फोरॅमिनीफेरा : प्रोटोझोआ (आदिजीव) या प्राणिसंघाच्या सार्कोडिना (ऱ्हायझोपोडा) वर्गातील हा एक गण आहे. या गणातील सर्व प्राणी बहुतांशी सागरी व मुक्तजीवी (स्वतंत्रपणे जगणारे) आहेत. या गणात अंदाजे५०कुले, १,००० वंश आणि२०,०००जाती आहेत. यांपैकी बऱ्याचशा जातींचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) उपलब्ध आहेत. या जीवाश्मांचा अभ्यास केल्यानंतर या गणाचा५०कोटी वर्षाचा इतिहास मिळतो. काही शास्‍त्रज्ञांच्या मते या गणात अंदाजे१,४०० वंश आणि३४,००० जाती असाव्यात. त्यांपैकी सु.४,००० जाती जिवंत आहेत व बाकीच्या नामशेष झाल्या आहेत. जिवंत जातींतील बहुतेक सर्व प्राणी सूक्ष्म आहेत.

  

शरीरचना : फोरॅमिनीफेराचे शरीर एककोशिक (एकाच पेशीचे बनलेले) असून ते कवचात बंदिस्त असते. हे कवच या प्राण्यानेच तयार केलेले असते. हे कवच तयार झाल्यावर प्राण्याची वाढ थांबते. काही वेळा या कवचाची वाढ चालूच राहते आणि मुख्य कवचाच्या बाजूला फांद्या तयार होतात किंवा कवचात एकमेकांस जोडलेले कप्पे तयार होतात. कवचाची वाढ अखंड वा आवर्ती असू शकते, तसेच ती सरळ, नागमोडी किंवा सर्पिलही असू शकते. या कवचरचनेत निरनिराळ्या जातींत फेरबदलही असू शकतात. कवचात आणि कवचाबाहेर जीवद्रव्याचे (कोशिकेतील प्रथिनयुक्त जिवंत द्रव्याचे) परिवहन कवचांच्या रंध्रांतून होते. शेवटच्या कप्प्यातील रंध्र हे मोठे असते आणि त्याचा आकार व स्थिती त्या त्या जातीवर अवलंबून असतात. कवच नाजूक, जाड अगर दृढ असते. कवचावर निरनिराळे थर असतात. कवच कार्बनी पदार्थाचे, अभिश्लिष्ट किंवा कॅल्शियमयुक्त पदार्थाचे बनलेले असते. या गणातील काही वंशांतील प्राण्यांचे कवच प्रथिन आणि म्युकोपॉलिसॅकॅराइड यांचे बनलेले असते. अभिश्लिष्ट कवचात बारीक कण किंवा कवचाचेच कण चिकट पदार्थाने एकमेकांस जोडलेले असतात. काही कवचात विशिष्ट प्रकारचेच कण असतात, तर काहींत असे काही वैशिष्ट्य नसते. काही कवचे मॅग्‍नेशियम कॅल्साइटाच्या सुयांसारख्या स्फटिकांची व कार्बनी पदार्थाची बनलेली असतात. या कवचांना रंध्रे नसतात. कवचामधील रंध्रे अगदी बारीक किंवा मोठी असू शकतात. ही रंध्रे इतस्ततःविखुरलेली अगर एकाच ठिकाणी असतात. या रंध्रांतून प्राण्याचे सूक्ष्म बारीक तंतूसारखे पादाभ [ हालचाल करू शकणाऱ्या पण तात्पुरत्या असणाऱ्या कोशिकीय वाढी ⟶पादाभ] बाहेर येऊ शकतात. काही प्राण्यांमध्ये कवचाला एकच मोठे छिद्र असते व या एकाच छिद्रावाटे सर्व पादाभ बाहेर येतात. दोन्ही प्रकारांमध्ये पादाभांचा उपयोग अन्नग्रहण व हालचाल यांसाठीच केला जातो. या सूक्ष्म तंतूसारख्या पादाभांच्या जाळ्यात भक्ष्य पकडले जाते. भक्ष्य पुष्कळ वेळा कवचाच्या बाहेर पादाभाकडून शोषिले जाते व डायाटमाच्या (लहान गोळ्या ठेवण्याच्या डबीसारखे शरीर असणाऱ्या अतिसूक्ष्म एककोशिक वनस्पतीच्या) कवचासारखा न पचणारा भाग बाहेर टाकला जातो.

