प्रेरक तंत्र : तंत्रिका तंत्राचे [ मज्जासंस्थेचे ⟶ तंत्रिका तंत्र] जे विशिष्ट भाग स्नायूंचे आकुंचन व
ग्रंथिस्त्रावोत्पादन यांवर नियंत्रण व नियमन करतात, त्यांचा समावेश प्रेरक तंत्रात केला जातो. शारीरिक क्रियांवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य तंत्रिका तंत्रामार्फत केले जाते. यामध्ये (१) ऐच्छिक स्नायूंच्या आकुंचनावरील नियंत्रण, (२) अंतःस्थ अवयवातील अनैच्छिक स्नायूंचे नियंत्रण आणि (३) ⇨ अंतःस्त्रावी ग्रंथी व बहिःस्त्रावी ग्रंथी यांच्या स्त्रावोत्पादनाचे नियंत्रण या कार्याचा समावेश होतो. तंत्रिका तंत्राच्या तिन्ही मिळून होणाऱ्या कार्याला प्रेरक कार्य म्हणतात. ग्रंथी व स्नायू यांच्याद्वारे सजीव प्राणी परिसरीय परिस्थितीला अनुरूप असा प्रतिसाद देऊ शकतो. प्राण्यांची वर्तणुकीसंबंधीची यंत्रणा या दोन्ही प्रकारच्या अवयवांच्या प्रतिसादातून कार्यान्वित होते. ह्रदयाचे स्नायू, काही ग्रंथी व काही अनैच्छिक स्नायू तंत्रिका तंत्राच्या नियंत्रणाशिवाय स्वतंत्र रीत्या कार्य करू शकतात परंतु अशा कार्यात सुसूत्रतेचे प्रमाण कमी असते. ऐच्छिक स्नायू पूर्णपणे तंत्रिका तंत्राच्या नियंत्रणाखाली असतात. त्यांचा तंत्रिका पुरवठा खंडित झाल्यास ⇨ पक्षाघात (संबंधित स्नायूंच्या हालचालींचा अभाव) उत्पन्न होतो.
प्रस्तुत नोंदीत ऐच्छिक स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणाऱ्या प्रेरक तंत्राविषयीच माहिती दिली आहे.
विभाग : वर्णन सुलभतेकरिता या तंत्राचे पुढील विभाग पाडले आहेत : (१) मेंदूतील प्रेरक क्षेत्र, (२) मेंदूच्या इतर भागातील दुय्यम क्षेत्रे, (३) स्तूपमार्ग, (४) स्तूपबाह्यमार्ग, (५) काही मस्तिष्क तंत्रिकांची केंद्रके व त्यांपासून विशिष्ट स्नायूंपर्यंत जाणारे तंत्रिका तंतू, (६) मेरुरज्जूतील अग्र शृंग कोशिका व त्यांपासून स्नायूंपर्यंत जाणारे तंत्रिका तंतू.
मेंदूतील प्रेरक क्षेत्र : प्रमस्तिष्क गोलार्धाच्या [⟶ तंत्रिका तंत्र] बाह्यकावर (सर्वांत बाहेर
असणाऱ्या करड्या पट्ट्यावर) मध्यभागी खोल सीता (खाच) असते व तिला मध्य सीता किंवा रोलांदो सीता (लूईजी रोलांदो या इटालियन शारीरविज्ञांच्या नावावरून) म्हणतात. या सीतेच्या पुढच्या भागातील तीन-चार संवेलके (वळ्या) मिळून जे क्षेत्र बनते, त्याला प्रेरक क्षेत्र म्हणतात. कारण या ठिकाणच्या तंत्रिका कोशिकांचे (पेशींचे) विद्युत् उद्दीपन स्नायूंच्या हालचाली उत्पन्न करते, तर हा भाग शस्त्रक्रियेने काढून टाकल्यास पक्षाघात होतो. या क्षेत्रातील कोशिका विशिष्ट प्रकारच्या असून त्यांना प्रेरक तंत्रिका कोशिका म्हणतात. प्रयोगशाळेत बेशुद्ध केलेल्या प्राण्यांच्या मेंदूवर आणि मानवी मेंदूवरील शस्त्रक्रियेच्या वेळी विद्युत् उद्दीपने वापरून या क्षेत्राची बरीच माहिती मिळविण्यात आली आहे. दोन प्रमस्तिष्क गोलार्धांपैकी प्रत्येक गोलार्ध शरीराच्या विरुद्ध बाजूच्या अर्ध्या भागातील स्नायूंवर नियंत्रण करतो. म्हणजेच उजवा गोलार्ध डाव्या शरीरभागातील स्नायूंवर आणि डावा गोलार्ध उजव्या शरीरभागातील स्नायूंवर नियंत्रण करतो. कारण प्रेरक क्षेत्रातून निघणारे पुष्कळसे संदेशवाहक तंत्रिका तंतू मेरुरज्जूत (पाठीच्या कण्यातून जाणाऱ्या तंत्रिका तंतूंच्या दंडगोलाकार दोरीसारख्या भागात) उतरण्यापूर्वीच उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे व्यत्यसित (ओलांडलेले) होतात.
