प्रतिज्ञालेख : (ॲफिडेव्हिट). एखाद्या वस्तुस्थितीबद्दल शपथेनुसार केलेले लेखी निवेदन म्हणजे प्रतिज्ञालेख वा प्रतिज्ञापत्र. कायद्यानुसार ज्या अधिकाऱ्याला शपथ देण्याचा अधिकार दिला आहे, त्या अधिकाऱ्यासमोरच प्रतिज्ञालेख करावा लागतो. प्रतिज्ञालेखकाने आपले निवेदन स्वतःचे पूर्ण नाव व ओळख देऊन प्रथमपुरुषी वाक्यरचनेने करावयाचे असते. प्रतिज्ञालेख कोठे व कोणत्या तारखेस केला हेही शेवटी नमूद करावयाचे असते. प्रतिज्ञालेखकाला विशिष्ट अधिकाऱ्यासमोर आपली स्वाक्षरी करावी लागते. ज्या अधिकाऱ्यासमोर प्रतिज्ञालेख करावयाचा असतो, त्याचा हुद्दा आणि कार्यालयाचा शिक्का प्रतिज्ञालेखावर आवश्यक असतो. प्रतिज्ञालेखकाच्या पात्रतेसंबंधी कायद्यात नमूद केलेल्या तरतुदी बंधनकारक असतात. प्रतिज्ञालेखातील मजकूर पुरावा म्हणूनही न्यायालयात दाखल करता येतो. प्रतिज्ञालेख कायद्याने ठरवून दिलेल्या किंमतीएवढ्या (सर्वसाधारण मुद्राकिंत कागदावर) करून त्यावर न्यायालयशुल्काचे तिकीट लावावे लागते. अर्थात या संदर्भात ज्या प्रकारचे कायदे असतील त्या प्रकारचे प्रतिज्ञालेखन करावे लागते. एखाद्या खटल्याची न्यायालयीन चौकशी चालू असतानाही प्रतिज्ञालेख करता येतो व तो पुरावा म्हणून सादर करता येतो. मात्र त्यासाठी सर्वसाधारण मुद्राकिंत कागदाची आवश्यकता नसते. सामान्यपणे प्रतिज्ञालेख करताना सत्य सांगावे लागते आणि प्रतिज्ञालेखात खोटे निवेदन केले असेल, तर प्रतिज्ञालेखक फौजदारी गुन्ह्याच्या शिक्षेस पात्र ठरतो.

कुलकर्णी, स. वि.

.