ॲन्‌ नजफ : इराकमधील धार्मिक दृष्ट्या पवित्र व प्रसिद्ध शहर. लोकसंख्या १,२८,०९६ (१९६५). यास ‘मेशेद अली’ असेही म्हणतात. हे बगदादच्या दक्षिणेस सु. १६० किमी., यूफ्रेटिसच्या पश्चिमेकडील एका सरोवराकाठी, कड्यावर वसलेले आहे. महंमद पैगंबराचा जावई व शिया पंथाचा संस्थापक ⇨ अली याची कत्तल या शहराच्या परिसरात झाल्याची दंतकथा होती म्हणून ⇨ हरून-अल-रशीदने ७९१ मध्ये त्या संभाव्य जागेवर अलीची कबर बांधली व सध्याच्या शहराची स्थापना केली. कबरीवर मागाहून सुंदर मशीद बांधण्यात आली. ती पर्शियन शैलीची, सोनेरी मुलाम्याच्या घुमटांची आहे. शियापंथीयांचे हे मोठे यात्रेचे ठिकाण असून शहरातील धार्मिक शिक्षण देणाऱ्या मध्ययुगीनसदृश शाळा सबंध शिया जगतात प्रभावशाली ठरल्या आहेत. अकरा किमी.वरील अल्‌ कूफाशी ॲन्‌ नजफ जोडलेले आहे.

गद्रे, वि. रा.