पौर्णिमा : (पूर्णमासी, पूर्णिमा, पौर्णमासी). ज्या दिवशी पूर्ण चंद्रबिंब दिसते ती किंवा पौर्णिमान्त महिन्याची शेवटची तिथी. ‘मास’ या शब्दाचा चंद्र असाही अर्थ आहे म्हणून पूर्णमास म्हणजे पूर्णचंद्र होय व त्यावरून ज्या दिवशी चंद्र पूर्ण होतो त्या दिवसाला पूर्णमासी, पौर्णमासी वगैरे नावे पडली असावीत. वास्तविक पौर्णिमा हा एक क्षण असून त्या क्षणी चंद्र व सूर्य पृथ्वीच्या विरुद्ध बाजूंना असतात व त्यांच्यातील अपगम (पृथ्वीवरून मोजलेले त्यांच्यातील कोनीय अंतर) १८०° असते म्हणजे ते प्रतियुतीत असतात. पौर्णिमेला पृथ्वीच्या बाजूला असणारा चंद्राचा अर्धा भाग सूर्यकिरणांनी पूर्णपणे प्रकाशित झालेला असल्याने चंद्रबिंब वर्तुळाकार दिसते. ज्या पौर्णिमेला चंद्र, सूर्य व पृथ्वी एका सरळ रेषेत येतात त्या दिवशी चंद्रग्रहण होते [→ ग्रहण]. पौर्णिमेचा क्षण दर २९·५३ दिवसांनी पुनःपुन्हा येतो व या कालावधीला मास अथवा ⇨ महिना म्हणतात. अवेस्ता या पारशी धर्मग्रंथात चंद्राला ‘माह’ असा शब्द आहे, हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे. प्राचीन काळी पौर्णिमान्त महिना हा चांद्रमास समजण्यात येई, असे वैदिक वाङ्मयातील अनेक उल्लेखांवरून दिसून येते. चांद्रवर्षात बारा महिन्यांच्या बारा पौर्णिमा येतात आणि पूर्णचंद्र ज्या नक्षत्राजवळ असेल, त्या नक्षत्रावरून त्या महिन्याला नाव दिलेले असते (उदा., चित्रा नक्षत्रावरून चैत्र). या विशिष्ट नक्षत्री पूर्णचंद्र गुरूने युक्त असल्यास त्या पौर्णिमेस ‘महापौर्णिमा’ म्हणतात. सोळा कलांनंतरचे पूर्णचंद्रदर्शन अत्यंत शुभकारक मानतात. म्हणून त्या दिवशी अनेक धार्मिक गोष्टी करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. अग्निहोत्री यजमान पौर्णिमेच्या निमित्ताने ‘पूर्णमासयाग’ नावाचा याग करतात. पूर्ण चंद्र हा नावाड्यांचा, कामी जनांचा व कवींचा लाडका आहे. पौर्णिमेच्या दिवशी योगायोगाने काही चांगल्या घटना घडल्यामुळे काही पौर्णिमांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
चैत्री पौर्णिमा हनुमान जयंती तर वैशाखी पौर्णिमा बुद्धजयंती म्हणून प्रसिद्ध आहेत. ज्येष्ठातील पौर्णिमेस वटसावित्रीचे व्रत करतात. आषाढी पौर्णिमा ही ⇨ गुरुपौर्णिमा असून त्या दिवशी गुरुपूजन करून गुरूकडून मंत्रोपदेश घेतात. श्रावणातील पौर्णिमेस उपाकर्म (श्रावणी) करतात. याच पौर्णिमेला रक्षाबंधन असल्याने तिला ⇨ राखी पौर्णिमा व समुद्राला नारळ समर्पण करतात म्हणून नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. भाद्रपदातील पौर्णिमेला पितरांकरिता श्राद्ध करतात. आश्विनातील पौर्णिमेला ⇨ कोजागरी पौर्णिमा म्हणतात. कार्तिकी पौर्णिमेस शंकराने त्रिपुरास मारले म्हणून तिला ⇨ त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. मार्गशीर्षातील पौर्णिमेस दत्तजयंती असते, तर पौषी पौर्णिमेस विष्णूची पूजा व माघातील पौर्णिमेस तीर्थस्नान करतात. माघातील पौर्णिमेस शनी मेषेत तसेच गुरू व चंद्र सिंह राशीत असतील, तर तो दिवस मोठे पर्व मानला जातो. फाल्गुनी पौर्णिमेस होळीचा सण साजरा करतात. [→ होळी पौर्णिमा].
जन व बौद्ध धर्मीय लोक पौर्णिमा हा धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा दिवस मानतात. जैन लोक चैत्री व कार्तिकी पौर्णिमेस तीर्थयात्रा करतात, तर आषाढी व फाल्गुनी पौर्णिमेला उपवास, दिव्यांची आरास इ. करतात.
ठाकूर, अ. ना. भिडे, वि. वि.
“