फोर्ड घराणे : अमेरिकेतील मोटरगाडी उद्योगाचे प्रवर्तक घराणे. विसाव्या शतकातील पहिल्या तीन दशकांच्या काळात विश्वविख्यात ‘फोर्ड मोटर कंपनी’ उदयास येऊन विकसित झाली. या कंपनीचा संस्थापक हेन्री फोर्ड (३० जुलै १८६३–७ एप्रिल १९४७). त्याचा जन्म मिशिगन राज्यातील डिअरबॉर्न या गावी झाला. मेरी व विल्यम हे त्याचे आईवडील. हे एक सधन शेतकरी कुटुंब होते. हेन्री हा सहा भावंडांमधील ज्येष्ठ मुलगा. फोर्ड घराणे मूळचे द. आयर्लंडमधील असून त्यांचे पूर्वज अमेरिकेत येऊन स्थायिक झाले. शालेय शिक्षणानंतर १८७९ मध्ये हेन्री डिट्रॉइट येथील एका यंत्रकारखान्यात उमेदवारी करू लागला. पुढे त्याने ‘डिट्रॉइट ड्रायडॉक कंपनी’ मध्येही काम केले. उमेदवारी काळातील चरितार्थाचा खर्च भागविण्यासाठी तो रात्रीच्या वेळी घड्याळे दुरुस्त करीत असे. ‘वेस्टिंग हाउस कंपनी’त रस्त्यावरील एंजिनांच्या दुरुस्तीचेही काम त्याने केले.
हेन्रीचा १८८९ मध्ये क्लॅरा जेन ब्रिअँट या युवतीशी विवाह झाला. नंतर तो डिट्रॉइटला ‘एडिसन इल्यूमिनेटिंग कंपनी’त अभियंता म्हणून काम करू लागला (१८९१). याच कंपनीचे पुढे ‘डिट्रॉइट एडिसन कंपनी’ असे नाव झाले. १८९५ मध्ये तो या कंपनीचा प्रमुख अभियंता झाला आणि ⇨ टॉमस अल्वा एडिसन हा प्रसिद्ध संशोधक हेन्रीचा एक जिव्हाळ्याचा मित्र बनला. याच काळात हेन्रीचे ‘अश्वरहित गाडी’ (हॉर्सलेस कार) तयार करण्याचे प्रयत्न चालूच होते. १८९६ मध्ये त्याची पहिली गाडी निर्माण झाली. दोन सिलिंडर व चार-चक्रीय मोटर यांनी चालविल्या जाणाऱ्या या मोटरगाडीला सायकलची चार चाके लावण्यात आली होती. त्याच सुमारास यूरोपमध्ये ‘मार्कस’, ‘डेम्लर’ व ‘बेंझ’ या मोटरगाड्या रस्त्यावरून धावू लागल्या होत्या. त्याचप्रमाणे दूर्ये बंधू, एल्वुड हेन्झ यांसारख्यांनी अमेरिकेत फोर्डपेक्षाही अधिक चांगल्या गाड्यांचा शोध लावला होता. हेन्रीने शर्यतीच्या गाड्या तयार केल्या. त्यांपैकीच ‘९९९’ ही शर्यतगाडी प्रसिद्ध शर्यतपटू बार्नी ओल्डफील्डने चालविली होती आणि नेत्रदीपक विजय मिळविले होते. (१८९८–१९०२).
हेन्री फोर्डने द डिट्रॉइट ऑटोमोबाईल कंपनी व हेन्री फोर्ड कंपनी अशा दोन कंपन्यांची भागीदारी पतकरली (१८९९–१९०२). तथापि पहिली कंपनी बंद पडली आणि दुसऱ्याकंपनीतून तो बाहेर पडला. लवकरच हेन्रीने शर्यतीच्या गाड्यांचा उत्पादक व चालक अशी प्रसिद्धी मिळविली. अल्प किंमतीची, जनसामान्यांना परवडेल अशी मोटरगाडी बनण्याची कल्पना हेन्रीच्या मनात घोळत होती. ‘९९९’ शर्यत गाडीच्या विजयानंतर डिट्रॉइट येथील ॲलेक्स वाय्. माल्कमसन या धनाढ्य कोळसा व्यापाऱ्याने हेन्रीला अर्थसाहाय्य देण्याचे मान्य केले. परिणामी १९०३ मध्ये ‘फोर्ड मोटर कंपनी’ ही एक नवीनच कंपनी बव्हंशी माल्कमसनच्या २८,००० डॉ. भांडवलावर स्थापन करण्यात आली. या कंपनीत फोर्डची केवळ २५% मालकी होती. या कंपनीला जे यश लाभले, त्याचे श्रेय हेन्रीचे मदतनीस जेम्स एस्. कझ्न्झ, सी. एच्. विल्स आणि जॉन व होरेस डॉज बंधू यांना द्यावे लागेल.
