अध्यक्ष : ही संज्ञा अनेक अर्थांनी वापरली जाते. कोणत्याही सभेचे संचलन करण्यासाठी निवडलेल्या अगर नेमलेल्या व्यक्तीस अध्यक्ष म्हणण्यात येते. त्याचे काम सभाशास्राला अनुसरून सभेचे नियमन करणे हे होय. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या लहानमोठ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यासही अध्यक्ष म्हणावयाची प्रथा आहे. अनेक ठिकाणी लोकशाही व्यवस्थेप्रमाणे जनतेने निवडून दिलेल्या प्रमुखासही ‘अध्यक्ष’ म्हणतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या संविधानात संघराज्याच्या प्रमुखास अध्यक्ष हे नामाभिधान देण्यात आले. लोकशाही पद्धतीच्या कित्येक राज्यशासनांनी हेच पदनाम उचलले. ह्या पदाधिकाऱ्यास राष्ट्रप्रमुख, राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपती अशा वेगवेगळ्या संज्ञा रूढ होत आहेत. उदा.,भारताच्या राष्ट्रप्रमुखास ‘राष्ट्रपती’म्हणतात. संज्ञा तीच असली तरी सगळ्याच अध्यक्षांचे अधिकार अगर सत्ता सारखी नसते. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा खराखुरा सत्ताधीश असतो, तर भारताच्या राष्ट्रपतीची सत्ता संविधानाप्रमाणे फार मर्यादित आहे.
नरवणे. द.ना.