अरब लीग: अरब राष्ट्रांच्या हितसंबंधांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी २२ मार्च १९४५ रोजी काही स्वतंत्र अरब राष्ट्रांनी स्थापन केलेली प्रादेशिक संघटना. अरब राष्ट्रांतील संबंध दृढतर करून सर्व राष्ट्रांच्या आर्थिक, व्यापारविषयक, परराष्ट्रीय इ. धोरणांचा समन्वय घडवून आणून अरब जनतेचे ऐक्य प्रस्थापित करणे, हा ह्या संघटनेचा प्रमुख हेतू आहे. त्याचप्रमाणे सर्व अरब राष्ट्रांनी इझ्राएलमधील अरब जनतेला संपूर्ण पाठिंबा द्यावा असेही ह्या संस्थेच्या संविधानात म्हटले आहे. आज या संघटनेत पुढील तेरा राष्ट्रे सभासद आहेत : अल्जीरिया, इराक, जॉर्डन, कुवेत, लेबानन, लिबिया, मोरोक्को, सौदी अरेबिया, सूदान, सिरिया, ट्युनिशिया, येमेन व संयुक्त अरब अमीर राज्ये.
ह्या संघटनेने १९४५ साली सिरिया व लेबानन ह्यांना फ्रान्सविरुद्धच्या त्यांच्या तक्रारींच्या निवारणार्थ व लिबियाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी साहाय्य केले. १९४८ मध्ये इझ्राएलचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या योजनेस या संघटनेने विरोध केला व तसे राज्य निर्माण होताच प्रत्यक्ष लष्करी कारवाईही केली. त्यात जरी अपयश आले, तरी त्या वेळेपासून संघटनेने इझ्राएलविरुद्ध पुकारलेला बहिष्कार अद्याप चालू आहे.
आपसातील आर्थिक सहकार्याच्या दृष्टीने संघटनेचे जे प्रयत्न चालू आहेत, त्यांत अरब पोस्टल-संघ, अरब तार- व दूरध्वनि-मंडळ व अरब आर्थिक महामंडळ ह्यांचा प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे. १९६२ मध्ये ईजिप्त व इतर चार राष्ट्रांनी (कुवेत, इराक, जॉर्डन व सिरिया) अरबसामायिक बाजारपेठेची स्थापना केली.
संयुक्त राष्ट्र-सनदेच्या अनुच्छेद ५२ मध्ये सूचित केलेल्या प्रादेशिक संघटनेमध्ये अरब लीगचा समावेश होतो, असा ह्या संघटनेचा दावा आहे प्रतिवर्षी संघटनेचा प्रमुख चिटणीस संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेस निरीक्षक ह्या नात्याने उपस्थित राहतो. संघटनेचे मुख्य कार्यालय कैरो येथे असून प्रमुख चिटणिसाला सर्व अरब राष्ट्रांनी राजदूताचा दर्जा दिला आहे.
अरब राष्ट्रांतील भिन्नभिन्न राज्यपद्धती व पूर्वापार चालत आलेले हेवेदावे ह्यांमुळे संघटनेत ऐक्याचा अभाव जाणवतो. इझ्राएल-विरोधासारख्या गोष्टींमुळे ऐक्य दिसत असले तरी त्यामागे प्रभावी शक्ती नाही, असेही म्हणतात. ह्या कारणामुळे व ह्या राष्ट्रांच्या मागासलेपणामुळे जागतिक राजकारणाच्या संदर्भात ह्या संघटनेस बराच काळ महत्त्व प्राप्त होईल असे वाटत नाही.
पहा: सकल-अरबवाद.
नरवणे, द. ना.