विद्युत् उद्दीपनाच्या साहाय्याने बाह्यकाचा एकेक अगदी छोटा छोटा भाग उत्तेजित करीत शोध घेतला असता काही प्रमुख प्रेरक क्षेत्रे निश्चित करता येतात. मानवामध्ये मध्य सीतेच्या लगेच पुढे असलेले संवेलक व सीतेच्या अग्रभित्तीत खोलवर गेलेल्या क्षेत्राला प्रमुख प्रेरक क्षेत्र किंवा ‘स्तूप क्षेत्र’ म्हणतात. कारण या ठिकाणी ज्या प्रेरक तंत्रिक कोशिसा असतात त्यांना ‘महाकाय स्तूप (पिरॅमिडाच्या आकाराच्या) कोशिका’ किंवा ‘बेट्झ कोशिका’ (व्ही. ए. बेट्झ या रशियन शारीरविज्ञांच्या नावावरून) म्हणतात. त्यांची एकूण संख्या ३४,००० असावी. यांशिवाय छोट्या आकारमानाच्या प्रेरक तंत्रिका कोशिकाही इतरत्र असतात. या कोशिकांपासून निघणारे अक्षदंड (तंत्रिका तंतू) मेंदूच्या अधोबाह्यक भागातून खाली पांढऱ्या रंगाच्या ऊतकातून (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहातून) येतात व त्याला ‘अंतःप्रावर’ म्हणतात. अक्षदंडांचा जुडगा तेथून खाली उतरताना त्याला ‘स्तूप मार्ग म्हणतात’. त्याविषयीचे वर्णन पुढे आले आहे.
अनुदैर्घ्य विदरापासून (दोन प्रमस्तिष्क गोलार्धांमधील उभ्या खोल भागापासून) सुरुवात करून पूर्वमध्य संवेलकावर बाजूला व खाली उतरत गेले, तर अनुक्रमे पाय, पोट, हात व चेहरा यांच्या स्नायूंची प्रेरक क्षेत्रे लागतात. एकूण क्षेत्रातील, बारीकसारीक स्नायुगटांचे नियंत्रणा करणाऱ्या छोट्या मोठ्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या जागांचे आकारमान स्नायुसंख्येवर अवलंबून नसून त्या त्या गटाच्या कौशल्यपूर्ण स्वाभाविक उपयोगावर अवलंबून असते. उदा., हात व चेहरा यांच्या स्नायूंकरिता असलेले प्रेरक क्षेत्र त्यांच्या स्नायूंचे आकारमान शरीरातील इतर भागांच्या स्नायूंच्या आकारमानापेक्षा कमी असूनही विस्तृत असते.
