अब्दुल मलिक : (६४७-७०५). पश्चिम आशियातील उमय्या खिलाफतीचा पाचवा खलीफा. तो ६८५ मध्ये गादीवर आला. त्यावेळी दमास्कस व त्याभोवतालचा प्रदेश त्याच्या ताब्यात होता. मर्दैत व कैस टोळ्यांनी बायझंटिन सत्तेच्या चिथावणीने केलेल्या स्वार्यांचा प्रथम त्याने बंदोबस्त केला. मक्का व इराकचा काही प्रदेश येथे अब्दुल्ला इब्न झुबैर या खलीफाची सत्ता होती. त्याचा भाऊ मुसाब इराकचा सुभेदार होता. अब्दुल मलिकने ग्रीकांशी करार करून ६९१ व ६९२ साली अनुक्रमे मुसाबचा व अब्दुल्ला इब्न झुबैरचा पराभव केला. ६९३ ते ६९८ या काळात खारिजी टोळ्यांच्या बंडाचा त्याने मोड केला. त्याने आशियातील इराक, इराण व अरबस्तानचा बराच प्रदेश आणि उत्तर आफ्रिकेचा काही भाग आपल्या सत्तेखाली आणला. त्याने प्रशासनाची पुनर्रचना करून राज्यकारभारात अनेक सुधारणा केल्या. ‘दिनार’ हे अरबी नाणे सुरू करून अरबी ही राज्यभाषा म्हणून प्रचारात आणली. राज्यातील सर्व घडामोडींची माहिती कळावी म्हणून त्याने डाकेची व्यवस्था केली. त्याने कुराणाची स्वरचिन्हांसहित सुधारलेली आवृत्ती काढली.
पहा : खिलाफत.
गोखले, कमल.