मोटरगाडी उद्योगात १९०३ च्या सुमारास सु. १५,०० उद्योजक उतरले, परंतु त्यांतील फारच थोडे – उदा., रॅन्झम ओल्ड्ससारखे – या धंद्यात टिकू शकले. फोर्डने ‘ए’ (A) या नावाच्या नमुन्यापासून आपल्या गाड्या बनविण्यास प्रारंभ केला. अनेक गाड्यांचे नमुने त्याने ‘एस्’ (S) या अक्षरापर्यंत बनविले. १९०७ च्या सुमारास कंपनीला ११ लक्ष डॉलरवर फायदा झाला.
हेन्री फोर्डने सेल्डेन एकस्वावरही विजय मिळविला. १८९५ मध्ये जॉर्ज बॉल्डविन सेल्डेन (१८४६–१९२२) या अमेरिकन वकील-संशोधकाने रस्त्यावरील एंजिनाचा शोध लावून त्याचे एकस्वाधिकार मिळविले होते. त्यामुळे मोटरगाड्यांचे कारखानदार सेल्डेनला त्याच्या एंजिनाचे स्वामित्व शुल्क देत व त्याचे एंजिन वापरण्याचा परवाना मिळवीत असत. फोर्डला असा परवाना नाकारण्यात आला. १८९६ मध्ये फोर्डने आपली पहिली मोटरगाडी बनविली. त्यामुळे सेल्डेनने फोर्डवर एकस्व-भंगाची फिर्याद गुदरली. ८ वर्षांच्या न्यायालयीन कामकाजानंतर न्यायालयाने एकस्व खरे असले, तरी फोर्डने त्याचे उल्लंघन केले नाही; कारण त्याचे एंजिन सेल्डेन एंजिनापेक्षा मूलभूत स्वरूपात निराळे आहे, असा निवाडा दिला. फोर्ड कंपनीस यामुळे मोठीच प्रसिद्धी मिळाली. फोर्डने १९०९ मध्ये फक्त एकाच प्रकारची ‘मॉडेल टी’ (‘टिन लिझी’) – मोटरगाडी बनविण्याचा फार महत्त्वाचा निर्णय घेतला. मॉडेल टी ही मोटरगाडी टिकाऊ, चालविण्याला सोपी व इंधनात बचत करणारी अशी होती. तिची विक्री किंमत ८५० डॉलर असून ती ‘काळ्या’ रंगातच उपलब्ध होती. चार वर्षांतच प्रतिवर्षी४०,०००प्रमाणे या गाड्यांचे उत्पादन होऊलागले.
या जलद उत्पादन काळात फोर्डपुढे दोन महत्त्वाची उद्दिष्टे होती : (१) कार्यक्षमता वाढवून उत्पादन परिव्यय कमी करावयाचे आणि (२) आपल्या कामगारांना मोठे वेतन द्यावयाचे. उत्पादन तंत्राच्या बाबतीत फोर्डची अशी ठाम श्रद्धा होती की, कामगाराने करावयाचे काम फिरत्या पट्ट्यावरूनच त्याच्यापर्यंत गेले पाहिजे. १९१३ च्या सुमारास मिशिगन राज्यातील ‘हायलँड पार्क’ येथे फिरत्या वाहक पट्ट्यावर (कन्व्हेयर बेल्ट) सुट्या भागांची जुळणी करून यंत्रे बनविण्याची पद्धत अवलंबिण्यात येऊन मॉडेल टी मोटरगाडी बनविण्यात आली. या उत्पादन पद्धतीलाच ‘फिरती जुळवणी यंत्रपद्धती’ (मूव्हींगॲसेंब्लीलाइन सिस्टीम ऑफ मॅन्युफॅक्चर) असे संबोधिले जाते. ही पद्धत प्रथमच मोटर उद्योगात वापरण्यात आली. हे तंत्र परिपूर्ण होण्यास सात वर्षे लागली. अशा तऱ्हेने उत्पादन परिव्यय कमी करून, कच्चामाल व वितरण साधने यांच्यावर आपले नियंत्रण ठेवून, मोटरगाडी उत्पादनात वाहक पट्टे व फिरती जुळवणी यंत्रपद्धत वापरून व जनसामान्यांना परवडेल अशी मोटरगाडी निर्माण करून हेन्री फोर्डने आपल्या स्पर्धक उत्पादकांना मागे टाकले व तो जगामधील अग्रणी मोटर उत्पादक बनला. नवीन तंत्रविद्या, वाढते वेतन व विस्तारित बाजारपेठा दाखवून दिल्याबद्दल हेन्री फोर्डचा आंतरराष्ट्रीय स्तरावर औद्योगिक क्रांतीचा एक प्रणेता म्हणून गौरव करण्यात आला. मोटरगाडी