पोपशासन : (पेपसी). रोमच्या (इटली) व्हॅटिकन सिटीमधील रोमन कॅथलिक चर्चच्या केंद्रीय व्यवस्थापकीय पद्धतीला इंग्रजीत पेपसी असे संबोधण्यात येते. पोपशासन हा त्या संज्ञेचा मराठी पर्याय. ‘पेपसी या संज्ञेने रोमन कॅथलिक चर्चचा सर्वश्रेष्ठ धर्मप्रमुख पोप आणि त्याची कार्यपद्धती यांचा निर्देश होतो. पोपच्या धर्मपीठाची खास परंपरा आणि पोपच्या सत्तेची कालमर्यादा असेही अर्थ पेपसी या संज्ञेतून सूचित होतात. अद्यापही व्हॅटिकन सिटीचे एक राज्य म्हणून असलेले स्वतंत्र अस्तित्त्व पोपशासनाला एक विशिष्ट अर्थ प्राप्त करून देते.

व्हॅटिकनच्या पोपशासनाला प्रदीर्घ इतिहास आहे. जर्मनी आणि फ्रान्स या दोन देशांच्या राजकीय वर्चस्वामुळे इटली हा देश दिर्घकाळपर्यंत राज्यांचा एक समूह म्हणूनच नांदत होता. इटलीचा राजकीय नकाशा या दोन देशांच्या प्रभावामुळे अनेकदा बदलला. या राजकीय परिस्थितीत इटलीचा मध्य प्रदेश हा रोमन कॅथलिक सत्तेचा मध्यबिंदू होता. लाँबर्डचा (एक जर्मन जमात) राजा आयस्टुल्फ याने पोप तिसरा स्टीव्हेन यास त्रास दिला. स्टीव्हेनने फ्रँक जमातीचा राजा पेपिन याजकडे मदत मागितली. पेपिनने आयस्टुल्फचा पराभव करून इटलीचा मध्यभाग काबीज केला आणि तो पोप तिसरा स्टिव्हेन यास बक्षीस दिला( इ.स. ७५४). हा बक्षीस मिळालेला भूभागच पुढे पेपल राज्य म्हणून ओळखला जाऊ लागला आणि पोप हा एक सामर्थ्यशाली राजा झाला. पहिल्या नेपोलियनने (१७६९–१८२१) इटलीवर स्वारी करून तो देश आपल्या एकछत्री अंमलाखाली आणला. त्यामुळे पेपल राज्याचे अस्तित्त्वच नाहीसे झाले. नेपोलियनच्या पराभवानंतर इटलीस स्वातंत्र्य मिळाले. पोप इटलीस परतला आणि त्याला त्याचे पेपल राज्य परत मिळाले. व्हिएन्नाच्या परिषदेने या राज्यग्रहणावर शिक्कामोर्तब केले. १८७० मध्ये रोम ही संयुक्त इटलीची राजधानी झाली. पोपचे राज्य व्हॅटिकन शहरापुरतेच मर्यादित झाले आणि त्याला ६,८५,००० पौंडांचे निवृत्तीवेतन देऊ करण्यात आले. या तडजोडीस पोपने नकार दिला. त्यामुळे पोप हा १९२९ पर्यंत व्हॅटिकन शहरात नजरकैदेत होता.

