अस्त्रविद्या, प्राचीन : अस्त्र म्हणजे मानवी शक्तीच्या किंवा यंत्रायुधाच्या साह्याने फेकले जाणारे व प्रामुख्याने विध्वंसक साधन. शस्त्रास्त्रांचे मुक्त, अमुक्त, मुक्तामुक्त व यंत्रमुक्त असे चार प्रकार सांगितले आहेत. अस्त्रे मुक्त किंवा यंत्रमुक्त असतात. मुक्त म्हणजे वापरणार्यापासून सुटून जाऊन स्वत:च्या शक्तीवर कार्यसिद्धी साधणारी चक्रादी. यंत्रमुक्त म्हणजे यंत्रायुधांच्या साह्याने फेकली जाणारी शरादी. अस्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे ते फेकले जाण्यासाठी वापरलेल्या शक्तीव्यतिरिक्त स्वयंशक्तीने कार्य साधण्याची त्याची कुवत. प्राचीन काळी केवळ मंत्रशक्तीने अस्त्रे सिद्ध केली जात असत, असा समज रूढ आहे.
शस्त्रास्त्रांची उत्पत्ती जवळजवळ मानवाएवढी जुनी आहे. ईजिप्त, बॅबिलोनिया, चीन, ग्रीस इ. देशांच्या प्राचीन संस्कृतींमध्ये अस्त्रविद्येबाबत उल्लेख आढळतो. इतर शस्त्रविद्येप्रमाणे अस्त्रविद्येतसुद्धा प्राचीन भारत प्रगत होता एवढे सिद्ध होणारा पुरावा प्राचीन ग्रंथांत उपलब्ध आहे तथापि अस्त्रांचे स्वरूप, निर्मिती व वापर वगैरे विषयींची संगतवार माहिती उपलब्ध नाही. प्राचीन साहित्यात विखुरलेल्या कल्पनामिश्रित उल्लेखांच्या आधारावरच तर्कशुद्ध निष्कर्ष काढून प्राचीन अस्त्रविद्येचे विवरण साधावे लागते.
प्राचीन काळी तीन प्रकारचे अस्त्रे प्रचारात असावीत. मंत्रमुक्त, प्राणिमुक्त व यंत्रमुक्त. मंत्रशक्तीने सिद्ध होणारी अस्त्रे दैवी असून मंत्रोच्चारात इष्ट देवतेच्या विधिपूर्वक आवाहनाने ती सिद्ध होत असत. अस्त्रयोजना मंत्र, उपचार, प्रयोग व संहार या क्रमाने चार भागांत सिद्ध होत असल्याने त्यांचा ‘चतुष्पाद’ असा उल्लेख महाभारतात आला आहे. मायिक व निर्माय म्हणजे इंद्रियातीत व इंद्रियगोचर असे आणखी दोन अस्त्रभेद सांगितले आहेत. पाणिमुक्त किंवा यंत्रमुक्त अस्त्रविद्येत धनुर्विद्या तेवढी प्राचीन काळी प्रगत झालेली असून धनुर्वेदात तिची साद्यंत माहिती आलेली आहे. अस्त्रविद्येची इतर माहिती मात्र त्यामध्ये अनुषंगानेच आली आहे.
प्राचीन काळी वापरलेल्या सु. ४०/५० अस्त्रांचा प्राचीन ग्रंथांतून नावनिशीवार उल्लेख मिळत असला, तरी अमुक अस्त्र महाभयंकर होते, महातपानंतर एखाद्याला विशिष्ट अस्त्र देवतेकडून मिळाले, अशांसारख्या विधानांपलीकडे त्यांची कसलीही शास्त्रीय, विश्वासार्ह माहिती उपलब्ध नाही. किंबहुना धनुष्यबाण, असि, गदा अशांसारख्या प्राथमिक शस्त्रास्त्रांशिवाय तथाकथित एकाही अस्रासंबंधी, निदान त्यांच्या स्वरूपाची किमान कल्पना येण्याएवढासुद्धा पुरावा मिळू शकत नाही. त्यातल्या विशेषत्वाने उल्लेखिलेल्या काही अस्त्रांची माहिती खाली दिली आहे :
आग्नेयास्त्र : मंत्रशक्तीने सिद्ध होणार्या ह्या अस्त्रापासून मोठ्या प्रमाणावर अग्नी उत्पन्न होत असून युद्धांत सार्वत्रिक जाळपोळीसाठी त्याचा उपयोग झाल्याचे उल्लेख आहेत.
