प्रारण रसायनशास्त्र : उच्च ऊर्जायुक्त प्रारण पदार्थावर टाकले असता त्यांपासून मिळणाऱ्या रासायनिक परिणामाचे विवरण प्रारण रसायनशास्त्रात केले जाते. या प्रारणात पुढील प्रकारांचा समावेश केला जातो : नैसर्गिक किरणोत्सर्गी मूलद्रव्यांपासून मिळणारे आल्फा, बीटा आणि गॅमा किरण [⟶ किरणोत्सर्ग] अणुकेंद्रीय विघटन विक्रियेपासून मिळणारे गतिमान न्यूट्रॉन किंवा प्रत्याघाती अणू (ज्यांच्यातून एखादा कण वा प्रारण उत्सर्जित झाल्यामुळे ज्यांच्या दिशेत अकस्मात बदल होतो असे अणू) व्हॅन डी ग्रॅफ जनित्र, सायक्लोट्रॉन इ. ⇨ कणवेगवर्धकांद्वारे गतिमान केलेले प्रोटॉन, ड्यूटेरॉन, हीलियम, कार्बन अणुकेंद्रे बीटाट्रॉन, लिनॅक (रेखीय वेगवर्धक) या कणवेगवर्धकांच्या साहाय्याने प्रवेगित केलेले इलेक्ट्रॉन क्ष-किरण. या प्रारणामध्ये एका टोकास गॅमा किरण, क्ष-किरण यांसारखे विद्युत्‌ चुंबकीय तरंग, मधे इलेक्ट्रॉनासारखे हलक्या द्रव्यमानाचे गतिमान कण, तर शेवटी प्रोटॉन, हीलियम वा कार्बन यासारखे भारी कण या सर्वांचा समावेश केलेला आहे, ही लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट आहे. प्रारण रसायनशास्त्राच्या अभ्यासाकरिता आधुनिक काळात कृत्रिम रीत्या किरणोत्सर्गी बनविलेल्या कोबाल्ट (६०) किंवा ड्यूटेरियम किंवा त्यासारख्या समस्थानिकांचा (अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांचा) प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. कोबाल्ट (६०) पासून १·१७ व १·३२ MeV (दशलक्ष इलेक्ट्रॉन-व्होल्ट १ इलेक्ट्रॉन-व्होल्ट = १·६०२ X १०-१९ जूल) या ऊर्जेचे गॅमा किरण मिळतात. याचे अर्धायुष्य (मूळची किरणोत्सर्गी क्रियाशीलता निम्मी होण्यास लागणारा काळ) मात्र कमी मूल्याचे म्हणजे ५·३ वर्ष एवढेच असते. यामुळे या द्रव्याचा उपयोग काही मर्यादित अशा कालखंडापुरताच करता येतो.

उपकरण योजना : कोबाल्ट (६०) या किरणोत्सर्गी द्रव्याचा ज्यामध्ये उद्‌गम म्हणून उपयोग केला आहे, अशा अनेक उपकरण योजना उपलब्ध आहेत. अशा प्रणालीमध्ये सुयोग्य परिरक्षक व ज्यावरील परिणाम अभ्यासावयाचा आहे असा नमुना पदार्थउद्‌गमाकडे सरकविण्याची योजना या दोन गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या असतात. यांपैकी एका योजनेत या कार्याकरिता जमिनीत एक खोल भोक अथवा गोल खड्डा करून (सु. ३-४ मी. खोल) त्याच्या खालच्या टोकाशी किरणोत्सर्गी कोबाल्ट (६०) ठेवलेले असते. उत्सर्जित गॅमा किरणांपासून परिरक्षण करण्याकरिता भोक पाण्याने भरलेले असते. नमुना पदार्थ एका भांड्यात ठेवून त्याला उद्‌गमापासून निरनिराळ्या अंतरावर (पाण्यामध्ये) ठेवण्याकरिता एक यांत्रिक योजना केलेली असते. या योजनेमध्ये उद्‌भासन काल (पदार्थांवर प्रारण पडत असेपर्यंतचा एकूण काल) व नमुन्याचे उद्‌गमाच्या सापेक्ष असणारे अंतर यांचे मापन करण्याची व्यवस्था असते.

