अश्व अक्षांश : पृथ्वीवरील सु. ३० उ. ते ३५ उ. व ३०द. ते ३५ द. येथील जास्त वायुभाराचे पट्टे. सूर्याच्या दक्षिणोत्तर भासमान गतीबरोबर हे पट्टेही थोडेथोडे दक्षिणोत्तर सरकतात. तसेच जमीन व पाणी यांच्या कमीअधिक तापण्यामुळे ते या अक्षाशांत वर्षभर सलग राहत नाहीत आणि काही भागांत या मर्यादांच्या कमीअधिक बाहेरही जातात. खुद्द या पट्ट्यांत भूपृष्ठावर नियमित वारे वाहत नाहीत येथून विषुववृत्ताकडे व ध्रुवांकडे मात्र वारे (वायुपुंज) वाहतात. हेच अनुक्रमे व्यापारील पश्‍चिमी वारे होत. विषुववृत्ताकडून आणि ध्रुववृत्तांकडून तपांबराच्या वरच्या भागातून आलेली हवा या पट्ट्यांत खाली उतरते. शिडांच्या जहाजांच्या काळात पृष्ठवाऱ्यांच्या अभावी या पट्ट्यांत जहाजे कधीकधी बरेच दिवस अडकून पडत मग स्थानिक कारणांनी निर्माण झालेल्या अनियमित वाऱ्यांमुळे त्यांना पुढे जाता येत असे. वसाहतींच्या सुरुवातीच्या काळात, यूरोपातून अमेरिकेकडे व वेस्ट इंडीजकडे घोडे घेऊन जाणारी जहाजे अशी या भागात अडकून पडली, म्हणजे जहाजांवरील मर्यादित पाणी माणसांना पुरावे म्हणून घोड्यांना समुद्रात ढकलून देत असत. यावरून विशेषतः उत्तर गोलार्धातील या भागाला ‘अश्व अक्षांश’ हे नाव पडले असावे, अशी समजूत आहे.

कुमठेकर, ज. व.