उद्योगातील ‘प्रचंड उत्पादना’चा (मास प्रॉडक्शन) तो एक आद्यप्रवर्तकच मानला जातो. १९०८–२८ या वीस वर्षांच्या काळात फोर्ड कंपनीने १·५ कोटी मॉडेल टी गाड्या उत्पादन केल्या. १९१४ मध्ये फोर्डने आपल्या कामगारांना प्रतिदिनी (८ तासांच्या कामाच्या दिवसाचे) ५ डॉलर किमान वेतन देण्याची औद्योगिक जगातील खळबळजनक घोषणा केली आणि अशा तऱ्हेने कामगारांमध्ये प्रतिवर्षी सु. ३०० लक्ष डॉलर रक्कम वितरित करण्याची नफा सहभाजन योजना कार्यान्वित केली. त्यावेळी इतर उद्योगधंद्यांतील कामगारांचे वेतन प्रतिदिनी २·५० डॉलर एवढेच होते. १९१६ मध्ये हेन्रीने डिअरबॉर्न भागातच रूज नदीच्या तीर क्षेत्रात सु. २,०२३ हेक्टर जागेत ‘फेअर लेन’ नावाची स्वतःसाठी निवासवास्तू बांधली. आपल्या कारखान्याचाही त्याने विस्तार केला. हेन्रीने पहिले महायुद्ध थांबविण्याकरिता बरेच परिश्रम घेतले. एक स्टीमर घेऊन व तिला ‘शांतता जहाज’ (पीस शिप) हे नाव देऊन त्यामधून युद्धविरोधी मते असणाऱ्या व ध्येयवादी लोकांना बरोबर घेऊन हेन्रीने १९१५-१६ यांदरम्यान यूरोपचा दौरा केला. त्याचा हा दौरा संपूर्णत: अयशस्वी झाला. अमेरिकेने पहिल्या महायुद्धाच्या रिंगणात प्रवेश केल्याबरोबर फोर्डने आपल्या कारखान्यातून रुग्णवाहिका, विमाने, दारूगोळा, रणगाडे, पाणबुडी, विनाशिका इ. प्रचंड युद्धसाहित्याचे उत्पादन करण्यात मात्र कुचराई केली नाही. १९१८ मध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाच्या तिकिटावर सीनेटवर निवडून येण्याचा त्याचा प्रयत्न थोडक्यात हुकला.
मध्यंतरीच्या काळात, डॉज बंधूंनी स्वतंत्रपणे मोटरनिर्मिती आरंभिली. हेन्री फोर्डने आपल्या कंपनीला झालेल्या नफ्यातून कारखान्याचा विस्तार करावयाचे ठरविल्यामुळे, डॉज बंधूंनी त्याच्यावर फिर्याद गुदरली व नफ्याचे पैसे भागधारकांना लाभांशाच्या रूपात मिळावेत असा आग्रह धरला. या फिर्यादीचा निकाल ३१ ऑक्टोबर १९३१ रोजी लागून कंपनीच्या भागधारगांना १९२·७५ लक्ष डॉलर लाभांश देणे फोर्डला भाग पडले. यामुळे फोर्डने एक नवीनच कंपनी स्थापन केली. फोर्डने अल्पसंख्य भागधारकांकडून कंपनीचे भाग सु. १०·५८ कोटी डॉलरना विकत घेतले आणि अशा तऱ्हेने फोर्ड हा ५० कोटी डॉलर किंमतीच्या फोर्ड मोटर कंपनीचा एकमेव मालक बनला.
सर्व सत्ता व सूत्रे हाती आल्यावर फोर्डने आपल्या मतांच्या विरोधी कर्मचाऱ्यांना व सहकाऱ्यांनाही नोकरीतून काढून टाकण्याचा सपाटा चालविला. विविध गाड्यांच्या निर्मितीच्या योजना तसेच काही लोकोपयोगी कल्पना मूर्त स्वरूपात आणावयाचे त्याने ठरविले. मॉडेल टी या मोटरीची किमान किंमत त्याने २८० डॉलरपर्यंत कमी केली ‘फोर्डसन ट्रॅक्टर’ची विक्री वाढविली आणि प्रचंड रूज कारखाना बांधण्याचे काम पुढे चालूच ठेविले. १९२२ मध्ये फोर्डने ‘लिंकन मोटर कंपनी’ विकत घेतली. या कंपनीतून त्याने उच्च दर्जाच्या व मोठ्या किंमतीच्या ‘लिंकन’ मोटरगाड्यांचे उत्पादन सुरू केले. लिंकन मोटर कंपनीचे व्यवस्थापन हेन्रीने आपला मुलगा एडझेल याच्याकडे सोपविले.
