अडिग, गोपाल कृष्ण: (१८ फेब्रुवारी १९१८-  ). एक आधुनिक कन्नड कवी. त्यांचा जन्म दक्षिण कानरा जिल्ह्यातील मोगेरी येथे झाला. म्हैसूर विद्यापीठातून ते १९५२ मध्ये इंग्रजी घेऊन एम.ए. झाले. म्हैसूर येथील महाविद्यालयांतून काही काळ त्यांनी इंग्रजीचे अध्यापन केले. उडिपी येथील पूर्णप्रज्ञ महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते. साक्षी या कन्नड त्रैमासिकाचे ते संपादक आहेत.

 

सुप्रसिद्ध कन्नड कवी बेंद्रे आणि पुट्टप्प यांच्याप्रमाणेच अडिगांचाही १९५० नंतरच्या कन्नड काव्यावर विशेष प्रभाव आहे. भावतरंग (१९४६), कट्‌टुवेवु नावु (१९४८), नडेदु बंद दारी (१९५२), चंडेमद्दळे (१९५४) भूमिगीत (१९५९) आणि वर्धमान (१९७२) हे अडिगांचे काव्यसंग्रह होत. सुरुवातीच्या दोन संग्रहांतील त्यांची कविता पारंपरिक स्वरूपाची असली, तरी त्यानंतरच्या त्यांच्या कवितेने नवकाव्याचे (कन्नड नव्यकाव्याचे) वळण घेतले. त्यांच्या नवकाव्यावर बेंद्रे, तसेच टी. एस्. एलियट, येट्स व एझ्रा पाउंड यांच्या काव्याचा प्रभाव आहे. बोलीभाषेचा वापर, मुक्तच्छंदातील अंतर्गत लयीची रचना, नाट्यपूर्णता, धारदार उपरोध आणि स्वतंत्र प्रतिमासृष्टी हे त्यांच्या काव्याचे लक्षणीय विशेष म्हणता येतील. कन्नड नवकाव्यात त्यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे.

 

अडिगांनी काही गद्यलेखनही केले आहे. त्यात आकाशदीप (१९५१) व अनाथे (१९५४) ह्या कादंबऱ्‍या सुवर्णकीट (१९४७), रैतरहुडुगी (१९४८) व जनतेय शत्रु (१९४९) हे अनुवादित ग्रंथ आणि मण्णिन वासने (१९६६) हा सामाजिक व साहित्यविषयक लेखांचा संग्रह यांचा अंतर्भाव होतो.

माळगी, से. रा. (क.) कायकिणी, गौरीश (म.)