काही कवचांत प्रकाशाचे प्रेषण करण्याची (पार जाऊ देण्याची) क्षमता असते. हे प्रेषण कवच कोणत्या पदार्थापासून बनले आहे यावर अवलंबून असते. काही कवचे रंगीत असतात. हा रंगही कवच कोणत्या पदार्थापासून बनले आहे, त्यावर अवलंबून असतो.

आ.१. निरनिराळ्या फोरॅमिनीफेरांची कवचे : (अ) सॅकमिना (आ) लॅगिना : (१) कवचाचे रंध्र (इ) नोडोसारिया (डावीकडे पृष्ठीय दृश्य व उजवीकडे छेद) : (१) कवचाचे रंध्र (ई) फ्राँडीक्यूलॅरिया (वरच्या बाजूला पृष्ठीय दृश्य व खालील बाजूस छेद) : (१) कवचाचे रंध्र (उ) स्पायरोलॉक्यूलिना (वरच्या बाजूला पृष्ठीय दृश्य व खालील बाजूस छेद) : (१) कवचाचे रंध्र (ऊ) परस्परव्यापी मंडले असलेले कवच (ए) ग्लॉबिजेरीना (ऐ) डिस्कॉर्बिना (ओ१) पूरक कंकालरहित (सांगाडा नसलेले) वलयीकृत कवच (ओ२) पूरक कंकाल असलेले कवच : (१) पूरक कंकाल, (२) कवचाचे रंध्र.

कवचाच्या आत गतिशील जीवद्रव्य असते. हे जीवद्रव्य रंध्राजवळ किंवा कवचाच्या आतील पृष्ठभागावर पसरलेले असते. या जीवद्रव्यापासून पादाभ तयार होतात व ते रंध्रातून अगर कवचाच्या मुखातून बाहेर येतात. हे पादाभ खंडिकामय (विभागणाऱ्या व पुढे आलेल्या गोलसर खंडांनी युक्त) नसतात आणि त्यांना अक्षीय कणाही नसतो.  

नितलस्थ (समुद्राच्या तळाशी राहणाऱ्या) प्राण्यांचे संचलन त्यांच्या पादाभांच्या साहाय्याने होते. हे संचलन प्राण्याच्या आयुष्यात फार फार तर काही सेंटिमीटरच असू शकते. बरेचसे प्राणी स्थानबद्धतेतच सर्व आयुष्य घालवितात. समुद्राच्या पृष्ठभागावर प्लवकांत (स्वतःची गती नसलेल्या व जलपृष्ठावर तरंगणाऱ्या सजीवांत) राहणारे फोरॅमिनीफर मात्र पाण्याच्या प्रवाहाबरोबर खूप दूरवर जाऊ शकतात.  

प्लवकांत राहणारे फोरॅमिनीफर फक्त दोन कुलांत विभागले आहेत. त्यांची कुले जरी थोडी असली, तरी त्यांची संख्या खूप आहे व ते जगाच्या सर्व भागांत पसरले आहेत. जेव्हा समुद्राच्या पृष्ठभागावर त्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होतो तेव्हा त्यांची रिकामी कॅल्शियमयुक्त कवचे समुद्राच्या तळाशी जातात व तेथे त्यांचा मोठा थर बनतो. याला ⇨ ऊझ म्हणतात. यांपैकी मुख्य म्हणजे ग्लॉबिजेरीना ऊझाने ३० प्रतिशत समुद्रतळ व्यापला आहे. फोरॅमिनीफेरांची वाढ आणि प्रजोत्पत्ती तापमान, समुद्राची खोली, पाण्याचा खारेपणा, योग्य असाअन्नपुरवठा आणि ऑक्सिजनची उपलब्धता यांवर अवलंबून असते.  