हेन्रीने १९२० च्या पुढील काळात आपल्या कारखान्यांना लागणारा कच्चा माल आपल्या इच्छेप्रमाणे उपलब्ध व्हावा म्हणून, तसेच त्यांची वाहतूक करण्यासाठी, कोळसा व लोखंड यांच्या खाणी, जंगले, काचनिर्मिती कारखाने, रूज येथील एक पोलाद कारखाना आणि ब्राझीलमधील एक प्रचंड रबर मळा इत्यादींमध्ये प्रचंड भांडवल गुंतविले. १९२६ मध्ये फोर्डने विमानाचे उत्पादन करावयास प्रारंभ केला. तीन चलित्रांवर चालणाऱ्या विमानांचाही त्याने विकास केल्यामुळे अमेरिकेतील व्यापारी विमानवाहतुकीत सुधारणा घडून येण्यास अतिशय मदत झाली. १९२० च्या पुढील काळात फोर्ड कारखाने यूरोप, द. अमेरिका यांमधील देशांत तसेच जपानमध्ये उघडण्यात आले. १९३५ मध्ये ब्रिटनच्या फोर्ड कंपनीने ‘पॉप्युलर’ ही मोटरगाडी निर्माण केली. तिची किंमत १०० पौंड असून त्यावेळची जगातील सर्वांत कमी किंमत असलेली मोटर म्हणून ती प्रसिद्धी पावली.
याच काळात हेन्रीने ‘ग्रामीण उद्योगां’कडे आपले लक्ष वळविले. पुरेसे पाणी उपलब्ध करून देणाऱ्या लहानलहान ओढ्यांवरही लहान कारखाने उभारण्याची व अशा तऱ्हेने कारखाने ग्रामीण भागात नेण्याची व शेतकऱ्यांना त्यांच्या फुरसतीच्या काळात चार पैसे अधिक मिळवून देण्याची योजना त्याने कार्यवाहीत आणली. सोयाबीनवरील प्रक्रियेचे कारखानेही फोर्डने उभारले. सोयाबीन म्हणजेएक अतिशय पौष्टिक अन्न तसेच तेल,रंग व प्लॅस्टिके यांच्या उत्पादनास अतिशय उपयुक्त असल्याचे त्याचे मत होते. १९१९ मध्ये शिकागो ट्रिब्यूनने बदनामीकारक मजकूर छापल्याबद्दल फोर्डने या दैनिकाविरूद्ध लावलेल्या फिर्यादीत फोर्ड विजयी ठरला. त्याला सहा सेंटची नुकसान भरपाई मिळाली.
टी मोटर गाड्यांची विक्री १९२०–२५ या काळात अतिशय होऊन कंपनीची भरभराट झाली. सर्वसामान्य लोकांना परवडेल इतपत किंमतीची ही गाडी असल्याने, अमेरिकन गाड्यांच्या एकूण बाजारपेठेत फोर्ड गाड्यांचा हिस्सा ४० ते ५७ % होता. परंतु, याच सुमारास ‘जनरल मोटर्स’ सारख्या इतर कंपन्यांनी फोर्डच्याच उत्पादनपद्धती वापरून अधिक चांगल्या गाड्या बनविण्यास प्रारंभ केला. यांमध्ये जनरल मोटर्सची ‘शेव्हरोलेट’ ही गाडी होती. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हेन्री फोर्डच्या स्पर्धक मोटर कारखानदारांनी आपापल्या मोटरगाड्यांचे स्वरूप, मोटरीतील विविध सुविधा व आरामदायकता, त्याचप्रमाणे तांत्रिक सुधारणा यांबाबत फोर्डच्याही पुढे मजल मारली होती. फोर्डची टी मोटरगाडी ही खरोखरीच कालबाह्य ठरली व त्याला तिचे उत्पादन सर्वस्वी बंद करावे लागून ‘मॉडेल ए’ या नव्या मोटरगाडीची निर्मिती सुरू करण्यात आली. १९२९ च्या सुमारास मॉडेल ए मोटरगाडीने विक्रीबाबत इतर सर्व गाड्यांना मागे टाकले. जनरल मोटर्स, फोर्ड व क्राइस्लर या तीन मोटर-उत्पादकांमध्ये तीव्र चुरस निर्माण झाली.