कोबाल्ट (६०) उपलब्ध होण्यापूर्वी अशा प्रयोगाकरिता क्ष-किरणांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात असे. क्ष-किरण निर्माण करण्याकरिता उच्च विद्युत्‌ वर्च्‌स (पातळी) निर्माण करणारी योजना असलेले उपकरण आवश्यक असते. या उपकरणाची योग्य देखभाल करणे अवघड पडत असे. क्ष-किरण शलाकेची तीव्रता आधुनिक कोबाल्ट (६०) उद्‌गमाच्या तीव्रतेपेक्षा जास्त आहे, असेही नाही. कणवेगवर्धकापासून मिळणाऱ्या विद्युत्‌ भारवाही कण शलाकेच्या तीव्रतेचे मूल्य मात्र खूप जास्त असते उदा., रेखीय वेगवर्धकाद्वारे ०·५-५ MeV ऊर्जेचे १०-१० ते १०-४ अँपिअर तीव्रता असणारी इलेक्ट्रॉन शलाका मिळू शकते पण तिची भेदनक्षमता गॅमा किरणांच्या तुलनेने पुष्कळच कमी असते (पाण्यातील प्रवेश निम्नता &lt १ सेंमी.). त्यामुळे नमुना पदार्थाच्या फक्त थोड्या घनफळाचे किरणीयन (उद्‌भासित करण्याची प्रक्रिया) करता येते. क्रमवीक्षण प्रक्रियेचा (क्रमाक्रमाने प्रत्येक भागाचे उद्‌भासन करण्याच्या प्रक्रियेचा) उपयोग करून उद्‌भासित घनफळाचे प्रमाण वाढविता येते. सायक्लोट्रॉन इ. कणवेगवर्धकांच्या साहाय्याने भारी द्रव्यमान असलेल्या कणाच्या उच्च ऊर्जा शलाका मिळू शकतात. अशा शलाका कणाची ऊर्जा त्याच्या गतिमार्गात शोषक पटले ठेवून आवश्यक पातळीपर्यंत कमी करता येते. अशा प्रकारे मिळालेल्या शलाकेची तीव्रता जरी समाधानकारक मूल्याची असली, तरी तिची भेदनक्षमता पाण्यामध्ये १ मिमी.पेक्षाही कमी असते. नमुना पदार्थाचे घनफळ मोठे असल्यास, यापेक्षा जास्त भेदनक्षमता आवश्यक असते. अशा परिस्थितीत किरणोत्सर्गी (नैसर्गिक अथवा कृत्रिम) द्रव्यापासून मिळणारे गॅमा किरण किंवा इतर प्रकारे उपलब्ध होणारे न्यूट्रॉन यांचा उपयोग करणे सोईचे ठरते. उच्च प्रकारची भेदनक्षमता आणि उच्च तीव्रता अशा दोन्ही गोष्टी जेव्हा आवश्यक असतात, तेव्हा अणुकेंद्रीय विघटन विक्रियेमध्ये निर्माण होणाऱ्या (किंवा या विक्रियेत निर्माण होणाऱ्या पदार्थापासून मिळणाऱ्या) गॅमा किरणांचा उपयोग करतात.