प्रमुख प्रेरक क्षेत्राचे अचूक रेखांकन केले असता प्रत्येक स्नायूस वैयक्तिक, जवळजवळ टिंबासारखे प्रतिनिधित्व असल्याचे आढळते. हे प्रतिनिधित्व पूर्णपणे वेगळे नसून काही प्रमाणात सरमिसळ झालेली
असते. तरीदेखील बाह्यकात प्रत्येक स्नायूसाठी असे छोटे केंद्र आढळतेच की, ज्याच्या उद्दीपनामुळे तो स्नायू आकुंचन पावतो. अशा प्रकारे बाह्यकाची रचना परस्परव्यापी कोशिका गटांच्या स्तराची असते. प्रत्येक गट वैयक्तिक स्नायूंना तंत्रिका पुरवठा करणाऱ्या विशिष्ट प्रेरक तंत्रिका कोशिकांना चालना देण्यासाठी नियुक्त केलेला असतो. नैसर्गिक
स्थितीत वर येणारे तंत्रिका आवेग (तंत्रिका उद्दीपित झाल्यावर तिच्या मार्गे वाहून नेला जाणारा विक्षोभ) बाह्यक क्षेत्रात पोहोचल्यानंतर विशिष्ट कार्यच करतात. म्हणजेच विशिष्ट हालचालीसाठी जरूर असलेल्या स्नायूंना कार्यान्वित करण्यासाठी जरूर तेवढेच प्रेरक बिंदू ते उत्तेजित करतात. पियानो वाजविणारा वादक नियंत्रक पट्टीवरील योग्य ती पट्टी दाबून ज्याप्रमाणे विशिष्ट तारांची स्पंदने घडवून आणतो त्याप्रमाणे हे कार्य घडते.
प्रमुख प्रेरक क्षेत्राशिवाय शरीरातील स्नायूंसाठी आणखी दोन प्रेरक क्षेत्रे वर्णिलेली आहेत. यांपैकी ‘दुसरे प्रेरक क्षेत्र’ म्हणून ओळखले जाणारे क्षेत्र, पार्श्व सीतेत अथवा सिल्व्हिअन सीतेत (फ्रॅन्सिसकस सिल्व्हिअस या डच शारीरविज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या सीतेत) अंतर्भागात असते. त्याची रचना प्रमुख क्षेत्राप्रमाणेच असते परंतु ते खोल असल्यामुळे त्याचे निश्चित रेखांकन झालेले नाही. आणखी एक प्रेरक क्षेत्र प्रमस्तिष्क गोलार्धाच्या अभिमध्य पृष्ठभागावर असते व त्याला ‘पुरवणी प्रेरक क्षेत्र’ म्हणतात. पुरवणी क्षेत्राची विद्युत् उद्दीपनाची तलसीमा अधिक असते. त्यावर संमोहनकारी औषधांचा चटकन परिणाम होतो. या क्षेत्राच्या उद्दीपनाने निर्माण झालेल्या हालचाली उद्दीपन थांबल्यानंतरही कित्येक सेकंद सुरू राहतात. या उलट प्रमुख प्रेरक क्षेत्राच्या उद्दीपनामुळे निर्माण होणाऱ्या हालचाली उद्दीपन थांबताच तत्काळ थांबतात. पुरवणी क्षेत्राच्या उद्दीपनाचे प्रतिसाद बऱ्याच वेळा शरीराच्या दोन्ही बाजूंच्या स्नायूंत मिळतात.
अशा प्रकारे संपूर्ण शरीरातील स्नायूंचे नियंत्रण कमीत कमी दोन परंतु बहुधा तीन वेगवेगळ्या तंत्रिका कोशिका गटांकडून (प्रेरक क्षेत्रांकडून) होते.
विद्युत् उद्दीपनाने काही विशिष्ट स्नायुगटांच्या हालचालींवर नियंत्रण करणारी क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. यांमध्ये डोके (परिभ्रमी हालचाल) व मान यांची हालचाल, डोळ्यांची विरुद्ध बाजूकडे हालचाल, डोळे स्थिर ठेवणे, शब्दरचना, शब्द निवड, शब्दोच्चार, ओठ व जीभ यांच्या हालचाली, चर्वण,
गिळणे इ. हालचालींचा समावेश होतो.
अशा विद्युत् उद्दीपनाचा उपयोग तंत्रिका शस्त्रक्रिया विशारद प्रत्यक्ष शस्त्रक्रियेच्या वेळी या क्षेत्रांना हानी पोहोचण्याचे टाळण्याकरिता करतात.
