प्लांक, माक्स कार्ल एर्न्स्ट लूटव्हिख : (२३ एप्रिल १८५८-३ ऑक्टोबर १९४७). जर्मन भौतिकीविज्ञ. सुप्रसिद्ध ⇨ पुंज सिद्धांताचे जनक व १९१८ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म कील येथे झाला. म्यूनिक व बर्लिन येथील विद्यापीठांत गुस्टाफ किरखोफ व हेर्मान फोन हेल्महोल्ट्स या नामवंत शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिक्षण झाले. ⇨ऊष्मागतिकीच्या दुसऱ्या नियमावर प्रबंध लिहून त्यांनी १८७९ मध्ये म्यूनिक विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी मिळविल्यानंतर त्याच विद्यापीठात (१८८०-८५) व नंतर कील (१८८५-८९) येथे ते भौतिकीचे प्राध्यापक होते. १८८९ मध्ये बर्लिन विद्यापीठात किरखोफ यांच्या जागेवर प्लांक यांची
नेमणूक झाली व तेथेच १९२६ मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी अध्यापन केले. त्यानंतर शास्त्रीय संशोधनाकरिता खास स्थापन करण्यात आलेल्या कैसर व्हिल्हेल्म सोसायटीचे ते १९३०-३७ मध्ये अध्यक्ष होते. याच संस्थेचे पुढे माक्स प्लांक सोसायटी असे नामांतरण करण्यात आले.
किरखोफ यांच्या मार्गदर्शनाखाली प्लांक यांनी सुरूवातीला ऊष्मागतिकीसंबंधी संशोधन केले. ⇨एंट्रॉपी, ऊष्माविद्युत् (उष्णतेचे सरळ विद्युत् ऊर्जेत होणारे रूपांतर) व विरल विद्रावांचा सिद्धांत याविषयी त्यांचे निबंध त्या वेळी प्रसिद्ध झाले. प्लांक यांचे प्रमुख कार्य कृष्ण पदार्थाच्या (सर्वच्या सर्व आपाती प्रारण-पडणारी तरंगरूपी ऊर्जा-शोषून घेणाऱ्या व तापविला असता संपूर्ण प्रारण उत्सर्जित करणाऱ्या आदर्श व काल्पनिक पदार्थाच्या) प्रारणासंबंधीचे आहे [⟶ उष्णताप्रारण]. कृष्ण पदार्थाने उत्सर्जित केलेल्या ऊर्जेच्या तरंगलांबीचे वितरण आणि त्याचे तापमान यांतील संबंधाचे प्रत्यक्ष प्रयोगाने केलेले निरीक्षण आणि लॉर्ड रॅली इत्यादींनी मांडलेली सूत्रे यांत तफावत असल्याचे आढळून आले होते. प्लांक यांनी ऊर्जा व प्रारणाची कंप्रता (एका सेकंदात होणाऱ्या कंपनांची संख्या) यांतील संबंध शोधून काढला आणि तो प्रस्थापित करण्यासाठी प्रारण ऊर्जा ही फक्त पृथक् मूल्ये घेते किंवा पुंजांच्या (क्वांटाच्या) स्वरूपात उत्सर्जित होते, या क्रांतिकारक गृहीतकाचा आधार घेतला. v कंप्रतेच्या अनुस्पंदकाची [विशिष्ट कंप्रतेला अनुस्पंदन दर्शविणाऱ्या प्रयुक्तीची ⟶ अनुस्पंदन] ऊर्जा hv असते, येथे ℎ हा स्थिरांक असून त्याला आता प्लांक स्थिरांक असे नाव प्राप्त झाले आहे. प्लांक यांनी १९०० साली मांडलेली पुंजाची कल्पना ही भौतिकीच्या विकासातील एक अतिशय महत्त्वाची पायरी ठरलेली आहे. सुरूवातीला प्लांक यांच्या शोधाचे महत्त्व व अभिजात भौतिकीवर त्याचे होणारे परिणाम यांचे योग्य मूल्यमापन झाले नाही. तथापि ⇨प्रकाशविद्युत् परिणामाचे ॲल्बर्ट आइन्स्टाइन यांनी केलेले स्पष्टीकरण आणि यासारखेच अभिजात सिद्धांत व प्रत्यक्ष निरीक्षित घटना यांतील फरकांचे स्पष्टीकरण करणे पुंज सिद्धांतामुळेच शक्य झाले.
प्लांक यांची १८९६ मध्ये प्रशियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसवर निवड झाली व १९१२ मध्ये त्यांना या संस्थेचे कायम सचिव करण्यात आले. ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे (१९२६) व अमेरिकेच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य होते. रॉयल सोसायटीने १९२८ साली त्यांना सन्मानपूर्वक कॉप्ली पदक दिले.
“