किरणीयन मात्रेचे मूल्यमापन : या मापनाकरिता दोन प्रकारची परिमाणे वापरली जातात. नमुना पदार्थामध्ये एक सेंमी. मार्गक्रमण केल्यामुळे प्रारण ऊर्जेत होणारा क्षण LET (Linear Energy Transfer अथवा रेषीय ऊर्जा हस्तांतरण) या निर्देशांकाने दाखविला जातो. LET च्या मूल्यानुसार पदार्थामध्ये होणाऱ्या ऊर्जाक्षय प्रक्रियेविषयी काही निश्चित अनुमाने करता येतात. जर LET चे मूल्य पदार्थाच्या आयनीकरण वर्चस्‌ (विद्युत्‌ भारित अणू, रेणू वा अणुगटात म्हणजे आयनात रूपांतर करण्यासाठी लागणारे वर्चस्‌) Vi पेक्षा कमी असेल, तर प्रारणामुळे पदार्थाच्या रेणूचे फक्त उद्दीपनच होऊ शकेल, हे स्पष्ट आहे. जर LET &gt Vi तर पदार्थामध्ये उद्दीपनाशिवाय आयनीकरणाद्वारे आयनयुग्मेही निर्माण होतील. LET चे मूल्य प्रारणाच्या मूळ ऊर्जेवर सुद्धा अवलंबून राहील, हे स्पष्ट आहे. जर LET &gt &gt Vi, तर प्राथमिक आयनीकरण प्रक्रियेमध्ये निर्माण झालेला इलेक्ट्रॉन प्रारणापासून ऊर्जा शोषण करून आपली गतिज ऊर्जा वाढवू शकतो. या जादा ऊर्जेमुळे तो पदार्थाच्या इतर रेणूवर वा अणूवर आघात करून आणखी (द्वितीयक) आयनयुग्मे निर्माण करू शकतो. अशा प्रकारे LET च्या मूल्यानुसार पदार्थामध्ये प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक अशा टप्प्याने आयनीकरण शक्य आहे की नाही, हे कळू शकते. पदार्थामध्ये जर सरासरीने १०० eV या प्रतीचा ऊर्जाक्षय प्राथमिक प्रक्रियेत होत असेल, तर त्यामुळे काही अँगस्ट्रॉम (१०-१० मी.) अंतराच्या परिसरात अनेक आयनीकरण व उद्दीपन प्रक्रिया होणे शक्य असते. छायाचित्रण पायसाच्या (प्रकाशाला संवेदनशील असणाऱ्या रासायनिक द्रव्याच्या) किंवा बाष्पकोठीच्या [⟶ कण अभिज्ञातक] साहाय्याने अशा बहुविध प्रक्रियांचा शोध घेता येतो. द्वितीयक क्रियेद्वारा निर्माण होणाऱ्या इलेक्ट्रॉनाचा गतिमार्ग आघातामुळे विचलित होत असल्यामुळे, या प्रकारे निर्माण झालेले आयन एका सरळ रेषेत आढळत नाहीत, तर त्यांचे वितरण गुच्छाच्या अथवा इंग्लिश U अक्षराच्या आकृतिबंधाच्या सदृश असते. LET चे मूल्य १००-५०० eV या प्रतीचे असेल, तर आयनांचे वितरण ठिपक्याच्या स्वरूपाचे असते, असे आढळते. याहीपेक्षा जास्त मूल्याच्या LET करिता (उदा., १ MeV ऊर्जेची इलेक्ट्रॉन शलाका) आयन वितरण अल्प लांबीच्या मार्ग रेखांच्या स्वरूपात मिळते.


प्रारणा रसायनशास्त्रामध्ये पदार्थामधील होणाऱ्या रासायनिक बदलाचे प्रमाण M/N या राशीने मोजतात. यामध्ये M = रूपांतरित रेणुसंख्या आणि N = प्रारणामुळे निर्माण झालेल्या आयनयुग्मांची संख्या. प्रयोगाने N या राशीचे मापन करणे नेहमीच शक्य होत नसल्यामुळे आधुनिक कालात G हे एकक वापरले जाते. १०० eV ऊर्जेचे प्रारण पदार्थामध्ये आदान केले असता त्यामुळे G या संख्येच्या एकंदर रेणूंवर परिणाम होऊन त्यांमध्ये बदल घडवून आणला जातो. एच्‌. फ्रिक यांच्या मात्रामापकाच्या साहाय्याने किंवा सरळ मापन करून प्रारण ऊर्जेचे मूल्य निश्चित केले जाते. G या राशीची मूल्ये अंदाजे ०·०१ ते १० एवढी असतात, असे प्रयोगाने कळते.

