प्राणतत्त्ववाद : (व्हायटॅलिझम). सजीव पदार्थ आणि निर्जीव पदार्थ असा भेद आपण करतो. सजीव पदार्थाचे सजीव असणे हे जे स्वरूप असते, त्याचे स्पष्टीकरण करू पाहणारी प्राणतत्त्ववाद ही एक उपपत्ती आहे. सजीवपणा ह्या धर्माविषयीचे एका प्रकारचे स्पष्टीकरण प्राणतत्त्ववाद अमान्य करतो आणि त्याच्याऐवजी दुसऱ्या प्रकारच्या स्पष्टीकरणाचा पुरस्कार करतो. सजीवपणाच्या ज्या स्पष्टीकरणाला प्राणतत्त्ववाद विरोध करतो, ते थोडक्यात असे मांडता येईल : सजीव पदार्थ हे अनेक घटकांचे मिळून बनलेले एक संघटण असते आणि ह्या संघटणाचा प्रत्येक घटक हा निर्जीव पदार्थ असतो. कोणताही सजीव पदार्थ आपण घेतला, तर त्याच्या प्रत्येक घटकाचे स्वरूप तत्त्वतः एखाद्या निर्जीव संघटणाच्या घटकांच्या स्वरूपासारखेच असते आणि सजीव संघटणाच्या भिन्न घटकांमधील परस्परसंबंधांचे स्वरूप तत्त्वतः निर्जीव संघटणाच्या घटकांमधील परस्परसंबंधांसारखे असते. ज्याप्रमाणे निर्जीव संघटणाच्या सर्व घटकांचे आणि त्याच्यात घडणाऱ्या प्रक्रियांचे भौतिकी आणि रसायनशास्त्र ह्यांतील संकल्पना आणि नियम यांच्या साहाय्याने संपूर्ण, निःशेष वर्णन करता येईल तसेच ह्या संकल्पना आणि नियम यांच्या साहाय्याने, सजीव पदार्थाच्या कोणत्याही घटकाचे आणि त्याच्यात घडणाऱ्या कोणत्याही प्रक्रियेचे निःशेष वर्णन करता येईल. ह्याच्याविरुद्ध प्राणतत्त्ववादाचा सिद्धांत असा, की सजीव पदार्थामध्ये एक विशिष्ट द्रव्य किंवा तत्त्व उपस्थित असते – ह्याला प्राणतत्त्व म्हणूया – आणि ह्या तत्त्वामुळे त्याला निर्जीव पदार्थाच्या ठिकाणी नसणाऱ्या विशिष्ट शक्ती प्राप्त होतात. ह्यामुळे सजीव पदार्थात घडणाऱ्या सर्व प्रक्रियांचे केवल भौतिकी आणि रसायनशास्त्र यांतील संकल्पना व नियम यांच्या साहाय्याने निःशेष वर्णन करता येणार नाही, अशी भूमिका प्राणतत्त्ववाद स्वीकारतो.
प्राचीन काळात ⇨ ॲरिस्टॉटल (इ. स. पू. ३८४-३२२) आणि आधुनिक काळात ⇨ हान्स आडोल्फ एडूआर्ट ड्रीश (१८६७-१९४१) हे प्राणतत्त्ववादाचे प्रमुख पुरस्कर्ते होत. जैविक प्रक्रिया ‘स्वायत्त’ असतात हे दोघांच्या विचारांना समान असलेले सूत्र होय. सजीव पदार्थाच्या घडणीत एकता असते, त्याच्या कोणत्याही विवक्षित घटकाच्या कार्याचे आकलन त्या सजीव पदार्थाच्या घडणीचा जो सबंध आकृतिबंध असतो त्याच्या संदर्भातच करता येते आणि म्हणून कोणत्याही सजीव पदार्थाच्या ठिकाणी त्याच्या घडणीला एक विशिष्ट आकृतिबंध प्राप्त करून देणारे आणि ह्या आकृतिबंधाचे रक्षण करणारे असे नियामक तत्त्व असले पाहिजे, हा ॲरिस्टॉटल आणि ड्रीश यांनी प्रतिपादन केलेल्या प्राणतत्त्ववादाचा प्रमुख सिद्धांत होय.
एकंदरीत पाहता आधुनिक जीवशास्त्रज्ञांत प्राणतत्त्ववादाला फारशी मान्यता मिळालेली नाही. सजीव पदार्थांची घडण आणि त्यांच्यात होणाऱ्या प्रक्रिया यांच्या स्वरूपाचे प्राणतत्त्ववादाकडून होणारे स्पष्टीकरण अस्पष्ट तर असतेच पण हे केवळ दिखाऊ स्पष्टीकरण असते, खरेखुरे स्पष्टीकरण नसते, असा विरोधकांचा प्राणतत्त्ववादावरील प्रमुख आक्षेप आहे.
संदर्भ : 1. Driesch, Hans, The History and Theory of Vitalism, London, 1914.
2. Schlick, Moritz, Philosophy of Nature, New York, 1949.
रेगे, मे. पुं.
“