आजगावकर, जगन्नाथ रघुनाथ: (१६ ऑगस्ट १८७९– २७ ऑगस्ट १९५५). मराठीतील संतचरित्रकार. मालवण तालुक्यातील वराड गावी जन्म. इंग्रजी चौथीपर्यंत शिक्षण. १८९९ पासून मुंबई, पुणे व कोल्हापूर या ठिकाणी अनेक प्रकारच्या नोकऱ्या केल्या. १९११ नंतर मुंबईत वास्तव्य. काही काळ इंदुप्रकाशच्या संपादकीय विभागात काम केले. पुढे ज्ञानांजन नावाचे स्वतःचे मासिक चालविले. ते बंद पडल्यावर अच्युतराव कोल्हटकरांच्या संदेश  पत्राच्या कचेरीत त्यांना काम मिळाले. रणगर्जना व सुधारक या पत्रांचे काही काळपर्यंत ते संपादकही होते. नंतर मात्र नोकरी सोडून संतवाङ्मयाच्या संशोधनास त्यांनी वाहून घेतले. 

१९०७ ते १९३५ या काळात त्यांच्या महाराष्ट्रकविचरित्राचे नऊ भाग प्रसिद्ध झाले. प्रसिद्ध, अप्रसिद्ध व नव्यानेच संशोधित केलेल्या शंभराहून अधिक प्राचीन कवींचा त्यांत समावेश होतो. कवीची चरित्रात्मक माहिती व अवतरणे देऊन केलेले त्याच्या काव्याचे रसग्रहण अशी मांडणी त्यात आढळते. संतचरित्रांतील अद्‌भुत चमत्कारांचा आग्रहाने पुरस्कार करून भाविकतेने व ढोबळ रसिकतेने लिहिलेली ही कविचरित्रे प्राय: संकलनात्मक आहेत. ऐतिहासिक दृष्टिकोन, शास्त्रीय संशोधन व पाठचिकित्सा यांचा त्यांत अभाव आहे. मात्र त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेल्या प्राचीन मराठी संतकवी (भाग १, १९५७), या ग्रंथात अद्ययावत संशोधनाच्या आधारे पंचेचाळीस संतकवींच्या चरित्रांचे त्यांनी पुनर्लेखन केले. या ग्रंथाची प्रस्तावनाही चिकित्सक आहे. मराठी आद्यकवि श्रीज्ञानदेव (१९२३), श्रीसमर्थचरित्र (१९३५) व महाराष्ट्र संत-कवयित्री (१९३९) हे त्यांचे महत्त्वाचे अन्य ग्रंथ होत. त्यांच्या संपादित पुस्तकांत श्रीतुकारामबुवांचे अप्रसिद्ध अभंग (१९२२), संतकवींच्या भगवद्गीतेवरील टीकांचा भगवद्गीताभाग पहिला, अध्याय पहिला (१९३१) हा संग्रह व महिपतीच्या भक्तविजयातील श्रीएकनाथतुकाराम चरित्र (१९४४) यांच्या अंतर्भाव होतो.

आजगावकरांनी अर्वाचीन कवींच्या काव्यातील वेच्यांचा एक संग्रहही संपादित केला आहे (१९२८).कवनकुतूहल (१९०१) हा काव्यसंग्रह तसेच प्रणयविकसन (१९१०) व प्रणयानंद (१९१०) ही संगीत नाटके आणि अनेक पुराणकथा, बालकथा, नीतिकथा एवढे त्यांचे ललित साहित्य आहे. नेपाळवर्णन (१९०६) व भरतपुरचा वेढा (१९१९) हे त्यांचे ऐतिहासिक लेखन. त्यांना ‘महाराष्ट्रभाषाभूषण’ ही पदवी आदराने लावली जाते. मुंबई येथे ते निधन पावले.

जाधव, रा. ग.