सतत लाभत गेलेल्या यशामुळे व वाढत्या संपन्नतेमुळे हेन्री फोर्डच्या एकूण दृष्टिकोनात बदल घडून आला. डिअरबॉर्न इंडिपेंडंट या आपल्या साप्ताहिकातून त्याने ज्यूविरोधी अनेक लेख लिहिल्यामुळे त्याची मोठी दुष्कीर्ती झाली. हेन्रीचा मुलगा एडझेल व एझडेलचा मेहुणा इ. सी. कॅन्झलर या दोघांनी फोर्ड मोटर कंपनीच्या व्यवस्थापनाची धुरा मोठ्या कौशल्याने हाताळली; तथापि कॅन्झलर १९२६ साली मॉडेल टी या मोटरगाडीचे उत्पादन बंद करावे, असे आपले मत प्रदर्शित केल्यावर त्याची कंपनीतून हकालपट्टी करण्यात आली. एडझेलच्या धोरणांचीही बऱ्याचदा गळचेपी करण्यात आली. हेन्री फोर्डने आपल्या स्पर्धकांवर मात करण्यासाठी मोटरीच्या किंमती कमी करण्याचे धोरण पुढे चालूच ठेवले. परिणामी उत्पादन प्रक्रियेतील सर्वच स्तरांवर अधिकाधिक उत्पादनासाठी विलक्षण ताण पडू लागला. महामंदीच्या प्रारंभ काळात हेन्री फोर्डने आपल्या कामगारांच्या वेतनात वाढ केली; नवनवीन प्रकल्प हाती घेतले; तथापि घटत्या विक्रीमुळे हेन्रीला आपल्या कामगार संख्येत कपात करावी लागली; कामगारांच्या वेतनात घट करावी लागली आणि विमाननिर्मितीसारखे काही प्रकल्प सोडून द्यावे लागले. १९३२ मध्ये हेन्रीने ‘व्ही-८’ या नमुन्याची मोटारगाडी निर्माण करून आपल्या स्पर्धकांना तोंड देण्याचा प्रयत्न केला; तथापि अमेरिकन मोटर उत्पादकांमध्ये त्याची कंपनी तिसऱ्या स्थानावर गेली ⇨ न्यू डीलच्या कार्यवाहीमुळे (१९३३) फोर्डपुढे आणखी अडचणी उभ्या राहिल्या. ‘नॅशनल इंडस्ट्रियल रिकव्हरी ॲक्ट’ (राष्ट्रीय औद्योगिक सुधारणा कायदा-१९३३) च्या मसुद्यावर सही करण्याचे त्याने नाकारले. वॅग्नर कायद्यान्वये मालक व कामगार यांमध्ये औद्योगिक वाटाघाटी सक्तीच्या ठरविण्यात आल्याने फोर्डला आपली एकांडी वृत्ती सोडून द्यावी लागून, त्याला १९४१ मध्ये आपल्या कारखान्यातील कामगार संघटनेच्या स्थापनेस मान्यता देणे भाग पडले.
याच सुमारास फोर्डने मूलभूत तांत्रिक सुधारणा आपल्या कारखान्यात कार्यवाहीत आणण्याचे नाकारल्याने फोर्ड कंपनीची अवस्था अतिशय वाईट झाली. फोर्ड व लिंकन या दोन्ही मोटरगाड्यांच्या संयुक्त विक्रीमुळे त्याचा क्रम दोनावर आला. फोर्डला जरी अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धातभाग घेऊ नये, असे कळकळीने वाटत असले, तरी १९४२ च्या सुमारास अमेरिका महायुद्धात सहभागी झाल्याबरोबर फोर्डने आपल्या कारखान्यातून युद्धाला आवश्यक असणाऱ्या उत्पादनास जोमाने प्रारंभ केला. डिट्रॉइटजवळील ‘विलो रन’ येथील फोर्डच्या प्रचंड कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या बाँबफेकी विमानांच्या उत्पादनामुळे अमेरिकेचे कौशल्य व प्रचंड उत्पादन या दोन्ही गोष्टी सिद्ध झाल्या.
एडझेल फोर्ड व सी. ई. सरेन्सेन या दोघांच्या हाती १९३४–४२ या कालावधीत उत्पादन व्यवस्थापनाची सूत्रे होती. या कालावधीत फोर्ड कंपनीची प्रतिष्ठा बरीच वाढली. तथापि १९४३ मध्ये एडझेलच्या निधनानंतर व सरेन्सेन कंपनी सोडून गेल्यावर फोर्डने कंपनीचा सुरक्षा अधिकारी म्हणून नेमलेल्या हॅरी बेनेट या व्यक्तीचा कंपनीच्या एकूण कामकाजावर फार मोठा प्रभाव पडून तोच फोर्ड औद्योगिक साम्राज्याचा प्रमुख सूत्रधार बनला. फोर्ड कंपनीच्या दुय्यम कंपन्या सहाही खंडांत पसरल्या होत्या. हेन्री फोर्डला याच काळात हृदयविकाराचे झटके येऊन गेले. १९४५ मध्ये एडझेलच्या मुलावर–हेन्री फोर्ड दुसरा याच्यावर–कंपनीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानेही मोठ्या कौशल्याने रसातळाला पोहोचलेल्या फोर्ड मोटर कंपनीला पुन्हा भरभराटीच्या व संपन्नतेच्या मार्गावर नेऊन सोडले. हेन्री फोर्डचे डिअरबॉर्न येथे वयाच्या चौऱ्यांऐंशीव्या वर्षी निधन झाले.
