आकाश : उघड्या जागेत आपल्या सभोवार एक प्रचंड घुमट क्षितिजावर टेकल्यासारखा भासतो. त्याला आपण ‘आकाश’ म्हणतो. आकाश जेव्हा संपूर्ण अभ्राच्छादित असते, तेव्हा त्याचा घुमटाकार लोप पावून ते सपाट असल्यासारखे दिसते. निरभ्र आकाशाचा डोक्यावरील भाग क्षितिजावरील भागापेक्षा जवळ भासतो. आकाशाचा निळसर रंग हा पृथ्वीच्या वातावरणातील वायूंच्या रेणूंनी व धुळीच्या सूक्ष्म कणांनी सूर्य़किरणांचे प्रकीर्णन केल्यामुळे (सूर्यकिरण विखुरले गेल्यामुळे) दिसतो, अशी एक उपपत्ती आहे [→ आकाशवर्ण] . आकाशाच्या भूपृष्ठानजीकच्या सु. १,१०० किमी. उंचीपर्यंतच्या भागापर्यंत वातावरण पसरलेले असून त्यात ढग, वारे, पाऊस इ. आविष्कार आढळतात. ज्योतिर्विदांच्या दृष्टीने आकाश हा ‘खगोल’ आहे व त्यातच आपणास सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, नक्षत्रे, दीर्घिका इ. दिसतात.

जगातील बहुतेक धर्मात आकाशासंबंधी विविध कल्पना आढळून येतात. काही धर्मात आकाशाला देवता मानण्यात आलेले आहे. आकाश हे एक जड आच्छादन असून ते क्षितिजावर असलेल्या खांबांवर टेकलेले आहे, अशी कल्पना प्राचीन ईजिप्तमधील लोकांत रूढ होती. वैदिक काळातील भारतीयांच्या मते आकाश म्हणजे एक पोकळी किंवा अवकाश असून ते पंचमहाभौतिक तत्त्वांपैकी पाचवे आहे. पृथ्वी, आप, तेज व वायू ही तत्त्वे आकाशातच निर्माण झालेली आहेत असेही ते मानत. वैदिक वाङ्‌मय आकाशाच्या व्याप्तीचा उल्लेख घटाकाश, मठाकाश, चिराकाश इ. नावांनीही केलेला पुष्कळ ठिकाणी आढळतो. 

पहा : अवकाश आकाशवर्ण.

गद्रे, कृ. म.