अन्सारी, डॉ. मुख्तार अहमद : (२५ डिसेंबर १८८०—१० मे १९३६). भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक राष्ट्रीय वृत्तीचे मुसलमान पुढारी. त्यांनी एडिंबरो विद्यापीठाची वैद्यकीय पदवी घेतली व निष्णात डॉक्टर म्हणून कीर्ती मिळविली. हिंदी मुसलमानांनी केलेल्या ⇨ खिलाफतीच्या चळवळीत डॉ. अन्सारी हे प्रमुख पुढारी होते. असहकाराची चळवळ सुरू होताच त्यांनी मुस्लीम लीग सोडली. पुढे म. गांधींच्या प्रमुख अनुयायांत त्यांची गणना होऊ लागली.१९२७ मध्ये मद्रास येथे भरलेल्या काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले. १९३४ पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत ते काँग्रेसमधील समाजवादी गटाचे पुरस्कर्ते होते.
देवगिरीकर, त्र्यं. र.