फाराबी, अल् – : (सु. ८७० -९५०). जागतिक कीर्तीचा एक थोर अरबी तत्त्ववेत्ता. पूर्ण नाव अबू-नस्त्र मुहंमद अल्-फाराबी. मध्ययुगीन लॅटिन ग्रंथांतून त्याचा उल्लेख ‘ॲल्फाराबियस’ किंवा ’ॲव्हेन्नासर’ असा करण्यात येतो. ‘दुसरा गुरू’ असेही त्यास गौरवाने म्हटले जाते (तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात ‘पहिल्या गुरू’चा मान ॲरिस्टॉटलला दिला जातो). फाराबी हा तुर्की वंशाचा. तुर्कस्तानच्या फाराब परगण्यातील वासीज ह्या गावी तो जन्मला. युहन्ना इब्न हैलान आणि अबू बिश्र मत्ता इब्न-यूनुस हे फाराबीचे गुरू. युहन्ना इब्न-हैलान हा ख्रिस्ती धर्मातील नेस्टोरियन पंथाचा, तर अबू बिश्र मत्ता इब्न-यूनुस (मृ. ९४०) हा ‘ख्रिश्चन ॲरिस्टॉटलियन’ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संप्रदायातील. फाराबीने आपल्या आयुष्याच्या आरंभाची अनेक वर्षे बगदादमध्ये काढली. त्यानंतर सिरियातील आलेप्पो येथे सैफ-अल् दौला ह्या शिया पंथीय हम्दानिद सुलतानाच्या सेवेत फाराबीने आपले उर्वरित आयुष्य घालविले. दमास्कस येथे तो निधन पावला, असे म्हटले जाते.
ईश्वर आणि त्याच्यापासून निःसरणाने प्राप्त होणारी तत्त्वे, मानवी आत्मा आणि ईश्वरी प्रेरणा ह्यांतील संबंध, ईश्वराने निर्मिलेल्या सृष्टीचे स्वरूप आणि तीत आढळून येणाऱ्या श्रेणीव्यवस्थेतील ईश्वरी योजना, मानवी आत्म्याचे अमरत्व इ. विषयांवर फाराबीने लेखन केलेले आहे. त्याचे सर्व लेखन अरबी भाषेत असून त्याचे इंग्रजी, फ्रेंच, जर्मन इ. भाषांत अनुवाद झाले आहेत.
तत्त्वज्ञान : फाराबीच्या तत्त्वज्ञानात पुढील विषय सामावलेले आहेत : (१) तर्कशास्त्र, (२) मानसशास्त्र, (३) तत्त्वमीमांसा, (४) देवशास्त्र, (५) विश्वरचनाशास्त्र आणि (६) नीतिशास्त्र. ह्या विषयांच्या तत्वांचे त्याने जे विवेचन केले आहे त्याच्यावर ⇨ प्लेटो (इ. स. पू. सु. ४२८-सु. ३४८) आणि ⇨ अॅरिस्टॉटल (इ. स. पू. ३८४-३२२) यांच्या तत्त्वज्ञानाच्या आणि ⇨ नव–प्लेटो मताचा पगडा आहे.
ईश्वर ही सर्वश्रेष्ठ आणि केवल एकता आहे आणि ही एकता अनिवार्यपणे अस्तित्वात असते. ह्या एकतेपासून अनेकता-अनेक वस्तू आणि आत्मे यांचे मिळून बनलेले जग- कशा प्रकारे निष्पन्न झाली ह्याविषयीचे फाराबीचे विवेचन एकंदरीत नव-प्लेटो मताची आठवण करून देणार आहे.
ईश्वर स्वतःला जगात दोन प्रकारे प्रकट करतो. तो स्वतःला एकता म्हणून प्रकट करतो. एकंदर मानवी विवेकशक्तीला ईश्वराच्या एकतेचे प्रातिभज्ञान होते (हे तत्त्वज्ञान होय) किंवा माणसाच्या हृदयात ईश्वरी एकतेचा गूढ साक्षात्कार होतो. ईश्वराच्या आत्मप्रकटीकरणाचा दुसरा व कनिष्ठ प्रकार म्हणजे अनेकतेतून होणारे त्याचे प्रकटीकरण. ईश्वराने निर्माण केलेल्या अद्भुत वस्तू जगात सर्वत्र विखुरलेल्या आहेत आणि त्यांच्याद्वारा ईश्वर माणसापुढे ‘प्रकट’ होतो. अनेकतेची, अनेकविध विश्वाची निर्मिती ही ईश्वराची इच्छा आणि प्रयत्न ह्यांच्यामुळे होत नाही. ईश्वर जेव्हा विश्वाची कल्पना करतो तेव्हा विश्व अस्तित्वात येते. ईश्वराची जगाची कल्पना, ही ईश्वाराची कल्पना असल्यामुळे ती चिरंतरन असते आणि म्हणून जग हे चिरंतन आहे.
