फ्यूग : एक पाश्चिमात्य संगीतप्रकार. तो ‘काउंटरपॉइंट’ (स्वरधुनींची सरमिसळ रचना) या रचनातत्त्वावर आधारलेला आहे. त्याचा उगम समूहसंगीतात असावा. सर्वसाधारणतः निश्चित अशा स्वरधुनींचे धागे यात असतात. मूलतः कंठसंगीतात हा प्रकार असल्यामुळे स्वरधुनींच्या या धाग्यांना ‘व्हॉइस’ म्हणतात. हे आवाज क्रमाक्रमाने रचनेचा विषय गातात व एक वेळ अशी येते, की जेव्हा सर्व आवाज गाते असतात. ‘फ्यूग’ याचा शब्दशः अर्थ ‘पळ’ वा ‘पलायन’ असा आहे. पहिल्या आवाजाचा दुसऱ्याने जणू पाठलाग केलेला असतो, ही कल्पना त्यातून सूचित होते. यानंतर यातील प्रत्येक आवाज स्वतंत्रपणे, एकेका धुनीचा विस्तार करतो व इथे काउंटरपॉइंट हे संगीतरचनातत्त्व कार्यकारी होते. दोन वा तीन विषयांच्याही फ्यूगरचना असतात. त्यांना अनुक्रमे ‘डबल’ वा ‘ट्रिपल’ असे म्हणतात. कंठसंगीतातील फ्यूग पद्धतीच्या रचनेस स्वतंत्र वाद्यसंगीतरचनेची जोड असेल, तर त्यास ‘अकंपनीड फ्यूग’ असे म्हणतात. फ्यूगचा विकास सतराव्या शतकात घडून आला. प्रख्यात जर्मन संगीतरचनाकार ⇨ बाख (१६८५–१७५०) याने हा प्रकार विशेषत्वाने हाताळला आणि तो पूर्णत्वास नेला. तसे पाहता अनुकरणाच्या क्रियेवर आधारलेले आउंटरपॉइंटचे तत्त्व सु. १२०० पासून प्रचारात होते, परंतु पंधराव्या शतकापर्यंत या तत्त्वाचे महत्त्व संगीतरचनांच्या संदर्भात मान्य झाले नव्हते. बाखनंतर फ्यूग संगीतरचना करण्यात बेथोव्हनचे प्रभुत्व दिसून येते. विसाव्या शतकात हिंडेमिटसारख्या संगीतरचनाकारांचे लक्ष या प्रकाराकडे पुन्हा वेधले गेले आहे.

संदर्भ : Mann, Alfred, The Study of Fugue, New Brunswick, N. J. 1958

रानडे, अशोक