प्रिमरोझ : फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृत्तबीज उपविभाग] द्विदलिकित वर्गातील व ⇨ प्रिम्युलेलीझ गणामधील प्रिम्युलेसी कुलातील अनेक वनस्पतींचे इंग्रजी नाव. त्यांचा समावेश शास्त्रीय
भाषेत प्रिम्युला वंशात असून त्यामध्ये सु. ५०० जाती आहेत त्या सर्व ओषधीय [⟶ ओषधि] व बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) आहेत त्यांचा प्रसार उत्तरेच्या समशीतोष्ण कटिबंधात असून काही जाती दक्षिण गोलार्धातही आढळतात. भारतात एकूण सु. १५० जाती आढळत असून त्यांपैकी ७०-७५ हिमालयातील व तिबेटातील उंच पर्वतश्रेणीवर आढळतात. यांची सर्वसामान्य शारीरिक लक्षणे प्रिम्युलेलीझ गणात व ⇨बिशकोप्रा (प्रिम्युला रेटिक्युलॅटा) यांत वर्णिल्याप्रमाणे आहेत. या जातीचे खोड भूमिस्थित [ग्रंथीक्षोड, मूलक्षोड → खोड] व संयुतपद (अनेक उपाक्षांचे बनलेले) असून त्यापासून जमिनीवर मूलज (जमिनीतून वर आलेल्या) पानांचा झुबका व त्यामधून फुलोरा येतो. पाने साधी, अखंड किंवा खंडित असून फुलोरा विविध प्रकारचा असतो. बहुधा एका दांड्यावर एक किंवा अनेक आकर्षक फुलांचे झुबके येतात. फुले पांढरी, गुलाबी, लाल, पिवळी किंवा निळी असून त्यांमध्ये संदले, प्रदले व केसरदले प्रत्येकी पाच असतात पुष्पमुकुट खाली नळीसारखा व टोकास पसरट (समईसारखा) असून प्रत्येक पाकळीच्या टोकास खाच असते. काही जातींत दोन किंवा तीन प्रकारची फुले असतात त्यांमध्ये केसरदले व किंजदले यांची लांबी भिन्न (ऱ्हस्व व दीर्घ) असते (भिन्न किंजलत्व) व त्यामुळे परपरागण [⟶ परागण] साध्य होते [⟶ फूल]. किंजपुटात एकच कप्पा व अनेक बीजके असून बोंड (फळ) तडकल्यावर त्याची बहुधा पाच शकले होतात बिया अनेक व जननक्षम असल्याने अभिवृद्धी बिया किंवा कलमे लावून करतात. या वनस्पती बागेत, वाफ्यांत किंवा कुंड्यांत लावतात. अनेक संकरज प्रकार उपलब्ध असून त्यांची मैदानी भागात थंडीत लागवड करतात मध्यम ते उंच डोंगरावर त्यांची लागवड मार्च ते मे मध्ये करतात तेथे कित्येक जाती चांगल्या वाढतात. भरपूर ओलावा असलेली सकस व रेताड जमीन आणि अर्धवट सावली या जातींना आवश्यक असते. बहुतेक जाती पाळीव जनावरे खात नाहीत कारण त्या विषारी असतात. चिनी प्रिमरोझ (प्रिम्युला सायनेन्सिस) ही जाती व तिचे विविध प्रकार उ. प्रदेश, निलगिरी बंगलोर येथील उद्यानांत विशेषेकरून लावलेले आढळतात. प्रि. व्हल्गॅरिसची मुळे वांतिकारक असतात. काऊस्लिपची (प्रि. वेरिस) मुळे सेनेगाऐवजी (पॉलिगॅला सेनेगाच्या मूत्रल म्हणजे लघवी साफ करणाऱ्या व कफोत्सारक म्हणजे कफ काढून टाकणाऱ्या सुक्या मुळांऐवजी) वापरतात. प्रि. ऑबकोनिकामुळे तीव्र त्वक्शोथ (त्वचेची दादयुक्त सूज) होतो. समशीतोष्ण हिमालयातील काही जातींची फुले सुगंधी आहेत. ईव्हनिंग प्रिमरोझ हे नाव ⇨ ऑनेग्रसी कुलातील इनोथेरा वंशातील सर्व फुलझाडांच्या जातींना दिलेले आहे [⟶ इनोथेरा रोजिया]. (चित्रपत्र).
संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VIII, New Delhi, 1969.
2. Mitra, J. N. Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.
परांडेकर, शं. आ.
“