किरणीयनामुळे घडून येणाऱ्या रासायनिक परिणामाचे स्वरूप : आल्फा किरणांमुळे पाण्याचे अपघटन (घटक अलग होणे) होते, असे ए. टी. कॅमरन व डब्ल्यू. रॅम्झी यांनी १९०८ मध्ये प्रथम दाखविले. प्रारणामुळे पाण्यात होणाऱ्या परिणामाचे स्वरूप जटिल (गुंतागुंतीचे) आहे, असे त्यानंतरच्या अनेक प्रयोगांवरून आढळले. फ्रिक (१९३३) यांच्या संशोधनानुसार प्रारणामुळे साध्या पाण्याचे सक्रियित (अधिक क्रियाशील) पण स्थिर अशा अवस्थेत रूपांतर होते. या अवस्थेतील पाणी रासायनिक दृष्ट्या क्रियाशील असते. किरणीयनानंतर पाण्यात हायड्रोजन पेरॉक्साइड, ऑक्सिजन आणि हायड्रोजन वायू आढळतात. सध्याच्या मीमांसेप्रमाणे पाण्याची ही क्रियाशीलता त्यामध्ये प्रारणाद्वारे निर्माण होणाऱ्या H व OH या मुक्त मूलकांमुळे (विशिष्ट परिस्थितीत मुक्त अवस्थेत राहू शकणाऱ्या अणुगटांमुळे) येत असते. प्रारणामुळेच निर्माण होणाऱ्या जलीय इलेक्ट्रॉनाच्या (पाण्याचे आयनीकरण होताना पाण्याच्या एका रेणूने सोडलेल्या व निसटून जाऊ नये म्हणून योग्य स्थितीत असलेल्या पाण्याच्या इतर रेणूंनी वेढलेल्या इलेक्ट्रॉनाच्या) उपस्थितीचा सुद्धा या क्रियाशीलतेत भाग असला पाहिजे, असेही मत प्रचलित आहे. हलक्या द्रव्यमानाच्या वेगवान कणाचे प्रारण जलीय विद्रावामध्ये सोडले असता त्यामुळे विद्रुत (विरघळलेल्या) रेणूमध्ये महत्त्वाचे बदल होतात पण पाण्याच्या रेणूंमध्ये फारच थोडा बदल झालेला आढळतो. विद्रावामध्ये पाण्याच्या रेणूंची संख्या विद्रुत रेणूंच्या संख्येपेक्षा खूपच जास्त असते. त्यावर प्रारण पडले असता पाण्याच्या रेणूबरोबर प्रारणाचा ऊर्जाविनिमय व्हावा अशी अपेक्षा करणे योग्य वाटते. पाण्याच्या रेणूंनी ग्रहण केलेली ऊर्जा कोणत्या तरी यंत्रणेच्या द्वारे विद्रुत रेणूंना पोहोचविली जात असली पाहिजे, असा निष्कर्ष यावरून क्रमप्राप्त होतो. या प्रक्रियेत मुक्त मूलकाचा मोठा वाटा असावा, असे समजले जाते. जलीय विद्रावामध्ये प्रारणाच्या परिणामाचा अभ्यास करण्याकरिता प्रथम योग्य उपाय वापरून पाण्याचे शुद्धीकरण करणे हा पहिला महत्त्वाचा टप्पा असतो. या कार्याकरिता किरणीयनाचाच उपयोग केला जातो. तीन वेळा ऊर्ध्वपातन (उकळून वाफ करून व ती थंड करून पदार्थ शुद्ध रूपात मिळविण्याची क्रिया) केलेल्या पाण्यामध्ये गॅमा किरण सोडून त्यामधील कार्बनी द्रव्याचा नाश केला जातो. किरणीयनामुळे निर्माण झालेल्या H2O2 मुळे हे कार्य होते, असे समजले जाते. H2O2 चे साध्या पाण्यात रूपांतर जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) प्रारणाद्वारे करता येते.

