पोटॅटो व्हाइन : (इं. बिटरस्वीट लॅ. सोलॅनम जॅस्मिनॉइंडिस कुल-सोलॅनेसी). ही सडपातळ पानझडी वेल मूळची दक्षिण अमेरिकेतील (ब्राझील) असून शोभेकरिता भारतात सपाट प्रदेशातील व टेकड्यांवरील बागांतून लावली जाते. जवळच्या वृक्षावर ती खूप उंचीपर्यंत चढत जाते. चांगला निचरा असलेली जमीन व सावली असल्यास छाट कलमे चांगली वाढतात. फांद्या गुळगुळीत व मऊ असतात. पानाचा देठ ४-५ सेंमी. लांब असून संवेदनाक्षमतेमुळे जवळच्या आधाराभोवती गुंडाळून वेलीस चढण्यास मदत करतो. पाने लहान, साधी चिवट, संमिश्रवर्णी व काहीशी भाल्यासारखी असतात. फुलोरा शेंड्यावर मार्च-ऑक्टोबर या काळात येतो. तो सु. ८ सेंमी. लांब वल्लरीय परिमंजरीसारखा [→ पुष्पबंध] असतो त्यावर ८–१२ फुले असून प्रत्येक फूल सु. २–५ सेंमी. व्यासाचे व पांढरे असते आणि त्यावर निळसर छटा असते आकार ताऱ्यासारखा असून शोभिवंत दिसतो संरचना व इतर शारीरिक लक्षणे सामान्यतः ⇨ सोलॅनेसी कुलात (धोतरा कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. फळे लहान व लाल असून कोंबड्यांना विषारी असतात. पाने व फळे यांत सोलासोडीन असते. फक्त पानात ते १·११% असते त्यात क्लोरोजेनिक अम्लही असते.
जोशी, रा. ना.