प्रतियुती : पृथ्वीसापेक्ष दोन स्वस्थ पदार्थ विरुद्ध दिशांना असतानाची स्थिती. चंद्र किंवा बहिर्ग्रह (ज्याची कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर आहे असा ग्रह उदा., मंगळ) सूर्याच्या विरुद्ध दिशेला असताना सूर्य व तो ग्रह प्रतियुतीत आहेत, असे म्हणतात. प्रतियुती हा एक क्षण आहे. दोन ग्रहसुद्धा प्रतियुतीत असू शकतात. प्रतियुतीच्या वेळी स्वस्थ पदार्थातील अपगम (कोनीय अंतर) म्हणजे भोगांशांमधील किंवा विषुवांशांतील फरक १८०° असतो. [⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति]. पौर्णिमेला सूर्य व चंद्र पृथ्वीच्या विरुद्ध दिशांना असतात म्हणून ती त्यांची प्रतियुती असते. बहिर्ग्रहच फक्त सूर्याशी प्रतियुतीत असू शकतात. बहिर्ग्रहांचे निरीक्षण करण्याच्या दृष्टीने प्रतियुतीचा व तिच्या आसपासचा काळ सोयीचा असतो. कारण अशा वेळी ग्रह पृथ्वीपासून कमीत कमी अंतरावर असतो व तेव्हा ग्रहाचे पूर्ण बिंब दिसते. तसेच या काळात तो मध्यरात्री याम्योत्तरवृत्तावर (खगोलाचे ध्रुव बिंदू व निरिक्षकाचे स्वस्वस्तिक-थेट माथ्यावरचा बिंदू-यांतून जाणाऱ्या खगोलावरील वर्तुळावर) येतो. बुध व शुक्र अंतर्ग्रह असून त्यांच्या कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या आतील बाजूस असल्याने त्यांची सूर्याशी प्रतियुती होत नाही.

पहा: युति

ठाकूर, अ. ना.