मेंदूच्या इतर भागातील दुय्यम क्षेत्रे : प्रेरक क्षेत्रापासून निघणारे काही तंत्रिका तंतू विरुद्ध बाजूस जाऊन मस्तिष्क स्तंभातील तिसऱ्या व चौथ्या मस्तिष्क तंत्रिकांच्या [नेत्रप्रेरक तंत्रिका व कपी तंत्रिका यांच्या ⟶ तंत्रिका तंत्र]केंद्रकातील (तंत्रिका कोशिकांच्या समूहातील) कोशिकांभोवती जाळे करून अनुबंधनाने (एका कोशिकेचा अक्षदंड ज्या ठिकाणी दुसऱ्या कोशिकेच्या अभिवाही प्रबर्धांना-कोशिकेकडे संवेदना वाहून नेणाऱ्या बारीक वाढींना-अथवा कोशिका कायाला मिळतो, त्या जागेला अनुबंधन म्हणतात) त्यांचा शेवट होतो. या दोन्ही मस्तिष्क तंत्रिका डोळ्यांची हालचाल करणाऱ्या विशिष्ट स्नायूंना पुरवठा करतात. थोडे आणखी खाली उतरल्यावर काही तंतू पाचव्या, सहाव्या व सातव्या मस्तिष्क तंत्रिकांच्या केंद्रकाभोवती संपतात. पाचव्या तंत्रिकेचा काही भाग जबड्याची चर्वणाकरिता होणारी हालचाल करणाऱ्या स्नायूंना पुरवठा करतो. सहावी मस्तिष्क तंत्रिका संपूर्ण प्रेरक आहे. सातवी अंशतः प्रेरक असून चेहरा, शिरोवल्क, कान व मान या भागांच्या स्नायूंना पुरवठा करते.
याशिवाय निमस्तिष्कात (लहान मेंदूत) काही महत्त्वाची दुय्यम क्षेत्रे आहेत. निमस्तिष्क तंत्रिका तंत्राच्या इतर भागांशी जोडलेला असतो. शरीराचे संतुलन, हालचाल व स्नायूंचा तान (जोम व ताण) यांसंबंधी सबंध शरीराकडून येणारी माहिती निमस्तिष्काकडे सारखी येत असते. निमस्तिष्कातून प्रत्यक्ष प्रेरक आवेग निघत
नसले, तरी प्रमस्तिष्क बाह्यकातून निघणाऱ्या प्रेरक आवेगांचे सहसंयोजन घडवूण आणण्याचे कार्य निमस्तिष्क करतो. त्यामुळे स्नायूंच्या क्रिया अडथळा विरहित व कार्यक्षम बनतात. याशिवाय स्नायूंचा तान प्राकृतिक (सर्वसाधारण पातळीवर) ठेवणे आणि शरीराचे संतुलन सांभाळणे ही कार्ये निमस्तिष्क अबोधपणे करतो.
ऐच्छिक हालचालींमध्ये निमस्तिष्क महत्त्वाचे कार्य करतो. प्रेरक क्षेत्रातून निघणारे आवेग जेव्हा स्तूपमार्ग व स्तूपबाह्यमार्ग यांमधून खाली उतरत असतात त्याच वेळी काही तसेच आवेग निमस्तिष्काकडे जातात. स्नायू जेव्हा प्रतिसाद देतात तेव्हा स्नायू कंडरा (स्नायू अस्थींना वा उपास्थींना-कूर्चांना-बांधणारा दोरीसारखा तंतुसमूह), स्नायुतर्कू (संयोजी-जोडणाऱ्या-ऊतकाने परिवेष्टित असलेला सूक्ष्म स्नायुतंतूचा जुडगा) संबंधित सांधा व इतर संवेदना ग्राहकांमार्फत निमस्तिष्काकडे सूचनावजा आवेगही येतात. प्रेरक क्षेत्राकडून खाली जाणारे संदेश व स्नायू आदि परिसरीय भागांकडून येणारे संदेश यांची सांगड घातल्यानंतर, लाल केंद्रक आणि थॅलॅमस या प्रमुख केंद्रकामार्फत प्रेरक क्षेत्राच्या ज्या भागातून मूळ हालचालींचा संदेश निघाला असेल तेथपर्यंत, हालचालीतील दोष किंवा चूक न होऊ देणारे संदेश पोहोचतात. या प्रतिसंभरक (प्रदान संदेशाचा काही भाग पुन्हा आदान म्हणून उपयोगात आणणाऱ्या) मंडलाची सुरुवात प्रेरक बाह्यकात होते व परत तेथेच येऊन पूर्ण होते. या रचनेद्वारा निमस्तिष्क ऐच्छिक हालचालीतील दोष काढून टाकण्याचे व चूक न होऊ देण्याचे कार्य करते.
