अनर्जित उत्पन्न: स्वतः कष्ट न करता एखाद्या व्यक्तीला मिळणारे उत्पन्न. बाह्य आर्थिक व सामाजिक कारणांमुळे मालमत्तेपासून मिळणाऱ्या उत्पन्नात आपोआप वाढ होत जाते. सर्वसाधारण किंमतपातळी वाढत असता कंपन्यांचे भाग, कर्जरोखे, भांडवली वस्तू ह्यातून मिळणारे वाढते उत्पन्न, किंवा शहराची भरभराट झाल्यानंतर जमिनीच्या व इमारतीच्या किंमतींत होणाऱ्या वाढीमुळे मिळणारे उत्पन्न, ही अनर्जित उत्पन्नाची उदाहरणे होत. जमीनदारांना कुळांकडून मिळणारा ⇨खंड, लाभांश, खाणमालकांना मिळणारे ⇨स्वामित्वशुल्क ह्यांचाही अनर्जित उत्पन्नात समावेश होत.

अनर्जित उत्पन्न समाजातील ⇨आर्थिक विषमतेच्या वाढीस कारणीभूत ठरते. अशा उत्पन्नावर उद्गामी कर लादण्याची आवश्यकता जॉन स्ट्यूअर्ट मिल,⇨डेव्हिड रिकार्डो ह्यासारख्या अर्थशास्त्रज्ञांपासून फेबिअन समाजवादी विचारवंतांपर्यंत सर्वांनी प्रतिपादिली आहे.

सुर्वे, गो. चिं.