वस्तुतः हेन्री फोर्ड हा काही संशोधक नव्हता. तथापि मोटरगाडीनिर्मितिउद्योगात क्रांतिकारक बदल घडवून आणण्याचे उपजत चातुर्य व बुद्धिकौशल्य त्याच्या ठायी होते. स्वस्त परंतु, अत्यंत कार्यक्षम मोटरगाडी बनविणे व ती लक्षावधी लोकांना विकणे आणि आपल्या कामगारांचे वेतनदर, त्यांची क्रयशक्ती उंचावेल अशा रीतीने वाढविणे, असे दुहेरी उद्दिष्ट हेन्री फोर्डने आपल्यासमोर ठेवले व ते अत्यंत यशस्वी करून दाखविले, ही त्याची निश्चितच मोठी कामगिरी मानावी लागेल. पहिल्या उद्दिष्ट पूर्तीसाठी हेन्रीने धातुविज्ञान, यांत्रिक अवजारे व उपकरणे आणि निर्मितिप्रक्रिया–विशेषतः फिरती जुळवणी-यंत्रपद्धती–या सर्वांमध्ये अद्ययावतता आणली; यायोगे आधुनिक मोटर उद्योग स्थिरपद होऊ शकला, एवढेच नव्हे, तर इतर उद्योगांचीही प्रगती या उद्योगाने घडवून आणली. अमेरिकेच्या ग्रामीण भागांमध्ये मोटर गाड्यांचा प्रचंड खप होऊ शकेल, हे हेन्रीचे दूरदर्शित्व केवळ मोटरगाडी उद्योगाचे स्वरूपच बदलू शकले असे नाही, तर अमेरिकन नागरिकांच्या राहण्याच्या व काम करण्याच्या सवयी, आवडी यांदेखील बदलू शकले. मॉडेल टी या मोटरगाडीने अमेरिकन शेतकऱ्याला शहरात आणून सोडले, तर शहरी माणसाला ग्रामीण भाग नेऊन दाखविला. टी मोटरगाडीच्या प्रवेशामुळे मोटरगाडी युगाचा सामाजिक व आर्थिक प्रभाव अमेरिकेच्या कानाकोपऱ्यांत जाऊन पोहोचला.
दुसरे उद्दिष्ट साध्य करताना हेन्रीने औद्योगिक वस्तूंकरिता संभाव्य ग्राहकांची संख्या वाढविण्यास मदत केली. ग्रामीण पृथकतेचे निरसन, सुधारित गृहनिवसन आणि यायोगे लक्षावधी लोकांच्या जीवनमानात घडवून आणलेला बदल यांचा समावेश असलेली सामाजिक व आर्थिक क्रांतीच हेन्री फोर्डने प्रत्यक्षात आणली; हेन्री फोर्ड हा एक कोट्यधीश उद्योगपती होता. तरीही आपल्या हयातीत त्याने केलेल्या परोपकारी देणग्यांची रक्कम ५ कोटी डॉलरवर गेली नाही. तथापि १९३६ मध्ये ‘फोर्ड प्रतिष्ठाना’च्या स्थापनेनंतर आणि एडझेल, हेन्री व क्लॅरा ब्रिअँट यांच्या मृत्यूनंतर या प्रतिष्ठानाला मिळालेल्या या सर्वांच्या रकमांमुळे प्रतिष्ठानाजवळ ५० कोटी डॉलरहून अधिक संपत्ती गोळा झाली आणि ते प्रतिष्ठान म्हणजे हेन्री फोर्डचे कार्य व संपत्ती यांचे भव्य स्मारकच बनले. आपले आयुष्याचे ईप्सित व ध्येय यासंबंधी हेन्री फोर्डने माय लाईफ अँड वर्क (१९२२) व टुडे अँड टुमॉरो (१९२६) अशी दोन पुस्तके सॅम्युएल क्राउदर याच्याबरोबर, तर फिलॉसॉफी ऑफ लेबर (१९२९) आणि मूव्हिंग फॉर्वर्ड (१९३०) ही दोन पुस्तके स्वतंत्रपणे लिहिली.
एडझेल (६ नोव्हेंबर १८९३–२६ मे १९४३) : हेन्री व क्लॅरा ब्रिअँट फोर्ड यांचा एकमेव मुलगा. डिट्रॉइट येथे जन्म. डिट्रॉइटच्याच ‘युनिव्हर्सिटी स्कूल’मधून पदवी मिळविली. त्यानंतर उच्च शिक्षण घेण्याऐवजी त्याने वडिलांच्याच उद्योगात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. १९१५ मध्ये कंपनीचा सचिव १९१९ मध्ये अध्यक्ष बनला. तथापि प्रत्यक्ष प्रशासकीय सत्ता त्याच्या वडिलांकडेच होती. आपल्या वडिलांना कारखान्यामध्ये अनेकविध सोयी करण्याची गळ एडझेलने घातली. तरीही वडिलांच्या मनाविरूद्ध कोणतेही कृत्य त्याने केले नाही. एडझेलचा १९१६ मध्ये एलेनॉर क्ले या जे. एल्. हडसन नावाच्या सधन व्यापाऱ्याच्या नातीशी विवाह झाला. एडझेल-एलेनॉर दांपत्याला १९१७ मध्ये पहिला मुलगा झाला. आजोबांच्या स्मरणार्थ याचे नाव हेन्री फोर्ड दुसरा ठेवण्यात आले. या दांपत्याला एकूण ४ मुले झाली.
