अस्यूत : ईजिप्तमधील औद्योगिक व व्यापारी शहर. लोकसंख्या सु. १,७५,७०० (१९७० अंदाज). हे नाईल नदीच्या पश्चिम तीरावर कैरोच्या दक्षिणेस लोहमार्गाने ३७८ किमी. आहे. ‘स्यूत’ व कालांतराने ‘लायकोपोलिस’ या नावांनी हे शहर पूर्वी प्रसिद्ध होते. दक्षिणेकडील सूदान व पश्चिमेकडील लिबिया वाळवंटांतील मरुद्याने यांच्यामधील दळणवळणाचे व व्यापाराचे हे प्रमुख केंद्र म्हणून पूर्वीपासून प्रसिद्ध होते. ‘कॉप्ट’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या ख्रिश्चनांचे हे केंद्रस्थान आहे. शैक्षणिक केंद्र म्हणूनही याची ख्याती आहे. उत्कृष्ट चिनीमातीची भांडी, हस्तिदंती वस्तूंवरील नक्षीकाम, कातड्याच्या वस्तू, नक्षीदार लाकूडकाम, रेशमी शाली व गालिचे यांकरिता हे प्रसिद्ध आहे. शहराजवळ १९०२ मध्ये चुनादगडांमध्ये बांधलेले, ८२० मी. उंच व ५ मी. रुंद असे एक मोठे धरण असून, या धरणापासून काढलेला ६० मी. रुंद व ३२२ किमी. लांब ‘इब्राहिमिया’ कालवा आसपासचा प्रदेश समृद्ध करतो. शहराच्या भोवताली जुने अवशेष सापडतात.
लिमये, दि. ह.