पर्जन्यास्त्र : मंत्रशक्तीने मुसळधार पाऊस उत्पन्न करणारे अस्त्र. युद्धात आग्नेयास्त्रावर प्रतितोडगा म्हणून व सतत वर्षावाने उत्पन्न होणाऱ्या महापुरात शत्रूचे सैन्य व युद्धसामग्री बुडविण्यासाठी ह्याचा उपयोग करीत असत.
वायव्यास्त्र : मंत्रशक्तीने सोसाट्याचे वादळ उत्पन्न करणारे अस्त्र. पर्जन्यास्त्रप्रयोगात उत्पन्न होणार्या मेघांना पळवून लावण्यासाठी प्रतितोडगा म्हणून किंवा शत्रुसैन्याच्या वाताहतीसाठी ह्याचा प्रयोग केला जात असे.
ब्रह्मास्त्र : तप:सामर्थ्यावर ब्रह्मदेवापासून प्राप्त होणारे महाभंयकर विध्वंसक मंत्रसिद्ध अस्त्र. ह्याचा प्रतिकार ब्रह्मास्त्रानेच होत असे.
पाशुपतास्त्र : कठोर महातपानंतर महादेवापासून प्राप्त होणारे मंत्रसिद्ध सर्वविनाशी अस्त्र.
नारायणास्त्र : वरीलप्रमाणेच विष्णूपासून मिळणारे मंत्रसिद्ध अस्त्र. ह्या महाभयंकर विनाशी अस्त्रावर शत्रूला शरण येण्याशिवाय अन्य उपाय नव्हता.
वर दिलेली सर्व अस्त्रे मायिक म्हणजे मानवी इंद्रियांच्या आकलनापलीकडील, मंत्रोच्चाराने सिद्ध होणारी दैवीच असल्याने त्यांचे प्राचीन अस्तित्व केवळ कल्पनेनेच मानावे लागते. मात्र प्राचीन अस्त्रविद्येच्या तर्कशुद्ध परिशीलनात खालील निष्कर्ष स्पष्ट होतात :
(१)शस्त्रास्त्रांची निर्मिती व प्रयोग प्राचीन काळी निश्चित प्रचारात असले, तरी शस्त्रास्त्रविद्येतील त्या काळची प्रगती प्राथमिक अवस्थेतच होती.
(२)निसर्गातील पंचमहाभूतांचे अनियमित, भीषण, विध्वंसक प्रक्षोभांमागील कार्यकारणसंबंधज्ञान आजच्या मानाने प्राचीन काळी बाल्यावस्थेतच होते व त्यामागील विचारप्रणालीत कल्पनाविलासावरच भर दिला जात असे.
मानवी आकलनशक्तीच्या पलीकडील घडणाऱ्या नैसर्गिक घटनांमागील कार्यकारणभाव अज्ञात असल्याने आजसुद्धा आपण त्यांना दैवी इ. विशेषणे लावून निकालात काढतो. त्याच न्यायाने वीज, मेघगर्जना, वणवा, तुफान, मुसळधार पाऊस, भूकंप इ. निसर्गाच्या भीषण व विध्वंसक प्रक्षोभांनाच कार्यकारणज्ञानाच्या अभावी इंद्रियातीत म्हणून मायिक, कल्पनेपलीकडील अमानुष शक्तीचे म्हणून दैवी, युद्धोपयोगी म्हणून अस्त्र अशा संज्ञा योजून देवतेच्या प्रार्थनेने सिद्धी मिळाल्याचे भासल्यामुळे ती मंत्रसिद्ध दिव्यास्त्रे ठरविली गेली असावी. त्यामुळेच प्राचीन काळी अस्त्रविद्या प्रगत होती हा गैरसमज दृढ झाला असावा व निसर्ग-प्रक्षोभांनाच ‘दिव्यास्त्र’ हे नाव मिळून अस्त्रविद्येचे ऐतिहासिक महत्त्व व प्राचीन अस्तित्व रूढ झाले असावे.
पहा : शस्त्रसंभार.
पाटणकर, गो. वि.