प्लोटायनसचे शीर्षशिल्प : ऑस्तीया (इटली) येथील संग्राहालय.

प्लोटायनस : (२०५–२७०). तिसऱ्या शतकातील एक श्रेष्ठ आध्यात्मिक तत्त्ववेत्ता आणि नव-प्लेटो मताचा संस्थापक. प्लोटायनसचा शिष्य पॉर्फिरी (सु. २३२ –सु. ३०४) याने संपादित केलेल्या प्लोटायनसच्या ग्रंथसंग्रहाला प्रस्तावना म्हणून त्याचे जे चरित्र जोडले आहे, त्यातून प्लोटायनसच्या जीवनाविषयीची काही माहिती मिळू शकते. प्लोटायनसचा जन्म बहुधा ईजिप्तमधील लायकॉपलिस (सध्याचे अस्यूत) येथे झाला असावा.

ॲलेक्झांड्रिया येथील ॲमोनिअस सॅकस (१७०–२४१) हा तत्त्ववेत्ता प्लोटायनसचा तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात गुरू होता. ⇨ ऑरिजेन (सु. १८५–सु. २५४) हा ख्रिस्ती धर्मशास्त्रवेत्ता आणि लाँजायनस (सु. २१३–२७३) हा साहित्यशास्त्रवेत्ता हे प्लोटायनसचे गुरूबंधू होते. ॲमोनिअस सॅकसपाशी सु. ११ वर्षे अध्ययन केल्यानंतर प्लोटायनस हा सम्राट तिसरा गॉर्डिएनस (सु. २२४–२४४) ह्याच्या सैन्याबरोबर पर्शियाच्या (इराणच्या) स्वारीवर गेला. पर्शिया आणि भारत ह्या देशांतील पारंपरिक आध्यात्मिक ज्ञानाचा परिचय करून घ्यावा हा त्याचा उद्देश होता पण गॉर्डिएनसची २४४ मध्ये हत्या झाल्यानंतर प्लोटायनसला पळून जावे लागले. तो रोम येथे आला (२४५) आणि तेथे त्याने आपले बस्तान बसवून तत्त्वज्ञानाचे पीठ चालविले. गॅलिईनस (कार. २६०–६८) ह्या रोमन सम्राटाचा विश्वास त्याने संपादन केला. प्लेटोने घालून दिलेल्या नेमनियमांनुसार जीवन व्यतीत करू पाहणाऱ्या व्यक्तींची वसाहत स्थापन करावी ह्या उद्देशाने गॅलिईनसकडून जागा मिळविण्याचा त्याचा बेत होता पण तो काही दरबारी अधिकाऱ्यांच्या विरोधामुळे तडीला गेला नाही. गॅलिईनसचा वध (२६८) झाल्यानंतर दोन वर्षांनी प्लोटायनसचा, बहुधा कुष्ठरोगामुळे, मृत्यू झाला.

प्लोटायनसचे ग्रंथ पॉर्फिरी ह्या त्याच्या शिष्याने संपादित केलेल्या आवृत्तीत उपलब्ध आहेत. ह्या आवृत्तीत प्लोटायनसचे लिखाण सहा विभागांत विषयवारीने संकलित करण्यात आले आहे. प्रत्येक विभागात नऊ प्रबंध समाविष्ट करण्यात आले असल्यामुळे त्यांना एनिअड्स असे नाव देण्यात आले आहे. ह्याशिवाय पॉर्फिरीने ह्या प्रबंधांची, त्यांच्या रचनेच्या काळाला अनुसरून तीन कालखंडांत विभागणी केली आहे. हे तीन कालखंड म्हणजे २५३–२६३ (पॉर्फिरी प्लोटायनसचा शिष्य होण्यापूर्वीचा), २६३–२६८(पॉर्फिरी प्लोटायनसचा शिष्य असतानाचा), आणि २६८–२७० (पॉर्फिरी प्लोटायनसचा सोडून गेल्यानंतरचा कालखंड) हे होत.

