प्वासाँ, सिमेआँ देनिस : (२१ जून १७८१–२५ एप्रिल १८४०). फ्रेंच गणितज्ञ. निश्चित समाकाल [⟶ अवकलन व समाकलन], विद्युत् चुंबकीय सिद्धांत व संभाव्यताशास्त्र या विषयांतील कार्याकरिता विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म प्रितिव्हिएर्स येथे झाला. सुरुवातीला त्यांनी वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला पण तो सोडून त्यांनी गणिताचा अभ्यास करण्यासाठी पॅरिस येथील एकोल पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश केला. तेथे सुप्रसिद्ध गणितज्ञ जे. एल्. लाग्रांझ व पी. एस्. एम्. द लाप्लास यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अभ्यास केला. १८०२ मध्ये एकोल पॉलिटेक्निकमध्ये ते दुय्यम प्राध्यापक व १८०६ मध्ये प्राध्यापक झाले. १८०८ साली ब्यूरो दे लाँजिंट्यूड्समध्ये ज्योतिर्विद म्हणून त्यांची नेमणूक झाली. पॅरिस विद्यापीठात विज्ञान शाखेची १८०९ मध्ये स्थापना झाल्यावर प्वासाँ यांची तेथे गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. तेथेच अखेरपर्यंत त्यांनी गणितीय संशोधन व अध्यापन केले.
त्यांचे सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे विद्युत् व चुंबकत्व, यामिकी (प्रेरणांचे पदार्थावर होणारे परिणाम व त्यामुळे निर्माण होणारी गती यांविषयीच्या अभ्यासाचे शास्त्र) आणि भौतिकीतील इतर शाखांमध्ये त्यांनी केलेल्या गणिताच्या उपयोगासंबंधीचे आहे. त्यांचा Trait de mecanique (२ खंड, १८११, १८१३) हा ग्रंथ यामिकीवरील प्रमाणभूत ग्रंथ म्हणून कित्येक वर्षे मानला जात होता. १८१२ मध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेल्या एका निबंधात विद्युत् स्थितिकीतील (वस्तुतः स्थिर स्थितीत असलेल्या विद्युत् भारांसंबंधीच्या शास्त्रातील) अतिशय उपयुक्त नियमांपैकी बरेच नियम मांडलेले होते, तसेच विद्युत् ही दोन द्रायूंची (प्रवाही पदार्थांची) बनलेली असून त्यांतील समान मूलतत्त्वे अपसारित होतात व असमान मूलतत्त्वे आकर्षित होतात, असा सिद्धांत मांडला होता. प्वासाँ यांनी चुंबकित पदार्थातील प्रेरणांच्या बाबतीत वर्चस् सिद्धांताचा [वर्चस् फलनांच्या गणितीय सिद्धांताचा ⟶ वर्चस्] उपयोग करून चुंबकीय स्थितिकीचा (स्थिर स्थितीतील चुंबकीय क्षेत्रांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राचा) पाया घातला. केशाकर्षण क्रिया [घन पदार्थाला जेथे द्रव स्पर्श करतो तेथे त्याचा पृष्ठभाग वर वा खाली जाण्याला कारणीभूत होणारी क्रिया ⟶ कैशिकता] व उष्णतेविषयीचा गणितीय सिद्धांत या विषयांवर त्यांनी अनुक्रमे १८३१ व १८३५ मध्ये ग्रंथ प्रसिद्ध केले. वर्चस् सिद्धांतातील प्वासाँ समाकाल व प्वासाँ समीकरण, आंशिक अवकल समीकरणांतील [⟶ अवकल समीकरणे] प्वासाँ कंस, ⇨स्थितिस्थापकतेतील प्वासाँ गुणोत्तर व उष्णताशास्त्रातील प्वासाँ स्थिरांक [वायू स्थिरांक R व स्थिर दाबाखालील वायूची विशिष्ट उष्णता Cp यांचे गुणोत्तर ⟶ उष्णता] हे प्वासाँ यांच्या विविध विषयांतील कार्याचे निदर्शक आहेत. खगोलशास्त्रामध्ये त्यांनी ग्रहांच्या कक्षांचे स्थैर्य, पृथ्वीची गुरुत्वमध्याभोवतीची गती वगैरे विषयांवर निबंध लिहिले.
शुद्ध गणितात त्यांनी निश्चित समाकाल व ⇨ फूर्ये श्रेढी या विषयांवर महत्त्वाचे निबंध लिहिले. फूर्ये श्रेढीवरील त्यांच्या कार्यामुळे पी. जी. एल्. डीरिक्ले व जी. एफ्. बी. रीमान यांच्या या विषयातील महत्त्वाच्या कार्याचा पाया घातला गेला. प्वासाँ यांनी मांडलेला समाकल डीरिक्ले यांच्या मर्यादा-मूल्यांसंबंधीच्या प्रश्नात [⟶ अवकल समीकरणे] उपयुक्त ठरला. १८३७ मध्ये त्यांनी संभाव्यताशास्त्रासंबंधी लिहिलेल्या Recherches Sur la Probabilite des judgements या ग्रंथांत प्वासाँ वंटन किंवा मोठ्या संख्यांविषयीचा प्वासाँ नियम या नावाने ओळखण्यात येणारा नियम मांडला [⟶ वंटन सिद्धांत]. हा नियम झाक बेर्नुली यांच्या द्विपद नियमाचे आसन्नीकरण (यथार्थाच्या जवळ जाणारा) म्हणून मांडलेला असला, तरी आता तो किरणोत्सर्ग (कण वा किरण बाहेर टाकण्याच्या काही विशिष्ट पदार्थाचा गुणधर्म), वाहतूक इत्यादींसंबंधीच्या समस्यांत मूलभूत महत्त्वाचा ठरला आहे.
प्वासाँ यांनी ३०० हून अधिक संशोधनपर निबंध लिहिले. १८१२ मध्ये फ्रान्सच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेवर सदस्य म्हणून व १८१८ मध्ये इंग्लंडच्या रॉयल सोसायटीचे परदेशी सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. १८३७ मध्ये फ्रेंच सरकारने त्यांना उमराव (पिअर) केले. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.
ओक, स. ज. मिठारी, भू. चि.
“