पळणे, लिहिणे व बोलणे या क्रियांतील हालचालींमध्ये अनेक चालींची गुंफण केलेली असते. ही गुंफण सफाईने करण्याचे कार्य निमस्तिष्कामार्फत होते. निमस्तिष्क कार्यात बिघाड उत्पन्न झाल्यास या हालचालींतील नियमित क्रम बिघडून त्या असंगत बनतात.
स्तूपमार्ग : बहुतांशी प्रेरक क्षेत्रातील कोशिकांपासून निघणाऱ्या तंत्रिका तंतूंच्या (अक्ष दंडांच्या) जुडग्याला स्तूपमार्ग किंवा प्रमस्तिष्क बाह्यक-मेरुरज्जू मार्ग म्हणतात. यातील तीन चतुर्थांश तंतू प्रेरक क्षेत्रातून येतात, तर उरलेले एक चतुर्थांश बाह्यकाच्या मध्य सीतेच्या पश्च भागातून येतात. हा चतुर्थांश भाग प्रेरक कार्यात बहुतकरून भाग घेत नसावा. स्तूपमार्गात स्तूप कोशिकांपासून निघणारे जाड (१६ मायक्रॉन व्यासाचे, १ मायक्रॉन = १०-६ मी.) वसावरणयुक्त (स्निग्ध पदार्थाच्या आवरणाने युक्त) तंतू प्रामुख्याने असतात. प्रत्येक प्रमस्तिष्क बाह्यकापासून येणारे असे जवळजवळ १७,००० तंतू स्तूपमार्गाचा मोठा भाग व्यापतात. बाह्यकातील प्रेरक संदेश खाली नेण्याचे कार्य या तंतूमार्फत होते. प्रत्येक स्तूपमार्गात एक दशलक्ष तंतू असतात. म्हणजे या जाड वसावरणयुक्त तंतूंचे प्रमाण फक्त २ टक्केच असते. उरलेले ९८% तंतू फक्त ४ मायक्रॉन व्यासाचे असतात. त्यांपैकी ६०% वसावरणयुक्त तर ४०% वसावरणरहित असतात.
स्तूपमार्ग मस्तिष्क स्तंभातून खाली उतरल्यानंतर त्यातील पुष्कळसे तंतू मध्यरेषा ओलांडून विरुद्ध बाजूस जातात. लंबमज्जेत (मेंदूच्या मेरुरज्जूशी समरस झालेल्यासारख्या भागात) आल्यावर या जुडग्यांचे मध्यरेषेच्या दोन्ही बाजूंस दोन अग्रभागात असलेले उंचवटे बनतात, त्यांना ‘स्तूप’ म्हणतात. बहुतेक तंतू व्यत्यसित झाल्यानंतर काही त्याच बाजूस राहून सरळ खाली उतरतात. अशा प्रकारे व्यत्यस्त तंतूंचा ‘व्यत्यस्त स्तूपमार्ग’ आणि सरळ जाणाऱ्या तंतूंचा ‘सरल स्तूपमार्ग’ असे दोन स्तूपमार्ग बनतात. व्यत्यसित होणाऱ्या व न होणाऱ्या तंतूंची संख्या अनिश्चित असते व त्यांचे एकमेकांशी असलेले प्रमाण प्राण्यांच्या विविध जातींत वेगवेगळे असते. लंबमज्जेतून खाली मेरुरज्जूत उतरल्यानंतर व्यत्यस्त स्तूपमार्ग पार्श्व स्तंभातून, तर सरल स्तूपमार्ग अग्र स्तंभातून खाली उतरतात. हे मार्ग जसजसे खाली उतरतात तसतशी त्यांची जाडी कमी होत जाते. कारण मेरुरज्जूच्या प्रत्येक खंडात त्याच्या करड्या भागात काही तंतू अनुबंधन तयार होऊन संपतात. मान व कंबर या दोन
ठिकामी हात व पाय यांच्या स्नायूंना पुरवठा करणाऱ्या अग्र शृंगातील (मेरुरज्जूच्या छेदातील करड्या भागाच्या H सारख्या आकारातील पुढील दोन भागांतील) प्रेरक कोशिकांची संख्या अधिक असल्यामुळे सर्वांत जास्त तंतू या ठिकाणी अनुबंधित होतात. सरल मार्गातील तंतू पुन्हा व्यत्यसित होऊनच विरुद्ध बाजूच्या अग्र शृंग कोशिकांशीच अनबुंधित होतात. अशा प्रकारे एका बाजूचे प्रेरक क्षेत्र दोन्ही स्तूपमार्गांच्या मदतीने शरीराच्या विरुद्ध बाजूच्या स्नायूंच्या नियंत्रणाशी संबंधित होते. बाह्यकातील प्रेरक तंत्रिका कोशिकेपासून निघून मेरुरज्जूत अग्र शृंग कोशिकेभोवती अनुबंधनाने संपणाऱ्या सर्व तंत्रिका भागाला ‘ऊर्ध्वस्थ प्रेरक तंत्रिका कोशिका’ म्हणतात.