फाराबीने प्लेटोच्या रिपब्लिक (राज्य) आणि लॉज (कायदे) ह्या संवादांच्या धर्तीवर अल्–मदिनत् अल्–फादीला (आदर्श नगरी) ह्या नावाने प्रसिद्ध असलेला ग्रंथ लिहिला आहे. त्याच्यात तत्त्वमीमांसा आणि मानसशास्त्र यांतील तत्त्वांच्या आधारे आदर्श राज्याचे चित्र रंगविण्यात आले आहे आणि त्याच्या तुलनेने कमीअधिक अपूर्ण आणि सदोष अशा राज्यांचे वर्णनही आले आहे. ईश्वर जसा स्वयंभू आहे व इतर सर्व अस्तित्व जसे ईश्वरापासून निष्पन्न झाले आहे त्याप्रमाणे आदर्श राज्यात सर्वसत्ताधीश असा प्रमुख असतो आणि त्याच्यापासून इतरांना अधिकार प्राप्त होतात. विश्वात श्रेष्ठ आणि कनिष्ठ या संबंधावर आधारलेली अस्तित्वांची साखळी आहे. त्याचप्रमाणे आदर्श आदेश देण्याच्या अधिकारावर आधारलेली, उच्च आणि कनिष्ठ श्रेणींची बनलेली व्यवस्था असते. सर्वसत्ताधीश प्रमुख फक्त आज्ञा देतो. त्याच्या खालची श्रेणी त्याचे आदेश पाळते आणि आपल्या कनिष्ठांना आदेश देते. सर्वांत कनिष्ठ श्रेणी केवळ आदेश पाळते.
सत्य हे त्याच्या शुद्ध स्वरूपात केवळ तत्त्वज्ञानात आढळते. पण धर्मामध्ये हे सत्य प्रतीकांच्या माध्यमातून मांडण्यात येते व म्हणून ज्या प्रमाणात तात्विक सत्य अविकृत रीतीने धर्मात प्रतिबिंबित होते त्या प्रमाणात धर्म श्रेष्ठ असतो.
फाराबीने इस्लामच्या संदर्भात बजावलेली कामगिरी लक्षणीय आहे. तत्त्वज्ञानाला सर्वत्र अवकळा आलेली असून आता केवळ इस्लामी जगातच त्याला नव प्राप्त होऊ शकेल, असा आशावाद त्याने बाळगला होता. म्हणूनच, त्याच्या काळी इस्लामाच्या संदर्भांत जे प्रश्न चर्चिले जात होते त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न त्याने केला आणि त्यासाठी ग्रीक तत्त्वज्ञानाच्या त्याला प्राप्त झालेल्या वारशाचा आधार त्याने घेतला. इस्लामच्या चौकटीतच तार्किक रीतीवर आधारलेले धर्मशास्त्र आणि न्यायशास्त्र रचण्याचा हा प्रयत्न होता. तत्त्वज्ञान हे धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, असे त्याचे मत असले, तरी मुहंमद पैगंबरांबद्दल त्याला नितान्त आदर होता.
फाराबीच्या ग्रंथांची संख्या शंभराहून अधिक भरते. त्यांत ॲरिस्टॉटलच्या ग्रंथांवर त्याने लिहिलेली भाष्ये, तात्विक प्रश्नांचा परिचय करून देणारे स्फुट निबंध, तर्कशास्त्र, काव्यशास्त्र, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र, भौतिकी आदी विषयांवरील लेखन, तत्त्वज्ञानाचे सार्वभौमत्व स्पष्ट करणारे ग्रंथ इत्यादींचा समावेश होतो.
पहा : अरबी तत्त्वज्ञान.
संदर्भ : 1. Hammond, Robert, The philosophy of A1-Farabi and Its Influence on Medieval Thought, Cynthiana, 1947.
2. Lewis, B. Pellat, Ch. Schacht, J. Ed. The Encycelopaedia of Islam, London, 1965.
3. Rescher. Nicholas, Al-Farabi : An Annotated Biblilography, Pittsburgh, 1962.
फैजी, अ. अ. अ. (इं.) रेगे, मे. पुं कुलकर्णी, अ. र. (म.)
“