आपला मेहुणा कॅन्झलर याच्यासह फोर्ड मोटर कंपनीचे अनुक्रमे प्रशासन व व्यवस्थापन एडझेलने अतिकुशलतेने केले. १९२२ मध्ये हेन्रीफोर्डने लिंकन मोटर कंपनी घेतल्यानंतर एडझेल या नव्या कंपनीचे व्यवस्थापन पाहू लागला. त्याने लिंकन नावाची एक अतिशय ऐटदार व मोठ्या किंमतीची मोटरगाडी निर्माण केली. विल्यम बी. स्टाउट याच्या साहाय्याने त्याने हवाई वाहतूक विभाग स्थापिला. या विभागामुळे हवाई टपाल वाहतूक, हवाई वाहतूक मार्ग यांचा आरंभ झाला. तीन चलित्रांच्या सर्वधातवीय विमानाची निर्मिती करण्यात येऊन व्यापारी तत्त्वावर अमेरिकन हवाई वाहतुकीस प्रारंभ झाला.
अतिशय देखणे व आकर्षक रूप आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता यांनी एडझेलचे व्यक्तिमत्त्व प्रभावी बनले होते. तो बुद्धिमान व गुणी व्यक्तींचा सल्ला घेत असे. त्या सल्ल्याला आपला निकष लावीत असे व नंतर कार्यवाही करीत असे. अनेक फोर्ड कंपनी अधिकाऱ्यांच्या मते, १९२५ नंतर एडझेलला आपले निर्णय कार्यवाहीत आणता आले असते, तर फोर्ड कंपनी अधिक काळ मोटरउद्योगात तग धरून राहिली असती.
प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहात असतानाच एडझेलने ‘फोर्ड मॉडेल ए’ (१९१८) व ‘व्ही-आठ’ (१९३२) या दोन ऐटदार गाड्या निर्माण केल्या. १९३९ मधील ‘मर्क्युरी’ व १९४१ मधील ‘काँटिनेंटल’ या आकर्षक गाड्या तयार करण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. दुसऱ्या महायुद्धात ‘प्रॅट अँड व्हिटनी आर-२८००’ विमान एंजिन बनविण्यात तसेच ‘विलो रन कारखाने’ उभारण्यात एडझेलने फार परिश्रम घेतले. अल्पशा आजारपणानंतर त्याचे निधन झाले. एडझेलला कला व संगीत यांचे फार वेड होते. नागरी व शैक्षणिक कार्याकरिता त्याने पुष्कळ धन वेचले. १९३६ मध्ये त्याच्या सहकार्याने ⇨ फोर्ड प्रतिष्ठान उभारण्यात आले.
हेन्री फोर्ड, दुसरा (४ सप्टेंबर १९१७ – ) : एडझेल व एलेनॉर क्लेफोर्ड यांचा ज्येष्ठ मुलगा व हेन्री फोर्ड या संस्थापकाचा नातू. डिट्रॉइट येथे जन्म. येल विद्यापीठातून शिक्षण घेतले. १९४० मध्ये ॲनी मॅक्डोनेल हिच्याशी विवाह. तीन मुले. १९४० मध्येच दुसरा हेन्री हा वडिलांच्या कारखान्यात काम करू लागला पण नंतर तो नौदलात दाखल झाला. १९४३ मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला नौदलातून मुक्त करण्यात येऊन फोर्ड मोटर कंपनीत जाण्यास सांगण्यात आले. लवकरच त्याची उपाध्यक्ष व संचालक म्हणून नियुक्ती झाली. १९४४ मध्ये तो कार्यकारी उपाध्यक्ष बनला. त्यावेळी हॅरी बेनेट या सुरक्षा विभाग प्रमुखाच्या नियंत्रणाखाली ही कंपनी होती. २१ सप्टेंबर १९४५ रोजी संस्थापक हेन्री फोर्ड अध्यक्ष पदावरून निवृत्त झाला, त्याच दिवशी त्याचा नातू दुसरा हेन्री कंपनीचा अध्यक्ष बनला.
फोर्ड कंपनी १९३१–४१ या काळात तोट्यातच चालली होती. दुसऱ्या महायुद्धकाळात तर तिची वेगाने अधोगती झाली. कार्यक्षम व तडफदार अधिकाऱ्यांचा मृत्यू वा त्यांचे कंपनी सोडून जाणे, अथवा पहिल्या हेन्रीची ढासळत चाललेली प्रकृती ही एवढीच यामागील कारणे नव्हती, तर अतिशय खराब संघटन व सामान्य दर्जाचे अभियांत्रिकीय कौशल्य हीदेखील यामागील अतिशय महत्त्वाची कारणे होती. दुसऱ्या हेन्री फोर्डने ही सर्व परिस्थिती १९४० पासूनच बारकाईने अभ्यासिली होती आणि अध्यक्षपद प्राप्त झाल्यावर त्याने ताबडतोब कडक कार्यवाही करण्याचे ठरविले. हॅरी बेनेटला त्याने काढून टाकले आणि अर्नेस्ट आर. ब्रीच या ‘बेंडिक्स एव्हिएशन कॉर्पोरेशन’चा अध्यक्ष तसेच जनरल मोटर्स कॉर्पोरेशनमध्ये पूर्वानुभव असलेल्या अधिकाऱ्याची फोर्ड कंपनीचा कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली. त्याच्याबरोबरच बरेच अनुभवी अधिकारीही फोर्ड कंपनीला येऊन मिळाले. यामुळे बुडण्याच्या अवस्थेला येऊन पोहोचलेल्या फोर्ड मोटर कंपनीचे सुसंघटित मध्यवर्ती संस्थेत रूपांतर होत गेले; कंपनीचे विक्रेंदीकरण करण्यात आले, अधिकारी क्षेत्र ठरविण्यात आली. उदार व समंजस श्रमनीतीचा अवलंब करण्यात आल्यामुळे फोर्ड कामगारांची उत्पादकताही वाढली आणि कामगार व व्यवस्थापक यांमधील संबंध सौहार्दपूर्णव समजूतदारपणाचे झाले.