सल्फाइट, फेरोसायनाइड, नायट्राइट विद्राव यांसांरख्या सर्वसामान्य क्षपणकारकावर [⟶ क्षपण] प्रारण टाकले असता, त्यापासून हायड्रोजन वायू बाहेर टाकला जातो व पदार्थाचे ऑक्सिडीकरण [⟶ ऑक्सिडीभवन] होते. या विक्रियेचे विशदीकरण मुक्त मूलक सिद्धांतानुसार देण्यात आले आहे. उदा., नायट्राइटावर प्रारण पडल्यामुळे त्यामध्ये NO2, NO हे गट प्रथम निर्माण होतात. त्याबरोबरच प्रारणामुळे पाण्याचे विभाजन होऊन त्यापासून H2, H2O2, H, OH ही द्रवे मिळतात. विद्रावात H2O2 जसे जमू लागते तशी त्यांमध्ये विक्रिया सुरू होऊन नायट्राइटाचे शेवटी ऑक्सिडीकरण होते.

सोडियम-, अमोनियम- व कॅल्शियम-बायकार्बोनेट या लवणांचे विद्राव गॅमा किरण टाकले असता क्षपित होतात व त्याचे शेवटी ऑक्झॅलिक अम्लात रूपांतर होते. वरील विक्रियेत बहुधा बायकार्बोनेट आयनाची H किंवा HO2 या मूलकाबरोबर परस्परक्रिया होऊन क्षपण प्रक्रियेद्वारे H2O व CO2 ही द्रव्ये तयार होतात. CO2 चे ऑक्झॅलेटामध्ये रूपांतर होते व या ऑक्झॅलेटाचे योग्य मुक्त मूलकाद्वारा ऑक्झॅलिक अम्लात रूपांतर होते. सोडियम बायकार्बोनेट विद्रावामध्ये मात्र ऑक्झॅलेटनिर्मिती होत नाही, असे आढळते.

आयनीकरण प्रारणामुळे कलिल विद्रावामधील [⟶ कलिल] कणांच्या किलाटन (न विरघळणाऱ्या साक्याच्या रूपात एकत्र गोळा होण्याच्या) प्रक्रियेला मदत होते, असे आढळते. प्रारणामुळे कलिली कणावरील विद्युत्‌ भाराच्या मूल्यात फरक पडतो असे दिसते. कणाच्या चलनशीलतेत सुद्धा प्रारणामुळे जटिल प्रकारचे बदल घडून येतात, असे प्रयोगाने दाखविता येते. विद्रावामध्ये जर संधारित (लोंबकळणारे) घन-अवस्थी कण असतील, तर प्रारणामुळे विद्रावामध्ये होणाऱ्या रासायनिक विक्रियेत महत्त्वाचे बदल झालेले आढळतात. पाण्यामध्ये झिंक ऑक्साइडाचे कण मिसळून त्यावर गॅमा किरण टाकले, तर प्रारणामुळे पाण्यामध्ये तयार होणाऱ्या H2O2 चे प्रमाण काही पटींनी वाढते. या घटनेच्या विशदीकरणाकरिता दिलेल्या एका मीमांसेप्रमाणे प्रारण पडल्याने प्रकाशविद्युत्‌ परिणामामुळे [⟶ प्रकाशविद्युत्] झिंक ऑक्साइड कणांपासून इलेक्ट्रॉन मुक्त केले जाऊन ते विद्रावात येतात आणि ते पाण्यातील विद्रुत ऑक्सिजनाचे क्षपण करतात. याच विक्रियेकरिता दिलेल्या पर्यायी मीमांसेप्रमाणे प्रारणामुळे पाण्यात निर्माण झालेल्या OH या मुक्त मूलकावर झिंक ऑक्साइडाचा काहीतरी परिणाम होत असला पाहिजे, असे मानले जाते.

