आखणी : (लेआउट). संकल्पित मुद्रिताचा मुद्रणपूर्व आकृतिबंध. मुद्रणीय मजकूर व त्याचे सुनिदर्शन यांची उपलब्ध सोयीनुसार आकर्षक व अभिप्रेत मांडणी करणे, हा आखणीचा हेतू असतो. आखणीत मुद्रणाची टंकवळणे, मजकुराची मांडणी तसेच शीर्षके, उपशीर्षके, चित्राकृती इत्यादींचे स्थान व आकार, मोकळ्या जागा, अलंकरणविषयक व रंगविषयक निदर्शन वगैरे घटकांचा समावेश होतो. मुद्रणासाठी मुद्रणघटकांचा आकृतिबंध नेत्रसुखदता, सुवाच्यता व आकर्षकता या दृष्टींनी साधला जातो.
आखणी ही प्रामुख्याने संयोजन-कला आहे : मुद्रणघटकांचे कलात्मक व सुनियत संयोजन साधताना मुद्रणपृष्ठाच्या स्पष्ट व सविस्तर आकलनाची खबरदारी घेणे आवश्यक असते. तसेच त्याच्या वाचनाचा ओघ बाधित करणाऱ्या गोष्टी टाळणेही इष्ट असते. मुख्य म्हणजे पाहणाऱ्यास आखणीच्या आकृतिबंधाची वेगळी व स्वतंत्र जाणीव झाल्यास मुद्रणपृष्ठाच्या आकलनात अडथळा येण्याची शक्यता असते.
मुद्रणघटकांचे संयोजन त्यासाठी वापरावयाच्या साधनांवर अवलंबून असते. त्या साधनांमध्ये चित्रफलक, पेन्सिली, कुंचले, रंग इ. चित्रकलेच्या सर्वसामान्य साधनांबरोबरच वक्रणी, टी-गुण्या, तिकोनी गुण्ये, कोनमापक, विविध प्रकारच्या आरेखलेखण्या, रबरविद्राव, कात्र्या, पाती वगैरे तांत्रिक साधनांचा समावेश होतो.
आखणीची तांत्रिक प्रक्रिया सर्वसामान्यत: पुढीलप्रमाणे असते : आखणीची एखादी विशिष्ट कल्पना साकार करण्यासाठी तिच्या बीजचित्रापासून तिच्या अनेकविध अवस्थांचे कच्चे आराखडे करावे लागतात. कारण त्यांतून अभिप्रेत आखणीच्या अनेकविध कल्पना संभवतात. हे कच्चे आराखडे लहान आकारांचे व सफाईकडे लक्ष न देता भराभर रेखाटलेले असतात. यांमधूनच पुढे एखादा आराखडा निवडून त्यावरून कच्चे आरेखन (रफ) करतात. या आरेखनाचा आकार नंतर तयार होणाऱ्या पूर्ण आखणीच्या आकारइतकाच असतो तसेच ते बरेचसे परिपूर्ण व सफाईदार असते. हे आरेखन तात्पुरते
असून आखणीची त्वरित व ठळक रूपरेषा दर्शविते. त्यात चित्रांचे व आकृत्यांचे कच्चे रेखाटन असले तरी त्यांचे मुद्रणपृष्ठातील स्थान व महत्त्व दर्शविलेले असते. शीर्षकाची अक्षरे सफाईदार नसतात पण त्यासाठी वापरावयाच्या टंकांविषयीचे सूचन त्यात असते. मुद्रणाचा मजकूर केवळ टंकांची उंची दाखवणाऱ्या समांतर रेषांनी दर्शवितात. रंगांविषयीही असेच सूचन असते. कच्च्या आरेखनावर संस्कार होऊन पुढे मुद्रणपृष्ठाची सर्वसमावेशक प्रतिकृती (काँप्रीहेन्सिव्ह डमी) तयार होते. या प्रतिकृतीत शीर्षकाचे आरेखन सफाईदार व व्यवस्थित करतात. यातही मुद्रणाचा मजकूर समांतर रेषांनी वा तयार मिळणाऱ्या सांकेतिक टंकांनी दर्शवितात. याच वेळी चित्राकृती तयार असल्यास त्यांच्या छायाचित्रित प्रती करून त्या योग्य ठिकाणी डकवितात. एकाच आखणीचा वापर विविध साच्यांमध्ये करावयाचा असल्यास तिच्या छायाचित्रित प्रती काढतात. अंतिम मुद्रणकल्प (मेकॅनिकल) ही संकल्पित मुद्रिताची एक प्रकारे प्रतिकृतीच असून ती त्याच आकाराची वा मोठी असते.
