अख्तर, मोही-उद्दीन : (१९२८— ). काश्मीरी लघुकथाकार. श्रीनगरजवळील बाटमालू येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे सुरवातीचे आयुष्य अत्यंत हालअपेष्टांत गेले. बी. ए. होताच त्यांनी उर्दूत लघुकथालेखनास सुरवात केली. सुरवातीस त्यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा पगडा होता परंतु त्यांनी काँग्रेस तत्त्वप्रणालीचा प्रचार करण्यासाठी स्वतःस वाहून घेतले. सध्या ते चमन ह्या काश्मीरी भाषेतील अधिकृत सरकारी नियतकालिकाचे संपादक आहेत.

सुरवातीस त्यांनी उर्दूत लेखन केले असले, तरी पुढे ते काश्मीरी भाषेत लिहू लागले आणि लवकरच त्यांना काश्मीरी कथाकार म्हणून मान्यताही लाभली. सत संगर (सात गिरिशिखरे) हा त्यांच्या सात कथांचा पहिला संग्रह १९५५ मध्ये प्रसिद्ध झाला आणि १९५८ मध्ये ह्यां संग्रहास साहित्य अकादेमीचे पारितोषिकही मिळाले. स्वांझल (इंद्रधनुष्य) हा त्यांचा दुसरा कथासंग्रह होय. (१९५६). जीवनाचे वास्तववादी चित्रण आणि सामाजिक जाणिवांचे प्रत्ययकारी प्रतिबिंब त्यांच्या कथांत आढळते.

दोद दग (व्याधी व यातना) ही काश्मीरी भाषेतील आद्य कादंबरी (१९६३) लिहिण्याचा मानही त्यांच्याकडेच जातो. अनाथ व दलित यांच्याबाबात समाज कसा सहानुभूतिशून्य झालेला आहे, याचे चित्रण त्यांनी प्रस्त्तुत कादंबरीत केलेले आहे. इब्सेनच्या घोस्ट ह्या नाटकाचे त्साय (१९६१) नावाने भाषांतर करून तसेच नस्ती हुंद सवाल (१९५९) आणि शिशा-ता-संगीन (१९६१) यांसारखा लहुनाटकेही त्यांनी लिहिली. दलील (१९६२) नावाचा काश्मीरी लोककथांचा संग्रहही पुष्कर भान ह्या लेखनमित्राच्या साहाय्याने त्यांनी प्रसिद्ध केला.

हाजिनी, मोही-इद्दीन् (इं.)सुर्वे, भा. गा. (म.)