आपल्या आजोबांप्रमाणे कंपनीचे एकछत्री व्यवस्थापकीय धोरण न अवलंबिता, दुसऱ्या हेन्रीने स्वतःकडे नेतृत्व ठेवूनही आपले अधिकार लायक व सुयोग्य माणसांकडे सोपविले. वित्तव्यवस्था, संघटन आणि यांत्रिकीकरण यांसंबंधी त्याने आधुनिक व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब केला. त्याच्याच कारकीर्दीत मोठ्याप्रमाणावर कंपनीची बांधकामे पुरी करण्यात आली. १९६० मध्ये हेन्रीने कंपनीचे अध्यक्षपद रॉबर्ट एस्. मॅक्नामॅरा या फोर्ड घराण्याबाहेरील व्यक्तीच्या हाती प्रथमच सोपविले. १९६४ मध्ये हेन्रीने पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतला व पुढच्याच वर्षी मारिया ऑस्टिन या युवतीशी विवाह केला. १९६० पासून शिक्षणक्षेत्रास साहाय्य व दारिद्र्याशी झुंज देण्याकरिता उद्योगधंद्यांनी अधिकाअधिक द्रव्य खर्चिले पाहिजे, असे तो प्रतिपादन करू लागला. बेरोजगार निग्रो युवकांना काम मिळवून देण्यासाठी हेन्रीने ‘नॅशनल अर्बन लीग’ या संस्थेस सर्वतोपरी साहाय्य दिले. अमेरिकन उद्योग-व्यवसायांतील अनेक कारखानदारांनी व व्यापाऱ्यांनी एकत्रितपणे स्थापिलेल्या ‘नॅशनल अलायन्स ऑफ बिझिनेसमेन’ या संस्थेचा हेन्री अध्यक्ष बनला. ‘नॅशनल सेंटर फॉर व्हॉलंटरी ॲक्शन’ या संघटनेचा तो अध्यक्ष होता (१९७०–७२). डिट्रॉइट शहराच्या पुनर्नियोजनाच्या कार्यास हेन्रीने मोठा हातभार लावला. १९६०–७९ या काळात तो फोर्ड उद्योगसमूहाचा प्रमुख कार्यकारी संचालक होता. फोर्ड प्रततिष्ठानाच्या अध्यक्षपदाचीही तसेच विश्वस्त म्हणून त्याने बरीच वर्षे जबाबदारी सांभाळली. संयुक्त राष्ट्रांकडेही अमेरिकेचा प्रतिनिधी म्हणून त्याने काम केले.
फोर्ड हा बहुदेशीय उद्योगांपैकी एक अग्रणी उद्योगसमूह असून जगातील बहुतेक देशांत त्याच्या दुय्यम शाखा कार्यकरीत आहेत. मोटरगाड्या व व्यापारी गाड्यांच्या उत्पादनाशिवाय, फोर्ड मोटर कंपनी ट्रॅक्टरचेही उत्पादन करते. कंपनीची संपूण मालकीची दुय्यम कंपनी ‘फिल्डो-फोर्ड कॉर्पोरेशन’ ही गृहोपयोगी उपकरणे तसेच इलेक्ट्रॉनीय वस्तू बनविते. १९७१ मध्ये फोर्ड कंपनीने ११५ लक्ष मोटरगाड्या व ट्रक यांची उत्तर अमेरिकेबाहेरील देशांत विक्री केली. १९७४ मध्ये ब्रिटनच्या फोर्ड कंपनीने सु. ५ लक्ष गाड्यांचे (३·८४ लक्ष मोटरी, १·३१ लक्ष व्यापारी वाहने व ६५,००० ट्रॅक्टर) उत्पादन केले.
संदर्भ : 1. Herndon, Booton, Ford : An Unconventional Biography of the Men and Their Times, New York, 1969.
2. Nevins, Allan Hill, Frank E., Ford : The Times, the Man, the Company, New York, 1954.
3. Nevins, Allan Hill, Frank E., Ford : Decline and Rebirth, 1933-1962, New York, 1963.
4. Rae, John B. Henry Ford, Englewood Cliffs, 1969.
गद्रे, वि. रा.