अजातशत्रु : (?- इ.स.पू. ५२७?). मगध देशावर राज्य करणाऱ्या ⇨शिशुनाग वंशाचा सहावा राजा. हा गौतम बुद्धाच्या वेळी होता. ह्याच्या राजवटीची इ.स.पू. ५५४ – ५२७ किंवा इ.स.पू. ४९३-४६२ अशी कालमर्यादा सांगतात.
बौद्ध साहित्यात कूणिक, कूणिय अशा नावांनीही अजातशत्रूचा निर्देश केलेला आहे. ह्याचा पिता ⇨बिंबिसारह्याला पुराणात विधिसार, बिंदुसार किंवा क्षेमवर्मन म्हटले आहे. बिंबिसाराने अजातशत्रूला अंग देशाची राजधानी चंपा येथे राज्यव्यवस्थेसाठी नियुक्त केल्यामुळे त्याला राज्यकारभाराचा अनुभव मिळाला होता.
पितृहत्या करून अजातशत्रूने राज्यरोहण केले नंतर काही वर्षांनी गौतम बुद्धाच्या दर्शनास गेला असता, त्या पातकाचा उच्चार करून क्षमायाचना केली, असा वृत्तांत बौद्ध साहित्यात आढळतो. परंतु जैन साहित्यात बिंबिसाराने वृद्धपकाळी स्वतःच राज्यसत्ता अजातशत्रूला दिली, असा निर्देश आहे. गौतम बुद्धाचा विरोधक देवदत्त हा अजातशत्रूचा शालक असल्यामुळे ही दुसऱ्या धर्माची निंदाव्यंजक अशी पितृहत्येची कथा बौद्धांनी प्रसृत केली असावी, असेही काही इतिहासकारांचे मत आहे.
अजातशत्रूने केलेल्या युद्धांतील महत्त्वाचे युद्ध कोसल देशाच्या प्रसेनजित (पसेनदी) राजाशी झाले. प्रसेनजिताची बहिण कोसलदेवी बिंबिसाराची पत्नी होती. पतिनिधनाच्या दु:खामुळे तिचे मरण ओढवले म्हणून तिला न्हाण्याउटण्याच्या (नहाणचुण्णमुल्ल) व्ययासाठी आंदण दिलेले काशी ग्राम प्रसेनजिताने परत घेतले. हे ह्या युद्धाचे निमित्त झाले. पहिल्याने अजातशत्रूचा पराभव झाला, पण शेवटी प्रसेनजितालाच संधी करावा लागला. त्याने काशी ग्राम परत केले आणि आपली कन्या वजिरा हिचा अजातशत्रूशी विवाह केला. नंतर कोसल देशातील अंतर्गत विद्रोहामुळे ते सर्व राज्यच अजातशत्रूला आपल्या सत्तेखाली आणणे शक्य झाले. मग त्याने आपल्या वस्सकार नावाच्या प्रधानाकडून वैशालीच्या लिच्छवी लोकांमध्ये कलह उत्पन्न करविले. युद्ध करून लिच्छवींचे गणराज्य नष्ट केले आणि त्यांना आपल्या सत्तेखाली आणले. अवंतीच्या प्रद्योतवंशीय राजाशीही अजातशत्रूने युद्ध केले, पण त्यात त्याला यश आले नाही. आपल्या राज्याचा विस्तार करण्यासाठी अजातशत्रू सतत प्रयत्नशील राहिल्यामुळे पुढे मगधाचे साम्राज्य स्थापन होऊ शकले.
शत्रूपासून गुप्त राखलेल्या दोन रणयंत्रांचा वापर अजातशत्रूने युद्धात केला, असा उल्लेख जैन साहित्यात आढळतो. एक महाशिलाकंटक (ग) नावाचे शत्रूवर मोठ्या दगडांचा भडिमार करणारे उल्हाटयंत्र. दुसरे रथमुसल हे आतून चक्रे फिरवून रथास जोडलेल्या शस्त्रांनी शत्रुसैनिकांना कापून चिरडून टाकणारे यंत्र.
अजातशत्रू पहिल्याने गौतम बुद्धाच्या विरुद्ध होता, पण पुढे त्याचा अनुयायी झाला. बुद्धाच्या अवशेषांवर त्याने स्तूप बांधला. बौद्ध भिक्षूंची पहिली संगिनी त्यानेच राजगृह येथे भरविली, असे बौद्ध सांगतात आणि जैन म्हणतात, तो जैन धर्मानुयायी होता. त्यावरून असा तर्क करता येतो की, प्राचीन भारतीय राजांप्रमाणे अजातशत्रूही सर्व धर्मांना समान आश्रय देणारा असावा. तो स्वभावाने क्रूर होता हे दाखविणाऱ्या काही गोष्टीही सांगितल्या गेल्या आहेत.
देशपांडे, आ. रा.