मुसोलिनीने १९२९ मध्ये व्हॅटिकन सिटीला एक सार्वभौम स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली. व्हॅटिकन सिटी ही सध्या एक पेपल राज्य असून त्याची लोकसंख्या एक हजाराच्या आसपास आहे. व्हॅटिकन सिटी येथे छोटेसे लोहमार्ग स्थानक असून पोपशासनाचे स्वतंत्र नभोवाणी केंद्र आणि डाकघर आहे. पोपशासनाचे इतर राज्यांशी होणारे व्यवहार राजकीय पातळीवर होतात. तेथील ग्रंथालयात अनेक दुर्मिळ ग्रंथ आणि कागदपत्रे आहेत. तेथे कार्डिनलचा मोठा मठ आहे. तेथील कार्डीनलमधूनच पोपची निवड होते. व्हॅटिकन सिटीतील रमणीय बगीचा आणि सेंट पीटरचे कॅथीड्रल उल्लेखनीय आहेत. तेथील राजप्रासादाच्या सौधावर येऊन आशिर्वाद देणाऱ्या पोप महाराजांची प्रतिक्षा करीत असंख्य कॅथलिक बांधव तेथील प्रांगणात एकत्र येतात. पोप हे क्वचितच परदेशगनम करतात पहिल्या नेपोलियनच्या पॅरिस येथील राज्याभिषेकप्रसंगी (२ डिसेंबर १८०४) पोप पायस उपस्थित होते. १९६४ साली पोप सहावे पॉल यांनी भारताला भेट दिली होती. त्यावेळी मुंबईत त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. धर्मश्रद्धा आणि समाजजीवन यांत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर पोप महाराजांनी केलेली विधाने कॅथलिक जगतात मान्य केली जातात.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात व्हॅटिकन सिटीचे माहात्म्य दोन्ही बाजूंच्या युद्धखोरांनी मान्य केले. पोप दहावे जॉन यांनी मोठे प्रयत्न करून हजारो ज्यूंची हिटलरच्या छळापासून सुटका केली, असे मानले जाते. परंतु गेल्या काही वर्षांच्या संशोधनामुळे उपलब्ध झालेल्या माहितीवरून हा दावा आता विवाद्य राहिलेला आहे.

पोपशासन हा एक वादविषय आहे. प्रोटेस्टंट आणि कॅथलिक यांत रोमच्या बिशपच्या (पोपच्या) विशिष्ट स्थानमहात्म्याबाबत एकमत नाही. रोमन कॅथलिकांची अशी श्रद्धा आहे की, येशूचा एक आद्य शिष्य सेंट पीटर हा पहिला पोप आहे. तो व त्याचे वारसदार हे ईश्वरी शक्तीच्या प्रेरणेने नीतितत्त्वे आणि धर्मतत्त्वे विशद करतात ती अचूक असतात. सेंट पिटरने रोम शहरात चर्चची स्थापना केली, म्हणून रोम हे कॅथलिकांच्या श्रद्धेचा मानबिंदू आहे. परंतु आधुनिक संशोधनामुळे सेंट पिटर खरोखर रोमच्या चर्चचा संस्थापक होता की काय, याबद्दल आता संशय निर्माण झाला आहे.

पोपशासनाचे ऐतिहासिक कार्य निर्विवादपणे महत्त्वाचे ठरले आहे. यूरोपमधील आणि विशेषतः इटलीतील अस्थिरतेमुळे जगातील देशोदेशीच्या असंख्य कॅथलिक बांधवांना पोपशासनाने संघटित राखले. त्याचे अनुकरण करणे, ही त्यांची जीवनपद्धती ठरली. मध्ययुगापासून यूरोपमध्ये राजेलोकांनी अनेक राजकीय गट निर्माण केले. त्या काळात लोकांच्या मनावर नीतितत्त्वे आणि धर्मिक श्रद्धा यांचा जबरदस्त पगडा होता. अशा परिस्थितीत ख्रिस्ती धर्मश्रद्धेत अनेक पंथ निर्माण झाले. असे असूनही ख्रिस्तीतर जगाला व्हॅटिकनचे पोपशासन हेच ख्रिस्ती धर्म आणि नीतितत्त्व यांचे प्रमुख स्थान वाटते. पोपशासनाचे सामर्थ्य व कमकुवतपणा यातच आहे.

संदर्भ : Hutchinson, Paul Garrison, W. E. 20 Centuries of Christianity a Concise History, New York, 1959.

आयरन, जे. डब्ल्यू.