प्रभामंडल : (हॅलो). अति-उंचीवर वातावरणात बर्फ-स्फटिक उपस्थित असल्यास त्यांमधून प्रकाशकिरणांचे विचलन होऊन सूर्याभोवती (केव्हा केव्हा चंद्राभोवतीही) दिसणारी वलये व तत्संलग्न ⇨ आभासी सूर्यासारखे काही इतर आविष्कार यांना वातावरणीय प्रभामंडले असे संबोधण्यात येते. विशेषतः ध्रुवीय प्रदेशासारख्या थंड परिसरात हे आविष्कार दिसून येतात.
खळे व प्रभामंडल : अनेकदा चंद्र किंवा सूर्याभोवती खळे दिसते. ते वातावरणातील सूक्ष्म जलबिंदूंकडून प्रकाशाचे प्रकीर्णन (विखुरले जाण्याची क्रिया) झाल्यामुळे तयार होते. खळ्यांचा कोनीय त्रिज्या वेगवेगळ्या मूल्यांच्या असू शकतात. याउलट प्रभामंडलांच्या कोनीय त्रिज्या काही ठराविक मूल्यांच्याच असतात.
अनुकूल परिस्थिती : वातावरणात अवदाब प्रदेश (मध्याकडे वातावरणीय दाब कमी होत गेलेला प्रदेश) निर्माण झाल्यास जोरदार ऊर्ध्वगामी वायुप्रवाह तयार होतात. या प्रवाहांमुळे हवेतील बाष्प ९,००० मी. ते १५,००० मी. उंचीपर्यंत वर नेले जाते. या उंचीवरील नीच तापमानामुळे बाष्पापासून बर्फाचे स्फटिक बनतात व या स्फटिक समुदायांपासून तंतुमेघ [⟶ मेघ]बनतात. तंतुमेघात हे स्फटिक वेगवेगळ्या दिक्स्थितींत विखुरलेले असतात. या स्फटिकांचे आकार (आ.१) वेगवेगळे असतात व ते सभोवतीचे तापमान व संपृक्तता (बाष्पाचे प्रमाण) यावर अवलंबून असतात.
मध्यम जाडीच्या तंतुमेघातील स्फटिकांतून प्रकाशकिरणांचे विचलन होऊन प्रभामंडल दिसू शकते परंतु हीच परिस्थिती आगामी पर्जन्यालाही अनुकूल असल्याने प्रभामंडलाला वाईट हवामानाचा अग्रदूत मानले जाते.
प्राथमिक प्रभामंडल : प्रभामंडल आविष्कारातील हा मुख्य प्रकार होय. या प्रभामंडलाचा आकार वर्तुळाकार असून सूर्यच त्याचा मध्य असतो. याची कोनीय त्रिज्या २२° असल्याने त्याला २२ अंशी प्रभामंडल असेही म्हणतात. त्याची जाडी ११/२ अंश असते आणि आतील कडा तांबूस व बाहेरची कडा निळसर दिसते. सूर्य क्षितिजाजवळ असल्यास संपूर्ण वर्तुळ दिसू शकत नाही. (चित्रपत्र ).
षट्कोनी बर्फ-स्फटिकाच्या एकाआड एक दोन बाजू वाढविल्यास त्यांच्यामध्ये ६०° चा कोन होतो आणि या दोन बाजू मिळून (तुटक रेषांनी दाखविल्याप्रमाणे) एक लोलक बनतो. बर्फाचा सरासरी प्रणमनांक १·३१ आहे व त्यानुसार या बर्फ-लोलकाचा किमान विचलन कोन २२° येतो [⟶ प्रकाशकी]. किमान विचलन होऊन निरीक्षकाच्या डोळ्यावर पडणारे दोन किरण आकृतीमध्ये दाखविले आहेत.
लोलकाच्या खास गुणधर्मानुसार किमान विचलन कोनाच्या आसपास विचलन होणाऱ्या किरणांचे प्रमाण तुलनेने जास्त असते. त्यामुळे किमान विचलन झालेला किरण मागे वाढविल्यास त्या दिशेकडून जास्त प्रकाश आल्यासारखा वाटतो. बर्फ-स्फटिक सर्व दिक्-स्थितींत विखुरलेले असल्याने त्यांच्या एकत्रित परिणामामुळे सूर्याच्या दिशेशी २२° कोन करणाऱ्या सर्वच बाजूंकडून याप्रमाणे जास्त प्रकाश येत आहे, असे वाटते व वर्तुळाकार प्रभामंडल दिसते.
परंतु तांबड्या रंगासाठी प्रणमनांक किमान व निळ्या रंगासाठी तो कमाल मूल्याचा असतो. त्यानुसार त्यांच्या किमान विचलन कोनांची मूल्येही वेगळी येतात व म्हणून प्रभामंडलाची आतली कडा तांबडी व बाहेरची कडा निळसर दिसते. मध्यंतरीच्या भागात सर्व रंग एकमेकांवर पडल्याने तो भाग पांढरा दिसतो.
दुय्यम प्रभामंडल : या प्रभामंडलाचे एकूण स्वरूप वरीलप्रमाणेच असते पण तुलनेने ते बरेच निस्तेज असते. त्याची कोनीय त्रिज्या ४६° असते. बर्फ-पट्टीची एक बाजू व सपाट पृष्ठ यांच्यामध्ये ९०° चा कोन असतो व त्यामुळे बनणाऱ्या लोलकासाठी किमान विचलन कोन ४६° असतो म्हणून त्या प्रभामंडलाची त्रिज्या ४६° येते.
टोपीयुक्त स्तंभाकार व कोचदार स्तंभाकार स्फटिकांमधील प्रणमनामुळे ‘आभासी सूर्य’हा प्रकार उद्भवतो. याशिवाय क्वचित दिसणारे वेगवेगळ्या त्रिज्यांच्या चापाकार प्रभामंडलाचे अनेक प्रकार आहेत. त्यांचे स्पष्टीकरण सर्वसामान्यपणे वरीलसारखेच देता येते परंतु एकंदरीत पाहता अद्याप या निसर्ग चमत्कारांचे संपूर्णपणे आकलन झालेले नाही.
संदर्भ : 1. Daish, C. B. Light, Londan,1959.
2. Lilejequist, G. H. Halo phenomena and Ice Crystals, Boston, 1956.
पुरोहित, वा. ल. मिठारी, भू. चिं.
“