निसर्गामध्ये प्रारण पडल्यामुळे, सजीव प्राण्याच्या शरीरात अनेक जैव बदल होत असतात. याविषयीचे ज्ञान मिळविण्याकरिता प्रयोगशाळेत निरनिराळ्या कार्बनी पदार्थांवर प्रारण टाकले असता होणाऱ्या परिणामांसंबंधी बरेच संशोधन करण्यात आले आहे. ग्लायसिनासारख्या ⇨ॲमिनो अम्लाच्या जलीय विद्रावावर क्ष-किरण (किंवा सायक्लोट्रॉनापासून मिळालेले गतिमान हीलियम आयन) टाकले असता, त्यापासून मुख्यत्वेकरून अमोनियाची निर्मिती होते, असे आढळते. विद्रावात हवेची उपस्थिती असो वा नसो अमोनिया हा उत्पाद म्हणून मिळतोच. या विक्रियेत ॲसिटिक अम्ल, हायड्रोजन, कार्बन डाय-ऑक्साइड, फॉमॉल्डिहाइड, फॉर्मिक अम्ल, इमिनो अम्ल, मिथिल अमाइन, ग्लायोक्झिलिक अम्ल अशी अंतिम व मध्यस्थ रासायनिक द्रव्येसुद्धा मिळतात. सामान्यपणे ॲमिनो अम्लावर (हवेच्या उपस्थितीत) प्रारण टाकले असता त्यापासून बऱ्याच वेळा कार्बोनिल गट (CO) असलेली द्रव्ये मिळतात असे आढळते. ॲमिनो अम्लावर प्रारण पाडले असता त्यामध्ये निर्माण होणाऱ्या पदार्थाची निपज ॲमिनो अम्ल विद्रावाच्या संहतीवर (विद्रावातील अम्लाच्या प्रमाणावर) मोठ्या प्रमाणात अवलंबून का असते, हा एक प्रश्न आहे व त्याचे उत्तर मिळविणे महत्त्वाचे समजले जाते.


संतृप्त (ज्यातील सर्व कार्बन बंध तृप्त आहेत म्हणजे ज्यात अन्य मूलद्रव्यांचा वा संयुगांचा समावेश होऊ शकत नाही अशा) हायड्रोकार्बनी पदार्थामध्ये प्रारणामुळे होणाऱ्या परिणामाविषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे. मिथेन व ऑक्सिजन यांनी युक्त अशा उदासीन हायड्रोकार्बनी विद्रावावर जेव्हा प्रारण पडते, तेव्हा त्यामुळे त्यामध्ये मिथिल हायड्रोपेरॉक्साइड, हायड्रोजन पेरॉक्साइड व फॉर्माल्डिहाइड ही द्रव्ये मिळतात. सायक्लोहेक्झेन विद्रावावर प्रारण पडले असता त्यापासून हायड्रोजन मिळतो. (पाण्यापासून मिळणाऱ्या) H व OH मूलकांमुळे संतृप्त हायड्रोकार्बनी रेणूपासून हायड्रोजनाची मुक्तता होणे ही विक्रिया सामान्यपणे अपेक्षित अशीच आहे.

ॲसिटिलीन विद्रावावर प्रारण पडले असता एक घन-अवस्थी बहुवारिक (साध्या रेणूंच्या संयोगाने तयार झालेल्या जटिल रेणूंनी बनलेला पदार्थ) व मिश्रित स्वरूपात काही आल्डिहाइडे निर्माण होतात, असे आढळते.

