ॲपोलोनियस, पेर्गाचे : (इ.स.पू. २६१-२००). प्राचीन ग्रीक भूमितिज्ञ. ⇨ शंकुच्छेद (शांकव) या विषयावरील त्यांच्या महत्त्वपूर्ण ग्रंथामुळे ॲपोलोनियस यांना ‘महान भूमितिज्ञ’ म्हणून मानण्यात येते. ॲलेक्झँड्रिया येथे शिक्षण व अध्ययन केल्यानंतर काही काळ पर्गामम येथे त्यांचे वास्तव्य होते.
शांकवांसंबंधी ॲपोलोनियस यांनी लिहिलेले आठ विस्तृत खंड इतके परिपूर्ण होते की, ते पुढे सु. २,००० वर्षांपर्यंत प्रमाणभूत मानण्यात आले. सर्व शांकव एकाच शंकूचे निरनिराळ्या प्रतलांनी केलेले छेद आहेत, हा मूलभूत महत्त्वाचा सिद्धांत त्यांनी आपल्या ग्रंथात मांडला. या ग्रंथात त्यांनी शांकवांसंबंधीचे सु. ४०० गुणधर्म सिद्ध केलेले असून सध्याच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात येणारे शांकावांचे बहुतेक गुणधर्म त्यात आलेले आहेत. तथापि नियतरेषेसंबंधी (शांकवाची व्याख्या करताना त्यात उपयोग करण्यात येणारी स्थिररेषा) ॲपोलोनियस यांना माहिती नव्हती, असे दिसून येते. शांकवांची सध्या प्रचलित असलेली ‘इलिप्स’ (विवृत्त), ‘पॅराबोला‘ (अन्वस्त) व ‘हायपरबोला’ (अपास्त) ही नावे ॲपोलोनियस यांनीच प्रथम उपयोगात आणली.
याव्यतिरिक्त प्रतलीय (एकाच पातळीतील) बिंदुपथ, सुसम प्रस्थे (आकाराने नियमित असलेल्या घनाकृती), अवर्गीकृत अगणनीय संख्या, अंकगणितीय गणनपद्धती, ग्रहांच्या स्थिती व पश्चगमन, स्थैतिकीतील (समतोल अवस्था निर्माण करणाऱ्या प्रेरणांमधील संबंधांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रातील) स्क्रूची उपपत्ती व उपयोग, अन्वस्ताकार आरशाद्वारे प्रकाशाचे केंद्रीभवन, आर्किमिडीज यांनी काढलेल्या π च्या मूल्यापेक्षा अधिक जवळचे आसन्नमूल्य (अंदाजी मूल्य) इ. विषयांवर ॲपोलोनियस यांनी लेखन केलेले होते, असे उल्लेख टॉलेमी, प्रॉक्लस इ. प्राचीन विद्वानांच्या लेखनात आढळून येतात.
मिठारी, भू. चिं.