पोल्डर : पोल्डर म्हणजे एक प्रकारची पुन:प्रापित जमीन. समुद्रसपाटीला किंवा त्याखाली असलेल्या दलदलयुक्त जमिनीवरील समुद्राच्या भरतीचे पाणी त्याचप्रमाणे नदी, तलाव यांतील पाणी बांध घालून उपसून टाकले जाते. अशा प्रकारे लागवडीस योग्य केलेल्या जमिनीस पोल्डर म्हणतात. काही वेळा आवश्यक तेथे पाण्यातील मिठाचा अंश वनस्पती व जिप्सम यांच्या साहाय्याने काढून टाकण्यात येतो. पोल्डर ही डच संज्ञा असून अशा प्रकारे जमीन संपादन करण्याचे काम जवळजवळ एकतृतीयांशापेक्षा जास्त भाग समुद्रसपाटीखाली असलेल्या नेदर्लंड्समध्ये सु. सतराव्या शतकापासून चिकाटीने केलेले आढळून येते. या जमिनीचा उपयोग मका, अंबाडी, बीट इ. पिकांसाठी व गुरांना चरण्यासाठी केला जातो. [→ झाइडर झी नेदर्लंड्स].
कुमठेकर, ज. ब.