तत्त्वज्ञान : प्लोटायनसच्या तत्त्वज्ञानावर मुख्यतः ⇨ प्लेटो (इ.स.पू.सु. ४२८- सु. ३४८) आणि ⇨ स्टोइक मत यांचा प्रभाव आढळतो. इंद्रियगोचर विश्वाच्या पलीकडले असे बुद्धिग्राह्य अस्तित्व आहे, हे अस्तित्व एका सर्वश्रेष्ठ तत्त्वाचा–ह्याला प्लेटो ‘एकम्’ म्हणतो–आविष्कार आहे, एकम् हे तत्त्व ज्ञानाच्या पलीकडे असलेले, अनिर्वचनीय असे आहे आणि तरीही त्याच्या ठिकाणी चैतन्य व गती असते हे सिद्धांत प्लेटोच्या रिपब्लिक, सॉफिस्ट, पार्मेनिडीझ इ. संवादांपासून प्लोटायनसने स्वीकारले. ह्याबरोबरच एका बाजूला सत् असलेली बुद्धिगम्य रूपे, आणि दुसऱ्या बाजूला ज्याला स्वतःचा आकार नसतो पण बुद्धिगम्य रूपे ज्याला आकारित करू शकतात असे ‘अनिर्धारित’ द्रव्य हे द्वंद्वही प्लेटोकडून त्याने स्वीकारले. सबंध विश्वात एक दिव्य तत्त्व ओतप्रोत भरून राहिलेले आहे, हा सिद्धांत त्याने स्टोइक मतापासून स्वीकारला आहे. 

प्लोटायनसच्या तत्त्वज्ञानाचा सारांश थोडक्यात असा देता येईल : अस्तित्वात असलेल्या प्रत्येक वस्तूचे सारभूत असे एक तत्त्व आहे. हे सर्वश्रेष्ठ आणि अंतिम सत् होय. ह्या तत्त्वाला प्लोटायनस एकम् म्हणतो. ते निर्गुण, निराकार आणि अविभक्त असते. स्वतःमधून अनेकतेला वर्ज्य करणारे असे ते असल्यामुळे, ते ज्ञानविषयही नसते आणि ज्ञाताही नसते. अस्तित्वात जी अनेकता आहे तिचे स्पष्टीकरण ‘निःसारण’ ह्या संकल्पनेचा उपयोग करून प्लोटायनस करतो. एकम्‌मध्ये जी अतिरिक्त समृद्धता असते ती ओसंडून एकम्‌च्या पलीकडे जाते आणि त्याच्याहून भिन्न पदार्थ अस्तित्वात येतात . पण ह्या भिन्न पदार्थांचेही एकम् हे अंतर्यामी तत्त्व असते. ह्या दृष्टीने पाहता, निःसारण ही शुभ व मंगल अशी प्रक्रिया आहे. पण नि:सारण हे एका प्रकारचे पतन होय अशीही कल्पना प्लोटायनसमध्ये आहे. तिला अनुसरून एकम्‌हून भिन्न असलेले अस्तित्व अमंगल ठरते. एकम्‌पासून निःसारणाने बुद्धितत्त्व, आत्मे आणि जडद्रव्य अस्तित्वात येतात. एकम् हे तत्त्व जरी ज्ञानाच्या पलीकडे असले, तरी जीवात्मा त्याच्याशी तादात्म्य साधू शकतो. ह्यासाठी जीवात्म्याला एकम्‌प्रमाणेच ‘साधे’, ‘एकाकार’, ‘केवल’ बनावे लागते. एकम्‌शी साधलेल्या ह्या अवस्थेचे वर्णन तो ‘उन्मनावस्था’, ‘शरणताभाव’ अथवा ‘एकाकीने एकाकीकडे केलेले उड्डाण’ ह्या शब्दांनी करतो. आत्म्याला स्वतःचे नैतिक शुद्धीकरण करूनच ही अवस्था साधता येते.

एकतावादी आणि गूढवादी नैतिक-आध्यात्मिक जीवनसरणीला प्लोटायनसने आपल्या दर्शनाद्वारा तत्त्वज्ञानात्मक अधिष्ठान प्राप्त करून दिले. ⇨ पायथॅगोरस  (इ.स.पू. सु. ५७५–४९५) आणि प्लेटो ह्या पूर्वीचार्यांनी विकसित केलेल्या संकल्पना आणि सिद्धांत यांना नवीन रूप देऊन आणि त्यांच्या आशयाचा विस्तार करून त्याने आपले समृद्ध तत्त्वज्ञान रचले. विशेषतः ख्रिस्ती गूढवादी धार्मिक साधनेवर त्याचा खोल प्रभाव पडला आहे.

पहा : नव-प्लेटो मत. 

संदर्भ : 1. Brehier, Emile Trans. Thomas, J. Philosophy of Plotinus, Chicago, 1958.

           2. Inge, William, The Philosophy of Plotinus, 2. Vols., London, 1929.

           3. MacKenna, Stephen  Page, B. S Trans. Plotinus: The Six Enneads, London, 1952.

रेगे, मे. पुं.