माकड व चिपॅँझी या प्राण्यांत लंबमज्जेतील स्तूपाचा छेद केल्यानंतर होणाऱ्या परिणामांचे निरीक्षण करून प्रेरक कार्याच्या नियंत्रणातील
स्तूपमार्गाचा सहभाग अभ्यासण्यात आला आहे. एका बाजूच्या स्तूपाचा छेद केल्यास विरुद्ध बाजूस मानेपासून खालील भागात पक्षाघात उद्भवतो. माकडापेक्षा चिपँझीत हे अधिक तीव्र स्वरूपात आढळते. दोन्हीही प्राण्यांत अवयव अतिबात वापरता येणार नाही एवढा गंभीर पक्षाघात नसतो परंतु ऐच्छिक हालचालीत मोठीच कमतरता निर्माण होते. अंगठा व इतर बोटांच्या सूक्ष्म हालचाली नाहीशा होतात.
मेरुरज्जूतील स्तूपमार्ग विकृतींमध्ये विकृतिस्थानाच्या खालच्या भागातील ऐच्छिक हालचाली बंद पडतात. प्रत्यक्ष स्नायूंचा पक्षाघात झालेला नसतो. उलट त्यांचा स्नायु-तान वाढलेलाच असतो. स्नायूमध्ये ताठरता येते, तसेच त्यांची अपपुष्टीही होत नाही.
ऊर्ध्वस्थ प्रेरक तंत्रिका कोशिकेच्या विकृतीत पादतल प्रतिक्षेपी क्रियेत [⟶ प्रतिक्षेपी क्रिया] विशिष्ट बदल
होतो. प्राकृतावस्थेतील प्रतिक्षेपात पायाच अंगठा पादतलाकडे (तळपायाकडे) वळतो (अभिवर्तन), तर स्तूपमार्ग विकृतीत तो पावलाच्या पृष्ठीय भागाकडे वळतो (प्रसार). या लक्षणाला जे. एफ्. एफ्. बॅबिन्स्की या फ्रेंच वैद्यांच्या नावावरून‘बॅबिन्स्की खूण (किंवा प्रतिसाद)’ म्हणतात. प्राकृतिक प्रतिक्षेप प्रमस्तिष्क बाह्यकाच्या नियंत्रणाचे निदर्शक असतो, तर बॅबिन्स्की खूण हे नियंत्रण नष्ट झाल्याचे दर्शक असते. वानरवर्गी प्राण्यांत कनिष्ठ ते वरिष्ठ वर्गांच्या प्राण्यांच्या अभ्यासात हा प्राकृतिक प्रतिक्षेप प्रसार स्वरूपाकडून क्रमाक्रमाने अभिवर्तन स्वरूपाचा झाल्याचे आढळते. यावरून प्रमस्तिष्क बाह्यकाचे नियंत्रण क्रमविकासाप्रमाणे (उत्क्रांतीप्रमाणे) वाढत गेल्याचे आढळते. मानवी व्यक्तिविकासात देखील सुरुवातीच्या काही वर्षांत प्रतिक्षेपाचे स्वरूप बॅबिन्स्की खुणेसारखे मिळते. यावरून बाह्यकाचे नियंत्रण प्रस्थापित होण्याकरिता हा काळ लागतो, असे दिसते.
