ॲनॅटेज : (ऑक्टहेड्राइट). खनिज. स्फटिक चतुष्कोणीय गटातील. ते सामान्यत: उभट किंवा बसकट अष्टफलकासारखे किंवा (011) फलक प्रमुख असलेल्या चापट वडीसारखे असतात [→ स्फटिकविज्ञान]. पाटन : (001) व (111) उत्कृष्ट [→ पाटन]. भंजन किंचित शंखाभ. ठिसूळ कठिनता ५·५-६·००. वि.गु. ३·८२-३·९५. चमक किंचित हिऱ्यासारखी किंवा चमकदार धातूसारखी. रंग तपकिरी व निळीसारख्या रंगांच्या विविध छटा यांच्या मिश्रणाचा. पारदर्शक ते जवळजवळ अपारदर्शक. खनिजातून पार येणारा प्रकाश हिरवट पिवळा दिसतो. कस रंगहीन. रा. सं. TiO2. ग्रॅनाइट, पट्टिताश्म, अभ्रकी व क्लोराइटी सुभाजा (सहज भंग पावणारा खडक) इ. खडकांत पुष्कळदा आढळणारे गौण खनिज. ॲनॅटेज, रूटाइल व ब्रूकाइट या तिन्ही खनिजांची रासायनिक संघटना सारखीच असून सामान्यत: ती टिटॅनियम असणाऱ्या खनिजांपासून द्वितीयक रीतींनी (मूळ निक्षेप झाल्यानंतरच्या प्रक्रियांनी) निर्माण झालेली असतात. ती सर्व कृत्रिम रीतींनी तयार करण्यात आलेली आहे.

पहा : रत्‍ने.

ठाकूर, अ. ना.