अँब्‍लिगोनाइट : खनिज. स्फटिक त्रिनताक्ष [→ स्फटिकविज्ञान] चांगले स्फटिक विरळाच. सामान्यतः भरड व पाटनक्षम पुंजांच्या स्वरूपात आढळते. पाटन (001) उत्कृष्ट, (100) चांगले [→ पाटन]. भंजन खडबडीत ते अर्धशंखाभ. ठिसूळ. कठिनता ६. वि.गु. ३-३·१. चमक काचेसारखी, मेणासारखी, (001) पाटनपृष्ठाची मोत्यासारखी. अर्धपारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. रंग पांढरा, फिकट हिरवा, पिवळा, करडा किंवा निळा. कस पांढरा [→खनिजविज्ञान]. रा. सं. LiAl FPO4. F च्या जागी (OH) व Li च्या जागी Na येणे शक्य असते. OH हे F पेक्षा जास्त असल्यास खनिजाला माँटेब्रॅसाइट म्हणतात. ग्रॅनाइट पेग्मटाइटात विरळाच व स्पॉड्युमीन, तोरमल्ली (टुर्मलीन), लेपिडोलाइट व ॲपेटाइट यांच्या जोडीने आढळते. याच्यापासून लिथियम ही धातू मिळविली जाते. युगांडा, ऱ्होडेशिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, स्पेन व पोर्तुगाल या प्रदेशांत हे मुख्यतः आढळते. नाव याच्या पाटनपृष्ठांमधील कोनास उद्देशून व ‘बोथट’ व ‘कोण’ या अर्थाच्या ग्रीक शब्दांवरून पडले आहे.

ठाकूर, अ. ना.