स्तूपबाह्यमार्ग : बाह्यकापासून निघणारे काही संदेश स्तूपमार्गातून न जाता इतर मार्गांनी खाली उतरून मेरूरज्जूतील अग्र शृंग कोशिकांपर्यंत पोहोचतात. अशा सर्व मार्गांना स्तूपबाह्यमार्ग म्हणतात. हे मार्ग बाह्यकापासून निघून सरळ खाली जात नाही. ते मस्तिष्क स्तंभातील विविध केंद्रकांतून जातात. प्रमस्तिष्क बाह्यकाच्या बहुतेक सर्व भागांतून येणारे हे तंतू केंद्रकांत व इतर भागांत अनुबंधित झाल्यानंतरच खाली उतरतात. मेरुरज्जूत हे संदेश नेणारे चार विशिष्ट मार्ग असून त्यांना विविध नावे दिली आहेत : (१) लाल केंद्रक – मेरुरज्जू मार्ग, (२) जालीय क्षेत्र – मेरुरज्जू मार्ग, (३) कायचतुष्क – मेरुरज्जू मार्ग आणि (४) श्रोतृ-कुहर तंत्रिका केंद्रक – मेरुरज्ज मार्ग. मेरुरज्जूत येणारे हे तंतू निरनिराळ्या पातळ्यांवरील अग्र शृंग कोशिकांशी अनुबंधित होतात. स्तूपबाह्यमार्ग विशिष्ट स्नायूंच्या आकुंचनात विशेष भाग घेत नसले, तरी सर्वसाधारण संदेश सुगमता, सर्वसाधारण प्रतिरोध किंवा ढोबळ अंगस्थिती यांसंबंधीच्या संदेशवहनात भाग घेत असावेत. सर्व स्तूपबाह्यमार्गांचा रचनाविषयक व कार्यविषयक अभ्यास बराच जटिल (गुंतागुंतीचा) आहे.
काही मस्तिष्क तंत्रिकांची केंद्रके व त्यांपासून विशिष्ट स्नायूंपर्यंत जाणारे तंत्रिका तंतू : काही मस्तिष्क तंत्रिका संपूर्ण प्रेरक असतात, तर काही संमिश्र म्हणजे प्रेरक व संवेदी असतात. यासंबंधीची माहिती ‘तंत्रिका तंत्र’ या नोंदीत कोष्टकरूपाने (कोष्टक क्र. १) दिली आहे.
मेरुरज्जूतील अग्र शृंग कोशिका व त्यांपासून स्नायूंपर्यंत जाणारे तंत्रिका तंतू : मेरुरज्जूतील अग्र शृंग कोशिकांपासून निघणारे अक्षदंड मेरुरज्जूच्या अग्रमूलातून जाऊन तंत्रिका तंतूमार्फत स्नायूंमार्फत पोहोचतात.
कोशिका व तिच्यापासून निघणाऱ्या अक्षदंडाला मिळून ‘अधःस्थ प्रेरक तंत्रिका कोशिका’ म्हणतात. प्रत्येक अक्षदंड स्नायूजवळ आल्यानंतर त्याच्या अनेक शाखा बनतात व त्या अनेक स्नायुतंतूंना पुरवठा करतात. एक प्रेरक कोशिका व ती पुरवठा करीत असलेला स्नायुतंतूंचा गट मिळून एक ‘प्रेरक एकक’ बनते. मोठ्या व ढोबळ हालचाली करणाऱ्या स्नायूमध्ये (उदा. पायाच्या स्नायूत) एक प्रेरक एकक १२० ते १५० स्नायुतंतू गटांचे नियंत्रण करते. याउलट डोळ्यांची (नेत्रगोलांची) हालचाल करणाऱ्या छोट्या स्नायूत एक प्रेरक एकक फक्त सहाच स्नायुतंतू गटांचे नियंत्रण करते.
प्रेरक तंत्रासंबंधीच्या काही विकृती : प्रमस्तिष्क बाह्यक विकृती : मर्यादित स्वरूपाचा पक्षाघात (उदा., एक गात्राघात) बाह्यकाच्या विकृतीचे लक्षण असते. प्रेरक क्षेत्र विस्तृत असल्यामुळे अर्धांगवात होण्याकरिता विस्तृत हानीची गरज असते. कधीकधी कष्टगिलन (गिळताना कष्ट पडणे) व अपस्मारासारखे झटके वरील लक्षणाबरोबर संभवतात.