हवेने संतृप्त (हवा जास्तीत जास्त प्रमाणात ज्यात विरघळली आहे) अशा पाण्यात विरघळविलेल्या कोलेस्टेरॉल सक्सिनेट यासारख्या स्टेरॉइडांवर प्रारण टाकले असता, त्यांपासून उद्‌भासित रेणवीय संरचनेच्या विशिष्ट स्थानापाशी ऑक्सिडीकरण होते असे आढळते. या प्रक्रियेत कोलेस्टेरॉलाच्या द्विबंधाला दोन OH गट जोडले गेल्यामुळे त्याचे डायॉलमध्ये रूपांतर होते, असे दाखविले गेले आहे. कोलेस्टेरॉल जलीय ॲसिटिक अम्लामध्ये विरघळवून नंतर त्यावर प्रारण पाडले, तर त्यापासून मिळणाऱ्या डायॉलाच्या निपजेमध्ये मोठी वाढ झालेली आढळते.

कार्बनी सल्फर संयुगे ही जैव दृष्ट्या महत्त्वाची आहेत. या प्रकारची संयुगे कमी संहती असलेल्या जलीय विद्रावाच्या स्वरूपात वापरली असता ते इतर पदार्थांचा प्रारणापासून बचाव करू शकतात असे दिसते. उदा., उंदरांना सिस्टिअमाइन संयुगाचे अंतःक्षेपण (इंजेक्शन) केले, तर ते मारक मात्रेपेक्षा बऱ्याच जास्त शक्तीची प्रारण मात्रा सहन करू शकतात. प्रारणामुळे त्यांना मृत्यू येत नाही. प्रयोगशाळेतील प्रयोगात (काचपात्रात) प्रारणाकडून सिस्टिअमाइनाचे ऑक्सिडीकरण होते, असे दाखविता येते.

काही प्रकारच्या घन-अवस्थी बहुवारिकांचे प्रारणामुळे निम्नीकरण (कार्बन अणूंची संख्या कमी असलेल्या संयुगात रूपांतर होणे) होते असे आढळते. या प्रक्रियेत बहुवारिकामधील लांब रेणवीय साखळ्यांमध्ये खंड पडतो व यामुळे पदार्थाचे ताणबल कमी होते. याउलट इतर काही बहुवारिकांमध्ये प्रारणामुळे पार्श्वबंधन प्रक्रिया होते असे आढळते. या प्रक्रियेत बहुवारिक रेणूंना एकमेकांशी जोडणारे असे नवे रासायनिक पार्श्वबंध तयार होतात. काही ठराविक प्रमाणात पार्श्वबंधन झाले असता, पदार्थाच्या भौतिक गुणधर्मात अनुकूल असे बदल घडून येतात. पदार्थ जास्त कठीण बनतो व त्याच्या वितळबिंदूतही वाढ होते. अशा प्रक्रियेचा उपयोग करून पॉलिएथिलिनाच्या ताणबलात व उष्णता विरोधकतेत वाढ करता येते. उच्च ऊर्जा प्रारणाच्या औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचा असा हा एक उपयोग आहे. ॲक्रिलोनायट्राइलाच्या विरल विद्रावाचे बहुवारिकीकरण प्रारणामुळे घडवून आणता येते. ही प्रक्रिया पाण्यामध्ये प्रारणामुळे निर्माण होणाऱ्या मुक्त मूलकांच्या द्वारे कार्यान्वित होते, असे मानले जाते. अशा रीतीने आयनीकारक प्रारणामुळे बहुवारिकीकरण प्रक्रिया घडवून आणता येते व त्यांना स्थैर्य देता येते. इतर कोणत्याही प्रकारे शक्य नसलेल्या रासायनिक विक्रिया घडवून आणता येतात. असामान्य अशा परिसरीय परिस्थितीतही (उदा., अती नीच तापमानातील पदार्थ) रासायनिक विक्रिया कार्यान्वित करता येतात.

संदर्भ : 1. Allen, A. O. The Radiation Chemistry of Water and Aqueous Solutions, Princeton, 1961.

            2. Glasston, S. Sourcebook of Atomic Energy, Princeton, 1958.

            3. Segre, E. Experimental Nuclear Physics, New York, 1953.

चिपळोणकर, व. त्रिं.