अमरपूर : ब्रह्मदेशाची जुनी राजधानी. मंडालेच्या दक्षिणेस सुमारे दहा किमी.वर इरावती नदीजवळील एका खेड्यात १७८३ मध्ये बोडवपया राजाने आपली राजधानी स्थापली व तिला अमरपूर हे नाव दिले. बागीदब या पुढील राजाने आपली राजधानी नदीपलीकडील अवा गावी (१८२२-३७) केली. पण त्याच्यानंतर ती पुन्हा अमरपूरला आली. १८५७ मध्ये राजधानी मंडालेस हालविण्यात आली. सध्या हे भग्नावस्थेतील गाव मंडालेचे उपनगर असून तेथील राजवाडा, गावाभोवतालचा तट, दोन पॅगोडा, तुंगमथन तलावाकाठी असलेले २५० खांबांचे मोठे बुद्धमंदिर व त्यातील पंचरसी धातूची प्रचंड बुद्धमूर्ती, बोडवपया राजाने जमविलेले शिलालेख इ. प्रेक्षणीय आहेत. रंगीबेरंगी रेशमी लुंग्या आणि ब्राँझ धातूच्या घंटाव बुद्धमूर्ती यांच्या बनावटीसाठी अमरपूर पूर्वीपासून प्रसिद्ध आहे.   

दातार, नीला