला रीतसर प्राथमिक शिक्षण घेता आले नाही. पंधराव्या वर्षी त्याला एका वनव्यावसायिकाकडे उमेदवार म्हणून ठेवण्यात आले. या दोन वर्षांच्या उमेदवारीच्या काळात प्राणी व वनस्पती यांचे निरीक्षण करण्याची संधी त्याला लाभली.
सतराव्या वर्षी येना विद्यापीठात शिकत असलेल्या वडील भावाला तो भेटावयास गेला आणि शिकण्याच्या तीव्र इच्छेने तो विद्यापीठात दाखल झाला. आर्थिक अडचणींमुळे वर्षभरातच त्याला शिक्षण सोडावे लागले परंतु कर्जफेड न झाल्याने थोडे दिवस तुरुंगातही जावे लागले. नंतरच्या चार वर्षांत त्याने अनेक प्रकारची कामे केली पण कशातही त्याचे मन रमले नाही. १८०५साली फ्रँकफुर्ट येथे वास्तुकलेचा अभ्यास करीत असताना फ्रबेलची पेस्टालोत्सी योहानहाइन्रिक (१७४६-१८२७) ह्या शिक्षणतज्ञाच्या ग्रुनेर नावाच्या शिष्याशी ओळख झाली. ग्रुनेरच्या आग्रहाखातर त्याच्याच शाळेत फ्रबेल शिक्षक म्हणून राहिला. हा व्यवसाय त्याच्या आवडीचा होता. १८०८ साली तो स्वित्झर्लंडमधील इव्हरडन येथेपेस्टालोत्सीच्या शाळेत दाखल झाला. तेथे दोन वर्षे राहून त्याने पेस्टालोत्सीच्या अध्यापनपद्धतीचा सूक्ष्म अभ्यास केला.
स्वतंत्रपणे शिक्षकाचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्याचानिश्चय करून तो गटिंगेन व नंतर बर्लिन विद्यापीठात अध्ययनासाठी गेला (१८११). विद्यापीठात शिकत असतानाच १८१३मध्ये तो सैन्यात दाखल झाला. सैन्यात त्याची लँगेथल व मिडेनडॉर्फ या दोघांशी मैत्री झाली. हे दोघे त्याचे अखेरपर्यंत सहकारी होते. सैनिकी दलातून परतल्यावर बर्लिन विद्यापीठात त्याला नोकरी मिळाली. तेथेच त्याने भौतिकी, रसायनशास्त्र, भाषाशास्त्रइत्यादींचा अभ्यास केला.
फ्रबेलने १८१६साली ग्रीशायम (जर्मनी) येथे शाळा काढली व ती १८१७साली कीलां (जर्मनी) येथे हलविली. ही शाळा पेस्टालोत्सीच्याचशैक्षणिक तत्त्वावर सुरू केली होती परंतु पेस्टालोत्सीच्यापद्धतीतील काही उणिवा त्याला जाणवू लागल्या. त्याचे शिक्षणविषयक विचार परिणत होत गेले. १८२६साली द
एज्युकेशन ऑफ मॅन (इं.शी., इं.भा. १८८५) हा त्याचा ग्रंथ प्रसिद्धझाला. एका मित्रानेस्वित्झर्लंडमधील लूझर्न प्रांतातील एक किल्ला किंवा दुर्ग शाळा काढण्यासाठी दिला. म्हणून १८३१साली त्याने त्या दुर्गात शाळा काढली व लवकरच ती त्याच प्रांतातील व्हिलिझाऊया गावी हलविली. दोन्ही ठिकाणी कॅथलिक धर्मगुरूंचा विरोध झाल्यामुळे शाळा यशस्वी झाली नाही. पण स्विस सरकारने त्याला शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे काम दिले. तो स्वित्झर्लंडमध्ये १८३७पर्यंत राहिला. त्याच वर्षी त्याने ब्लांकेनबुर्ग येथे पहिली बालवाडी काढली. ही शाळा १८४४साली आर्थिक अडचणींमुळे बंद करावी लागली. तथापि या वेळेपर्यंत त्याच्या शाळेला पुष्कळ प्रसिद्धीमिळाली होती आणि तिच्या धर्तीवर अनेक शाळा जर्मनीत निघाल्या होत्या. १८४४ते १८४९या काळात त्याने जर्मनीभर व्याख्यानांद्वारा आपल्या शिक्षणविषयक विचारांचा प्रसार केला. १८४९साली मारिएंथल (थुरिंजिया) येथे त्याने प्रशिक्षण शाळा काढली. दुर्दैवाने १८४८साली यूरोपात झालेल्या क्रांतीच्या पार्श्वभूमीवर त्याची विचारसरणी स्फोटक समजली जाऊलागली व १८५१साली ⇨ बालोद्यान पद्धतीवर प्रशियन सरकारने बंदी घातली. फ्रबेल मारिएंथल (थुरिंजिया) तेथे मृत्यू पावला.
फ्रबेलच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानावर त्याच्या वैयक्तिक जीवनातील विशेषतः, त्याच्या बालपणातील प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम झालेला आहे. रोपट्याच्या संगोपन-संवर्धनासाठी माळी हा जसा प्रयत्नकरतो, तसाच प्रयत्नआईवडिलांनी मुलांच्या विकासासाठी केला पाहिजे, असे त्याचे मत होते. त्याच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाला नैतिक व सामाजिक अशा दोन बाजू आहेत. बालकांच्या निकोप व प्रबल इच्छाशक्तीचा संपूर्ण विकास हे त्याचे शिक्षणविषयक ध्येय होय. ऐच्छिक कृती व स्वयंप्रेरित कृती हा शिक्षणाचा पाया असल्याने कृतियुक्तशिक्षणपद्धती हीच शिक्षणाची खरी पद्धती होय, अशी त्याची भूमिका होती.त्याची शिक्षणपद्धती क्रीडन पद्धतीवर आधारलेली आहे. खेळ ही एक बालस्वभावविशिष्ट क्रिया असून तीमुळे बालकाच्या वृत्ती व जीवन यांचा विकास होतो. खेळांतून मुलांचानिसर्गाशी व जगाशी संबंध येतो. खेळाद्वारे विश्रांती, सहेतुकता, शिस्त आणि स्वातंत्र्ययांसारख्या गोष्टी साध्य करता येतात. नैसर्गिक खेळांमुळे मुलांना पूर्णत्व प्राप्त होते. म्हणूनच रूसोप्रमाणे फ्रबेलने निसर्गशिक्षणाला चालना दिली. भिन्न कार्यांतून आणि व्यवसायांतून शिक्षण द्यावे, असाही विचार त्याने मांडला. फ्रबेलने पुरस्कारलेली बालोद्यान पद्धती आधुनिक शिक्षणशास्त्रात महत्त्वाची समजली जाते. जगभर ⇨ माँटेसरी शिक्षणपद्धतीइतकीच ती प्रचलित आहे.
मराठे, रा. म.
“