फौजासाइट : झिओलाइट गटातील एक खनिज. याचे स्फटिक घनीय असून हे अष्टफलकांच्या रूपात आढळते. [ ⟶ स्फटिकविज्ञान]. हे रंगहीन अथवा पांढरे असते. कठिनता ५. वि. गु. १·९२३. रा. सं. Na2Ca [Al2Si4O12]·16H2O. हे बाडेन (जर्मन) जवळच्या झासूबाख येथील लिंबुर्गाइट खडकामध्ये काळ्या ऑजाइट खनिजाच्या जोडीने आढळते. याच्या विशिष्ट स्फटिकी रचनेमुळे इतर कोणत्याही झिओलाइटापेक्षा रेणूंचे शोषण करण्याची याची क्षमता जास्त आहे. त्यामुळे विशिष्ट रेणू शोषून घेण्यासाठी वा अलग करण्यासाठी याचा रेणवीय चालनी म्हणून उपयोग होऊ शकतो. बार्तेलमी फोझास (फौजास) द सँफाँ (१७४१ — १८१९) या फ्रेंच भूवैज्ञानिकांच्या बहुमानार्थ याला फौजासाइट हे नाव देण्यात आले आहे (१८१९).
पहा : झिओलाइट गट.
ठाकूर, अ. ना.