अन्न म्हणून हे प्राणी शैवले, शैवलांची बीजुके (सूक्ष्म प्रजोत्पादक अवयव), सूक्ष्मजंतू आणि कार्बनी पदार्थ यांचा उपयोग करतात. निरनिराळे रंगयुक्त अन्न ग्रहण केल्यामुळे पुष्कळदा जीवद्रव्य रंगीत दिसू  

आ.२. फोरॅमिनीफेरांचे निरनिराळे आकार : (अ) ॲलोग्रोमिया : (१) कवच, (२) कवचाचे रंध्र, (३) अन्नकण (आ) रोटॅल्टा : (१) अन्नकण (इ) स्‍क्‍वॅम्युलिना (ई) मिलिओला (ई­१) जिवंत प्राणी : (१) कवचाचे रंध्र (ई२) मारलेला व अभिरंजित (सूक्ष्मदर्शकीय परीक्षणासाठी विशिष्ट रंगीत द्रव्याने रंगविलेला) प्राणी : (१) कवचाचे रंध्र, (२) केंद्रक.

 लागते आणि त्यामुळे पारदर्शक कवच असलेले फोरॅमिनीफर निरनिराळ्या रंगांचे आढळतात.  

ह्या प्राण्याच्या जीवद्रव्यात त्याच्या वाढीनुसार एक किंवा अनेक केंद्रके (कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारे जटिल गोलसर पुंज) असतात. केंद्रके गोल किंवा अंडाकृती असतात. काही जाती बहुकोशिकही असतातपण सर्वसाधारण एककोशिक जातींचे प्रमाण जास्त आहे. बहुकोशिक प्राण्यांत वाढ होताना कवचाचे कप्पेही वाढतातपण एककोशिक प्राण्यांत वाढ होताना कवचाचे आकारमान मोठे होते. कप्प्यांची वाढ कालमानाप्रमाणे क्रमाने होते. एक कप्पा तयार होण्यास एका किंवा थोड्या जास्त दिवसांचा अवधी लागतो. पुष्कळसे नितलस्थ फोरॅमिनीफर तळातील शैवलांमध्ये दडून राहतात व तेथेच त्यांचे प्रजोत्पादन होते. समुद्रतळाशी राहणारे फोरॅमिनीफर पुष्कळशा प्राण्यांच्या भक्ष्यस्थानीही पडतात. काहींचा नाश परजीवी (दुसऱ्या जीवावर उपजीविका करणाऱ्या) प्राण्यांकडून तसेच सूक्ष्मजंतू, प्रोटोझोआ व कृमी यांच्याकडूनही होतो.  

प्रजोत्पादन : बऱ्याचशा जातींत प्रजोत्पादन अलैंगिक प्रकाराने होते. मुकुलन या प्रकारात जीवद्रव्यावर कलिका निर्माण होतात व या कलिकांपासून नवीन फोरॅमिनीफर तयार होतो. काही प्राण्यांत जीवद्रव्याचे भाग होतात व प्रत्येक भागापासून नवीन प्राणी तयार होतोपण या दोन्ही प्रकारांपेक्षा मूळ कोशिकेचे पुष्कळ भाग होऊन प्रत्येक भागापासून नवीन प्राणी व त्याचे कवच तयार होणे हा प्रकार पुष्कळ जातींत आढळतो. असे नवीन प्राणी तयार झाले की, ते जनक कवचातून बाहेर पडतात आणि नवी कोशिका व तिच्याभोवती नवे कवच तयार करतात. जुने कवच समुद्रतळाशी राहते व अशा असंख्य कवचांपासून यथाकाल मोठमोठे खडक तयार होतात.  

