अँथ्रॅसाइट : खनिज. कार्बनाचे मान सर्वांत अधिक, बाष्पनशील (उडून जाणाऱ्या) द्रव्यांचे मान सर्वांत कमी व उष्णता निर्माण करण्याची क्षमता उच्च असणाऱ्या दगडी कोळशाच्या जातीचे नाव. दगडी कोळशात हा सर्वांत कठीण असतो. कठिनता २–२·५. वि.गु. १·३२–१·७. ठिसूळ. भंजन शंखाभ. अपारदर्शक. रंग काळा, अतिशय चकाकणारा. हाताळताना हात काळे होत नाहीत. उघड्यावर राहिल्याने हे खराब होत नाही. पेटविण्यास कठीण. पेटल्यावर धूर न होता स्वच्छ, आखूड निळसर ज्योत मिळते. घरगुती उपयोगासाठी अतिशय सोयीचा. दक्षिण वेल्स (इंग्‍लंड) येथे आढळतो पण भारतात याचे साठे नाहीत.

पहा : कोळसा, दगडी.

ठाकूर, अ. ना.