अंतःप्रावर विकृती : या ठिकाणी स्तूपमार्गाच्या तंतूंची दाटी होत असल्यामुळे येथील विकृती (उदा., रक्तस्त्राव) अर्धांगवात उत्पन्न करते. ज्या बाजूची विकृती झाली असेल त्याच्या विरुद्ध बाजूकडील चेहरा, हात व पाय यांना पक्षाघात होतो. कधीकधी जवळच्या संवेदी तंतूस इजा झाल्यामुळे अर्ध-अतिसंवेदनशीलता व अर्धदृष्टिता (एका किंवा दोन्ही डोळ्यांच्या दृष्टिक्षेत्राच्या अर्धभागात अंधत्व निर्माण होणे) ही लक्षणेही संभवतात.
मस्तिष्कस्तंभ : येथील रचना गुंतागुंतीची असल्यामुळे येथील विकृती फक्त प्रेरक कार्यापुरत्याच मर्यादित नसतात. एका बाजूच्या मस्तिष्क तंत्रिकेची विकृती व विरुद्ध बाजूच्या स्तूपमार्ग विकृतीची लक्षणे संभवतात.
ऊर्ध्वस्थ प्रेरक तंत्रिका कोशिका विकृती : हिच्यात पुढील लक्षणे उद्भवतात : (अ) शरीरातील अर्ध्या भागातील काही हालचालींचा कमजोरपणा किंवा पक्षाघात. (आ) स्नायु-तान वृद्धी आणि स्नायूंची ताठरता. परकृत हालचाल करताना सुरुवातीस ताठरतेमुळे प्रतिरोध होतो परंतु तीच हालचाल चालू ठेवल्यास तो एकाएकीच नाहीसा होतो. (इ) कंडरा प्रतिक्षेपी क्रियांचा दोलविस्तार वाढतो. कधीकधी विशिष्ट भागी अवमोटन (स्नायूंची अनैच्छिक, प्रतिक्षेपित व अनियमित आकुंचने) उत्पन्न होते. (ई) उदरभित्तीतील स्नायूंच्या प्रतिक्षेपी क्रिया नाहीशा होतात. (ए) बॅबिन्स्की पादतल प्रतिक्षेप मिळतो. (ऐ) स्नायूंची अपपुष्टी आढळत नाही. (ओ) विकृत बाजूच्या स्नायूंचे विद्युत् उद्दीपन प्राकृतिक असते.
अधःस्थ प्रेरक तंत्रिका कोशिका विकृती : ज्या स्नायूंना तंत्रिका पुरवठा होतो त्यांमध्येच विकृती आढळते. यात पुढील लक्षणे आढळतात : (अ) स्नायू अशक्तता किंवा पक्षाघात. विकृत स्नायू ज्यांत भाग घेतात अशा सर्व हालचालींवर परिणाम होतो. (आ) स्नायु-तान नाहीसा होतो. स्नायू शैथिल्य येते. (इ) स्नायूंची अपपुष्टी. मूळ विकृतीनंतर दोन ते तीन आठवड्यांनी अपपुष्टी दिसू लागते. (ई) संबंधित प्रतिक्षेपी क्रिया नाश पावतात. (ए) स्नायुतंतुकांचे आकुंचन डोळ्यांना दिसत नाही परंतु स्नायु-विद्युत् आलेखनात स्पष्ट मिळते. (ऐ) स्नायूंचा संकोच होतो. स्नायु-ऊतकाची जागा तंत्वात्मक ऊतक घेते. (ओ) विद्युत् उद्दीपनात बदल होतो.
संदर्भ: 1. Davidson, S: Macleod, J. Ed., The Principles and Practice of Medicine, Edinburgh, 1973.
2. Guyton, A. C. Textbook of Medical Physiology, Tokyo, 1976.
3. Warwick, R. Williams, P. L. Ed., Gray’s Anatomy, Edinburgh, 1973.
कुलकर्णी, श्यामकांत ढमढेरे, वा. रा. भालेराव, य. त्र्यं.
“