प्रॉव्हिडन्स : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील ऱ्होड आयलंड राज्याची राजधानी. लोकसंख्या १,७९,२१३ उपनगरांसह ७,९५,३११ (१९७०). हे इतिहासप्रसिद्ध शहर व बंदर, बॉस्टनच्या नैर्ऋत्येस ७२ किमी. नॅरागॅंसिट उपसागराच्या शिरोभागी प्रॉव्हिडन्स नदीकाठी वसले असून ते दळणवळणाचे केंद्र आहे.
मॅसॅचूसेट्स वसाहतीतून आपल्या क्रांतिकारक धर्मकल्पनांच्या प्रचारामुळे हकालपट्टी झालेल्या रॉजर विल्यम्सने (१६०३-८३) हे १६३६ मध्ये वसविले. लवकरच ते धार्मिक स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्यांचे आश्रयस्थान बनले. शहराला प्रॉव्हिडन्स हे नाव देण्यामागे ‘आपल्या आपत्काळात ईश्वराच्या दयाळू साहाय्याबद्दल’ कृतज्ञता व्यक्त करणे, हा विल्यम्सचा हेतू होता. या शहराने अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. १७७२ मध्ये ब्रिटिश नाविक कायद्याची अंमलबजावणी आणि वार्षिक खंडणी वसूल करण्यासाठी ब्रिटिशांचे ‘बॅस्पी’ हे जहाज येत असता, नॅरागँसिट उपसागरात येथील रहिवाशांनी त्याचा ताबा घेऊन ते नष्ट केले. ‘बॉस्टन टी पार्टी’च्या घटनेनंतर (१७७३) दोन वर्षांच्या आत येथील लोकांनी चहावरील कराच्या निषेधार्थ मार्केट चौकात चहाच्या साठ्यास आग लावली. ४ मे १७७६ रोजी ऱ्होड आयलंड स्वातंत्र्य कायद्यावर येथेच सह्या करण्यात आल्या. १९३८ मध्ये हरिकेनमुळे (चक्री वादळामुळे) शहराच्या बऱ्याच भागाचे नुकसान झाल्याने त्याची पुन्हा उभारणी करण्यात आली. अशा प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी ‘फॉक्स पॉइंट हरिकेन बॅरिअर’ ची १९६६ मध्ये निर्मिती करण्यात आली.
अठराव्या शतकात निग्रो गुलाम आणि रम हे मद्य यांचा व्यापार आणि औद्योगिक क्रांतीनंतर उद्योगधंद्यांचा होत गेलेला विकास, यांमुळे शहराची झपाट्याने प्रगती झाली. येथील औद्योगिक क्षेत्रांत विविधता असून सुती, लोकरी, रेशमी, रेयॉन इ. कापड उत्पादन, यंत्रसामग्री, बॉयलर, सोन्याचांदीचे दागिने तसेच जडजवाहीर, रबरी वस्तू, प्लॅस्टिके, रसायने, तेल शुद्धीकरण, खेळणी इ. उद्योगांचा विकास झाला आहे. या बंदरास व्यापारी दृष्ट्या मोठे महत्त्व असून येथून प्रतिवर्षी ८० ते ९० लक्ष टन मालाचा व्यापार चालतो. शिक्षणकेंद्र म्हणूनही प्रॉव्हिडन्सला महत्त्व असून ब्राउन विद्यापीठ, प्रॉव्हिडन्स महाविद्यालय. ऱ्होड आयलंड अभिकल्प विद्यालय, ऱ्होड आयलंड औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, जॉन्सन अँड वेल्झ उद्योग महाविद्यालय, स्त्रियांचे पेम्ब्रोक महाविद्यालय यांसारख्या अनेक शिक्षणसंस्था शहरात आहेत. येथे अनेक ग्रंथालये असून त्यांमध्ये जॉन कार्टर ब्राउन ग्रंथालय, प्रॉव्हिडन्स सार्वजनिक ग्रंथालय, प्रॉव्हिडन्स अथनीअम ग्रंथालय तसेच निसर्गविज्ञान वस्तुसंग्रहालय, वसाहतकालीन फर्निचर संग्रहालय इ. प्रसिद्ध आहेत. शहरात सु. ७५ चर्च असून सेंट्स पीटर अँड पॉल (रोमन कॅथलिक) आणि सेंट जॉन (एपिस्कोपल) ही दोन कॅथीड्रल आहेत.
प्रॉव्हिडन्सचा इतिहास तेथील विविध इमारतींमधून सूचित होतो. गगनचुंबी इमारतीप्रमाणेच वसाहतकालीन वास्तूही येथे आढळतात. व्यापारव्यवसायविषयक इमारतींमध्ये ‘इंडस्ट्रियल ट्रस्ट बिल्डिंग’ ह्या उत्तुंग इमारतीवर १२८ मी. उंचीचा दीपस्तंभ आहे. सतराव्या-अठराव्या शतकांतीलही काही वास्तू येथे आहेत. ‘ओल्ड मार्केट हाउस’ (१७७३), फॅशन दुकाने असलेली ‘द आर्केड’ (१८२८) ही वास्तू, १७६२-१९०० या काळातील शासनयंत्रणा जेथून चालत असे ते ‘ओल्ड स्टेट हाउस’ (१७६२), बेटी विल्यम्झ कॉटेज, द फर्स्ट बॅप्टिस्ट चर्च (१७७५) – अमेरिकेतील बॅप्टिस्ट अनुयायींचे सर्वांत जुने सभाकेंद्र, फर्स्ट युनिटेरियन चर्च, ऱ्होड आयलंड ऐतिहासिक संस्था (पूर्वीचे जॉन ब्राउन हाउस – १७८६), जोझेफ नाइटिंगेल हाउस, स्टीव्हेन हॉप्किंझ हाउस इ. इतिहासप्रसिद्ध वास्तू तसेच १८२ हे. विस्तार असलेले रॉजर विल्यम्स उद्यान, सिटी हॉल उद्यान इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत. प्रतिवर्षी जून महिन्यात येथे संगीतोत्सव साजरा केला जातो.
फडके, वि. शं. गाडे, ना. स.