लैंगिक प्रजोत्पादनात जनक जीवद्रव्याचे विभाजन होऊन त्यापासून कशाभिकायुक्त (चाबकाच्या दोरीसारख्या लांब, नाजूक व बारीक जीवद्रव्यीय संरचनेने युक्त असलेली) किंवा प्रोटोझोआसदृश युग्मके (प्रजोत्पादक कोशिका) तयार होतात. या युग्मकांचा संयोग होऊन त्यापासून प्रोटोझोआसदृश युग्मज तयार होतो. या युग्मजापासून पुढे अलैंगिक प्रकाराने प्रजोत्पत्ती होऊन नवीन प्राणी अस्तित्वात येतात. जनक प्राण्याचे कवच सोडून नवीन युग्मजापासून नवीन कवच तयार केले जाते. काही जातींत युग्मके पाण्यात सोडली जातात व त्यांचा संयोगही पाण्यातच होतो. काही जातींत युग्मके एका पुटीत ठेवली जातात व तेथे त्यांचा संयोग होऊन त्यांपासून युग्मज तयार होतो. पुटी फुटल्यावर हे युग्मज बाहेर येतात व त्यांपासून तयार होणारा प्राणी आपले आयुष्य जगू लागतो. एका जातीपासून होणारी युग्मके साधारण सारखीअसतात. काही जातींत फक्त दोन निराळ्या जनक कोशिकांतून निर्माण झालेल्या युग्मकांचाच संयोग होतो, तर काहींत एकाच कोशिकेत निर्माण झालेल्या युग्मकांचा संयोग होतो, तर काहींत एकाच कोशिकेत निर्माण झालेल्या युग्मकांचा संयोग होतो. पुष्कळ फोरॅमिनीफेरांच्या जीवनचक्रात पिढ्यांचे एकांतरण [⟶ एकांतरण, पिढ्यांचे ] आढळते परंतु यासंबंधी शास्‍त्रज्ञांमध्ये एकमत नाही. ज्या पिढीत केंद्रकात एकगुणित गुणसूत्रे  [⟶ गुणसूत्र ] असतात, ती लैंगिक पिढी होय. या प्राण्यापासूनच युग्मके तयार होतात व त्यांचा संयोग होऊन युग्मज बनतो. या युग्मजापासून जी पिढी तयार होते, तिच्या केंद्रकात द्बिगुणित (दुप्पट) गुणसूत्रे असतात आणि यापासूनच समविभाजनाने अलैंगिक प्रजोत्पादन होते. काही पिढ्या याप्रमाणे निर्माण झाल्यावर केंद्रकाचे अर्धसूत्रण विभाजन  [⟶ कोशिका ] होऊन जी युग्मके तयार होतात ती एकगुणित असतात व त्यांपासून वर उल्लेखिलेले लैंगिक प्रजोत्पादन होते.  [⟶प्रजोत्पादन ].

जीवाश्मवृत्त : फोरॅमिनीफेराचे जीवाश्मवृत्त फार उद्‍बोधक आहे. यांचे कँब्रियन कल्पातील (सु.६० कोटी वर्षापूर्वीपासून ते५० कोटी वर्षापूर्वीपर्यंतच्या काळातील) जीवाश्म हे त्या काळात आढळणाऱ्या इतर जीवाश्मांपेक्षा जुने आहेत. [⟶ पुराप्राणिविज्ञान ]. याच्या जीवाश्मवृत्तात निरनिराळ्या क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) रेषा आढळतात. मायोसीन कल्पापर्यंत (सु. २कोटी वर्षापूर्वीच्या काळापर्यंत) याच्या बऱ्याच जाती नामशेष झाल्या. यापुढील काळात अस्तित्वात असलेल्या जातींचे सध्याच्या जातींशी पुष्कळच साम्य आहे.  

सध्या अस्तित्वात असलेल्या फोरॅमिनीफेरांच्या अभ्यासावरून जमिनीचे व खडकांचे अंदाज घेणे शक्य झाले आहे. या अभ्यासात प्रामुख्याने कवचात असलेली लेशमूलद्रव्ये, नितलस्थ व प्लवकस्थ फोरॅमिनीफेरांचे प्रमाण, अभिश्लिष्ट व कॅल्शियमयुक्त कवचांचे प्रमाण व कवचांचा आकार व संरचना यांचा समावेश होतो. याबरोबरच पाण्याची खोली, किनाऱ्यापासून समुद्रतळाचे अंतर, तळातील चढउतार आणि तळाशी असलेले ऑक्सिजनाचे प्रमाण यांचाही विचार करावा लागतो. ⇨स्तरविज्ञानाच्या अभ्यासावरून खनिज तेलाच्या अस्तित्वाचे काही अंदाज बांधले जातात व या स्तरवैज्ञानिक अभ्यासात फोरॅमिनीफेराच्यावरील अभ्यासाची खूप मदत होते. यावरून फोरॅमिनीफेराच्या अभ्यासाचे महत्त्व लक्षात येते.

 पहा : पुराप्राणिविज्ञानप्रोटोझोआ.  

संदर्भ : 1. Cushman, J. A. Foraminifera : Their Classification and Economic Use, Cambridge, Mass., 1948.

            2. Harmer, S. F., Shipley, A. E. Ed. The Cambridge Natural History, Vol.I, Codicote, 1968. 

इनामदार, ना. भा.जोशी, लीना