आकृतिबंध ही आखणीची सर्जनशील प्रक्रिया आहे व तीत कोणत्याही तंत्रसाधनापेक्षा व्यक्तिगत कौशल्याला असाधारण स्थान असते. आखणीकाराच्या ठिकाणी कल्पनाशक्ती व रेखाटनकौशल्य हे दोन्ही गुण असावे लागतात. आखणीतील मुद्रणघटकांच्या जुळणीमध्ये पाहणाराला ठळकपणाने जाणवेल, असा तर्कसंगत रचनाक्रम ठेवावा लागतो. आखणीच्या आकृतिबंधामध्ये आकर्षकता आणण्यासाठी कित्येकदा विरोधतत्त्व वापरले जाते. हे विरोधतत्त्व कोणत्याही घटकांचे आकार, परिमाण व छटा यांमुळे साधले जाते. उदा., एखाद्या मोठ्या चित्राच्या सान्निध्यात लहानलहान चित्रांचा वापर, रोमन टंकांबरोबर तिरप्या टंकांचा वापर, आडव्या घटकांमध्ये क्वचित उभ्या घटकांचा वापर वगैरे.
आखणीमध्ये दोन प्रकारांनी वर्गवारी करता येते : (१) ठराविक समतोल पद्धतीची वा समप्रमाणबद्ध आखणी. (२) अनपेक्षित समतोल पद्धतीची वा गतिमान समतोल असलेली आखणी.
प्रमाणबद्ध आखणीमध्ये पृष्ठाच्या मध्यभागाचा उभा आस केंद्रीभूत धरून प्रत्येक घटकाचा समतोल साधला जातो. यात अगदी साधा प्रकार म्हणजे पृष्ठाच्या मध्यभागावर अधिष्ठित असा घटकांचा समतोल साधणे. समप्रमाणबद्ध आखणीमध्ये एकप्रकारची अपरिहार्य स्थिरता, साचेबंदपणा व साधेपणा असला, तरी तीत आकर्षकताही आणता येते.
आखणीतील अनपेक्षित समतोल अधिक आकर्षक व लवचिक असतो. यातील आस समतोल दृष्टीने निश्चित करता येतो व त्यानुसार इतर घटकांची रचना करता येते. अभिजात, भौमितिक, उभ्या आसावर आधारित, समचतुष्कोणाकृती, विस्तारित, ‘कनोटेटिव्ह’ किंवा ‘जाझ’ अशा एक वा अनेक आकृतिबंधाच्या गुणधर्मांतून सर्वसाधारणत: आखणीतील अनपेक्षित समतोल साधला जातो. कोणत्याही अनपेक्षित आखणीमध्ये प्रत्येक घटकाची स्थाननिश्चिती व तिची अपरिहार्यता सिद्ध व्हावी लागते. त्यामुळे आखणीतील प्रत्येक घटकाला योग्य स्थान मिळते.
आखणीमध्ये अलंकरण करताना काही पथ्ये पाळावी लागतात. आखणीत अलंकरणाचा वापर मर्यादित प्रमाणातच करावा लागतो. आखणीतील इतर घटकांशी वजन, आकार, औचित्य या दृष्टींनी हे अलंकरण सुसंगत असावे लागते तसेच ते टंकाशीही संतुलित ठेवावे लागते. अलंकरण म्हणून किंवा अलंकरणात रंग वापरले असतील, तर ते मुळातील काळ्या छपाईशी सुसंवादी हवेत. अलंकरण कार्यसाधक असले पाहिजे. अलंकरणाचे कार्य विशिष्ट भाववृत्ती निर्माण करणे, वाचकांच्या दृष्टीला आल्हाद देणे किंवा मार्गदर्शन करणे अशा स्वरूपाचे असते. केवळ रिकाम्या जागा भरण्यासाठी अलंकरणाचा वापर होऊ नये.
आखणीमुळे संकल्पित मुद्रणासाठी लागणाऱ्या खर्चाचा निश्चित अंदाज काढता येतो तसेच मुद्रणासाठी वापरावयाच्या कागदाचा आकार व जात, रंगसंख्या व एकंदर कामाचा कालावधी यांबाबतची कल्पना येते. आखणी चित्रकार, छायाचित्रकार, अक्षरारेखक, टंकयोजना-तज्ञ, मुद्रक वगैरे सर्वांना मार्गदर्शक ठरते. तसेच मुद्रणकामाशी संबंधित असलेल्या तंत्रज्ञांना एकूण कामाची दिशा व त्यातील स्वत:ची भूमिका यांविषयी पूर्वकल्पना मिळते. जाहिरातपटासाठी किंवा दूरचित्रवाणीसाठी चित्रमालिकेची जी आखणी केली जाते, तिच्यामुळे दिग्दर्शकास संपूर्ण कामाची पूर्वकल्पना मिळून अनावश्यक परिश्रम वाचतात व कच्च्या फिल्मचीही बचत होते.
लहानशा ओळखपत्रिकेपासून ते थेट भित्तिपत्रकापर्यंत कोणतेही मुद्रणकाम असो, त्याची आखणी करणे आवश्यक ठरते.
आज अद्ययावत साधनांच्या उपलब्धतेमुळे व आखणीकारास असणाऱ्या पूर्ण रचनास्वातंत्र्यामुळे सर्व ⇨आरेख्यक कलांमध्ये आखणी ही आवश्यक व आल्हाददायी कला मानली जाते.
संदर्भ : 1. Arnold, Edmund C. Ink on Paper, New York, 1963.
2. Lee, Marshall, Book Making, New York, 1965.
इनामदार, श्री. दे.
“